धर्मांधांच्या धर्मांतराच्या कारवाया १७व्या शतकात वाढत होत्या. राष्ट्ररक्षणासाठी गुरू तेग बहादूरजींचे साहाय्य मागितल्यावर त्यांनी स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला. दि. २४ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीच्या चांदणी चौकात त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यामुळेच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणजे ‘हिंदुस्थानची ढाल’ असे संबोधले जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शीख समाजाने या बलिदानाला निःस्वार्थ सेवा, समता आणि मानव कल्याणाच्या कार्याने जपले, तर सिंधी समाजानेही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्तरावर या परंपरेला विशेष योगदान दिले. या परंपरेत श्री गुरू तेग बहादूर आणि सिंधी समाज यांच्या नात्यांवर भाष्य करणारा हा लेख...
शीख समाजाचे योगदान
शीख समाजाने श्री गुरू तेग बहादूर यांच्या बलिदानाला जीवनाचा आदर्श मानून अनेक क्षेत्रांत योगदान दिले. मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी शीख गुरूंनी समाजाला ‘सर्व धर्म समान’ हा मार्ग दाखवला. अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे आणि दुर्बलांचे रक्षण करणे, ही शीख समाजाची मूळ शिकवण आहे.
सेवा आणि त्यागाची परंपरा
गुरुद्वाराच्या माध्यमातून मोफत भोजन, मोफत शिक्षण, वैद्यकीय मदत, आपत्तीतील सेवा यामध्ये शीख समाज सदैव अग्रणी राहिला आहे. ’सेवा हीच सर्वोच्च पूजा’ ही शिकवण आजही जगभर जपली जाते.
राष्ट्रनिर्माणातील योगदान
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात शीख समाजाने अतुलनीय बलिदाने दिले, हे श्री गुरू तेग बहादूर यांच्या बलिदान परंपरेचेच पुढील रूप आहे. शीख आणि सिंधी समाजातील ऐतिहासिक संबंध दृढ आहेत. सिंध (आजचा पाकिस्तानचा भूभाग) आणि पंजाब हे प्राचीन काळापासून सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेले आहेत. गुरूनानक देवांनी आपल्या दौर्यात सिंध, कराची, हैदराबाद, शिकारपूर आदी भागांत प्रवास केला. त्यामुळे सिंधी समाजात शीख धर्माबद्दल आत्मीयता वाढली. सिंधमध्ये अनेक गुरूद्वारे स्थापन झाले, ज्यांना सिंधी भाषेत ‘टिकाणा’ म्हणतात. आजही भारतभरात हजारो टिकाण्यांमध्ये गुरूपर्व साजरे केले जातात. श्रीचंद जर्जीच्या उदासी पंथानेही सिंधमध्ये खोलवर प्रभाव पाडला आहे. अनेक सिंधी कुटुंबे स्वतःला उदासी म्हणवतात. आजही अनेक सिंधी घरांमध्ये दररोज सुखमनी साहिबचे पठण केले जाते.
सिंधी समाजाचे योगदान
राष्ट्र स्वातंत्र्याच्या लढ्यात सिंधी समाजाने योगदान दिले आहे. सिंधी संत आणि विद्वानांनी गुरू तेग बहादूर यांच्या बलिदानाला मानवतेचा विजय असे मानले. शीख गुरूंच्या शिकवणींनी प्रेरित होऊन त्यांनी मानवी मूल्ये जपली. सिंधी समाजाने एकता आणि भाईचार्याचा संदेश दिला. सिंधी समाज सर्व धर्मांचा आदर करतो. गुरुजींच्या त्यागातून प्रेरणा घेत त्यांनी प्रेम, सहिष्णुता आणि शांततेचा मार्ग स्वीकारला.
लंगर आणि सेवा परंपरेचा विस्तार करण्यात आला. सिंधी समाजात लंगर, अन्नदान, जलसेवा आणि बंदीछोड दिवस (बंदीछोड दिवस हा सहावे गुरू श्री गुरू हरगोबिंद साहिब जी यांच्या शौर्य, करुणा व धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. या दिवशी गुरूंनी स्वतःच्या मुक्ततेसोबत ५२ राजे/राजपूत कैद्यांनाही तुरुंगातून मुक्त करून आणले; म्हणून या दिवसाला बंदीछोड (कैद्यांना मुक्त करणारा) असे म्हणतात. साजरा करण्याची परंपरा आजही टिकून आहे. सिंधी गुरूद्वारे आणि दरबारांमध्ये निःस्वार्थ सेवा ही नियमित प्रथा आहे.
