"हिंद दी चादर - श्री गुरु तेगबहादुर" समागम एक तीर्थयात्रा ठरावी

    28-Feb-2026
Total Views |
Guru Tegh Bahadur Ji
 
मोगल शासनकर्त्यांच्या अन्याय-अत्याचाराविरुध्द आवाज उठवून 17 व्या शतकामध्ये धर्मस्वातंत्र्य व मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन ज्यांनी भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले, त्या 'हिंद-दी-चादर' - श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे 350वे शहिदी समागम वर्ष आपण साजरे करीत आहोत, त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा, तसेच त्यांनी केलेले सांस्कृतिक व अध्यात्मिक अस्मितेचे रक्षण व त्याकरिता दिलेले बलिदान याचे स्मरण व्हावे हा यामागील उदात्त हेतू आहे.
श्री गुरु तेग बहादुर या शीख धर्माच्या नवव्या गुरुंनी शीख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्व आणि निर्भिडपणा यांचा प्रचार केला. त्यांचे प्रवचन व भजन यांचा ‘गुरु ग्रंथ साहिब’ यामध्ये देखील समाविष्ट आहे. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शीख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली.
श्री गुरु तेग बहादुर जी हे जगातील एक प्रभावशाली गुरु होते. त्यांनी मोगल सत्तेचा विरोध केला. 1675 मध्ये मोगल शासकांनी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले. नकार दिल्यामुळे त्यांचा सार्वजनिक ठिकाणी शिरच्छेद करण्यात आला. धर्म आणि मानवतेसाठी त्यांनी 11 नोव्हेंबर 1675 मध्ये दिल्लीतील चांदणी चौक येथे आपले बलिदान दिले. त्या जागेला आज गुरुद्वारा शीश गंज साहिब तथा गुरुद्वारा रकाब गंज साहिब म्हणून ओळखले जाते.
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे बलिदान केवळ धर्मासाठी नव्हते तर मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होते. त्यांच्यासाठी धर्म हा सांस्कृतिक मूल्यांचा आणि जीवनशैलीचा एक आदर्श होता. म्हणूनच, धर्माच्या खऱ्या, शाश्वत मूल्यांसाठी त्यांनी केलेले बलिदान हे अनेक अर्थांनी महत्वाचे आहे. जुलमी शासकाच्या विचार स्वातंत्र्याच्या धर्मविरोधी आणि दमनकारी धोरणांविरुद्ध गुरु तेग बहादुर यांचे बलिदान ही एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती. त्यांच्या निर्भय आचरणाचे, धार्मिक आणि नैतिक दृढतेचे ते सर्वोच्च उदाहरण होते. गुरु गोविंद सिंह यांनी त्यांच्या "बिचित्र नाटक" या नाटकात श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल लिहिले आहे.
धार्मिक प्रचार :
 
धर्म तत्वज्ञान जनतेपर्यंत नेण्यासाठी व जनकल्याणाच्या कामासाठी श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी भारतातील विविध ठिकाणी प्रवास करुन लोकांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अनेक रचनात्मक कार्य केले. त्यांनी धर्माच्या खऱ्या प्रसाराबरोबरच, प्रचलित सामाजिक रीतिरिवाजांवर, अंधश्रद्धांवर तीव्र प्रहार करुन जनकल्याणासाठी नवीन, साधे सोपे आदर्श स्थापित केले. याबरोबरच प्राणीसेवा, दानधर्मासाठी विहिरी खोदणे, धर्मशाळा बांधणे इत्यादी सार्वजनिक कल्याणकारी कामे देखील केली.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी बलिदानाचा प्रभाव :
 