गुरू तेग बहादूर साहिबजी
(१६२१-१६७५ इ.)
शीख पंथातील नववे गुरू, श्री गुरू तेग बहादूर साहिब हे करुणा आणि आध्यात्मिक अढळतेचे भव्य प्रतीक म्हणून इतिहासात ओळखले जातात. अत्याचार, भीती आणि धार्मिक छळाने समाज वेढलेला असतात त्यांनी केवळ शीखांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराचे निर्भयपणे संरक्षण केले. १६७५ मध्ये शरणागती- शहादत स्वीकारून त्यांनी मानवतेच्या इतिहासात स्वतःचे नाव अमर केले. त्यांच्या बलिदानामुळे ते मानवी प्रतिष्ठा आणि सार्वत्रिक हक्कांचे रक्षक म्हणून जगभर आदराने स्मरणात आहेत. श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे जीवन हे ध्यान, अध्यात्म, काव्यचिंतन आणि न्यायासाठी अखंड वचनबद्ध राहण्याचे उज्ज्वल मिश्रण होते. त्यांच्या शिकवणी, ज्या गुरू ग्रंथ साहिबमध्ये संकलित आहेत, त्या आजही लाखो लोकांना सत्याचा मार्ग धरण्यास, नम्र राहण्यास आणि पीडितांच्या रक्षणासाठी उभे राहण्यास प्रेरित करतात. श्री गुरू तेग बहादूर साहिब हे केवळ आध्यात्मिक गुरू नव्हते, तर नैतिक धैर्य, मानवी मूल्ये आणि सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःला अर्पण करण्याचे कालातीत प्रतीक होते.
समाजाला अनेक शीख गुरुद्वारांनी अन्न, आसरा आणि मदत दिली. भारतात पुनर्वसनानंतर सिंधी समाजानेही शीखांसोबत सामाजिक सेवाकार्यात सहभाग घेतला. शीख आणि सिंधी समाजाने साहित्य, भजन आणि सांस्कृतिक परंपरांत योगदान देण्याची संतांची परंपरा आहे. यामध्ये कंवरराम, सरवानंद, भगत कान्हैयालाल यांनी शीख गुरूंच्या शिकवणी सिंधी साहित्य, भजन आणि सत्संगातून लोकांपर्यंत पोहोचवल्या. आजही अनेक सिंधी गुरुद्वारांमध्ये ‘गुरू ग्रंथ साहिब’चे नियमित पाठ आणि कीर्तन होतात. शीख समाज, मानवता आणि धर्माची रक्षा, सेवा ही सर्वोच्च पूजा, सत्य आणि न्यायासाठी लढा, त्याग आणि बलिदानाची परंपरा आहे, सिंधी समाज प्रेम, सहिष्णुता आणि भाईचारा, दान, अन्नसेवा आणि सामाजिक बांधिलकी, शांती, एकता आणि विश्वबंधुत्व, दोन्ही समाजांचे जीवनदर्शन एकमेकांना पूरक आहे.
त्यांच्यामध्ये मानवतेची सेवा, सत्याचे रक्षण आणि धर्मस्वातंत्र्य यांचा समान संदेश आहे. ‘हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादूरजी यांचे बलिदान भारतीय संस्कृतीसाठी गौरवशाली आहे. शीख समाजाने हा गौरवशाली इतिहास सेवा, समर्पण आणि बलिदानाने प्रज्वलित केले, तर सिंधी समाजाने भाईचारा, शांतता आणि सांस्कृतिक समन्वयाने त्याला अधिक तेज दिले. दोन्ही समुदायांनी राष्ट्रसंरक्षण म्हणजे मानव स्वातंत्र्य आणि मानवतेच्या अधिकारांचे संरक्षण आहे. हा संदेश जगाला दिला. आजही नीतिमत्ता, धर्मस्वातंत्र्य आणि न्यायाची गोष्ट होते, तेव्हा गुरू तेग बहादूरजी हे प्रेरणेचा दीपस्तंभ होऊन उभे राहतात, तर शीख व सिंधी समाजाचे योगदान मानवतेच्या मार्गाला प्रकाश देत राहते.