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानामुळे मुस्लिम राजवट आणि दडपशाहीविरुद्धचा संकल्प अधिक दृढ झाला.
श्री गुरु तेगबहादुर साहिबजी 400 वे प्रकाश पर्वः
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांची 400वी जयंती 21 एप्रिल 2022 रोजी विशेष उत्साहात साजरी करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित या 400 व्या प्रकाशपर्व सोहळ्यात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी एक नाणे आणि टपाल तिकिटाचेही प्रकाशन केले. गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाने भारतीयांच्या पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी, तिचा सन्मान राखण्यासाठी जगण्याची आणि मरण्याची प्रेरणा दिली असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी सांगितले.
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानास भारतीय इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे. याचे औचित्य साधून विविध गुरुद्वारांच्या ठिकाणी 'शहिदी दिवस' पाळण्यात आलेले आहेत. शिवाय केंद्र शासन आणि देशातील अनेक राज्यातील शासनाने श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या हौतात्म्यास समर्पित विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रद्धापूर्वक केलेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहीदीच्या 350 व्या वर्षानिमित्त भक्तीभाव राखून आणि धर्मप्रेरणा म्हणून घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागामार्फत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या हौतात्म्यास समर्पित विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली नागपुर येथे भव्य-दिव्य स्वरुपात हा कार्यक्रम घेण्यात आला. तद्नंतर श्री गुरु गोविंद सिंघजी यांच्या पवित्र भूमीत म्हणजेच नांदेड येथे संस्मरणीय कार्यक्रम झाला. दूसरे वैशिष्ट्य असे की, शिख पंथाच्या (धर्माच्या) गुरुगादीवर श्री गुरु ग्रंथ साहिब जी अटल गुरुच्या रुपात येथे विद्यमान आहेत आणि प्रत्यक्ष श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या सानिध्यात “हिंद-दी-चादर” सारखा भव्य जनजागरण झाल्यामुळे हा कार्यक्रम महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरला. श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांनी 1708 मध्ये नांदेडच्या पावन भूमीत श्री गुरु ग्रंथ साहेब यांना गुरुपद देऊन युगा-युगाकरिता गुरु सन्मान प्रदान केले होते. श्री गुरु तेग बहादुरजी आणि श्री गोविंदसिंघजी यांचे नाते पिता आणि पुत्राचे होय. पुत्राच्या कर्मभूमीत पित्याचा 350वा शहीदी सोहळा आयोजित होणं ही एक महत्वाचा संदेश देणारी घटना आहे.
नांदेडच्या पावन भूमीत 2008 मध्ये श्री गुरु ग्रंथसाहेबजी यांचा त्रिशताब्दी गुरुतागद्दी सोहळा भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 18 वर्षानंतर जानेवारी 2026 मध्ये या समागमाच्या माध्यमातून शिख धर्मावर आस्था बाळगणारे बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, सिकलीगर, उदासीन, वाल्मिकी व भगत नामदेव वारकरी संप्रदाय- समाज या आठ समाजांसह एक भक्तीसंगम निर्माण झाला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील अनेक राज्यांच्या शालेय पाठ्यक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान आणि चार साहेबजादे यांच्या वीर बलिदानाचा इतिहास, शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे, ही गोष्ट शिख धर्मियांसाठी आणि गुरु नानक नामलेवा संगतसाठी सन्मानाची ठरेल.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या हौतात्म्यासोबतच श्री गुरु तेग बहादुर साहिबजी महाराज यांना मिळालेल्या गुरु-ता-गद्दी दिवसाचे देखील 350वे वर्ष साजरे होत आहे. त्यांनी जवळपास 33 वर्षे दहावे गुरु म्हणून कार्य केले. गुरु गोविंदसिंघजी यांनी 'शस्त्र' आणि 'शास्त्र' याचा समन्वय राखून संत व सेनापतीची भूमिका पार पाडली. श्री गुरु गोविंदसिंघजी यांचे शेवटचे वास्तव्य नांदेड येथे राहिले आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या हौतात्म्याचे संस्मरण करताना श्री गुरु गोविंदसिंघजी यांचे विचारदेखील आपण आत्मसात केले पाहिजेत. हुजुर साहिब, नांदेड येथील मुख्य गुरुद्वारा एक तख्त (धर्मपीठ) या मोठ्या तीर्थस्थानी "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा 350वा शहीदी समागम दिवस सर्व भक्त-भाविकांसाठी एक पवित्र तीर्थयात्रा ठरली आहे.
- सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री