राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांची अमर शहादत

    28-Feb-2026
Total Views |
Guru Tegh Bahadur
 
शिखांचे नववे धर्मगुरु श्री गुरु तेग बहादूर यांनी धर्मसंरक्षणासाठी ‌‘शहादत‌’ स्वीकारली. त्यांनी दिलेल्या या सर्वोच्च बलिदानामुळेच त्यांना ‌‘हिंद-दी-चादर‌’ अर्थात ‌‘हिंदुस्थानच्या धर्म-संस्कृतीचे रक्षण करणारी ढाल‌’ म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350व्या समागम शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, खारघर, नवी मुंबई येथे दि. 28 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत शासन स्तरावरून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या अमर शहादतीचे स्मरण करणारा हा लेख...
“जिन्हूं न निंदा दुखी करदी हैं,
 
न उसतत खूश करदी हैं
जो मान-अपमान नूं बराबर समझदा हैं|”
 
या ‌‘गुरुबाणी‌’तील ओळींमधून नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी स्थिरचित्त, निर्भय आणि निःस्पृह जीवनाचा आदर्श समाजासमोर ठेवला. निंदा-स्तुती, हर्ष-शोक, मान-अपमान यापलीकडे जाऊन सत्यासाठी उभे राहण्याची शिकवण त्यांनी केवळ शब्दांनी नाही, तर आपल्या जीवनातून आणि ‌‘शहिदी‌’तून दिली.
 
त्यागमल ते ‌‘तेग बहादूर‌’ -
शौर्य आणि अध्यात्माचा संगम
 
सहावे गुरू श्री गुरू हरगोबिंदजी यांच्या पुत्राचे बालनाव ‌‘त्यागमल‌’ होते. करतारपूरच्या युद्धात त्यांनी दाखवलेल्या अद्वितीय पराक्रमामुळे त्यांना ‌‘तेग बहादूर‌’ म्हणजेच ‌‘शूर तलवारबाज‌’ हे नाव प्राप्त झाले. शौर्य आणि त्याग यांचा अद्वितीय संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. आठवे गुरू श्री गुरू हरकृष्णजी यांच्या निधनानंतर 1665 मध्ये ते ‌‘गुरुगादी‌’वर विराजमान झाले.  पंजाबमधील बाबा बकाला येथे त्यांनी ‌‘नववे गुरू‌’ म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि शीख पंथाला नवे आध्यात्मिक नेतृत्व दिले.
 
‌‘एक ओंकार‌’ ते सर्वधर्मसमभाव
 
पहिले गुरू श्री गुरुनानक देवजी यांनी दिलेला ‌‘एक ओंकार‌’चा संदेश केवळ धार्मिक नव्हता, तर सामाजिक समतेचा ध्वज होता. जातपात, उच्च-नीच, भेदभाव यांच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार त्यांनी दिला. ‌‘लंगर‌’ परंपरेतून समानतेचा प्रत्यक्ष अनुभव दिला. हीच परंपरा पुढे नेत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे रक्षण आपले ध्येय मानले.
 
अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा
 
मुघलकालीन दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा निरपराध नागरिकांवर अन्याय होत होता, तेव्हा जनतेने श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांना साद घातली. त्यांनी दिल्लीकडे प्रस्थान केले आणि धर्मस्वातंत्र्यासाठी निर्भयपणे उभे राहिले. त्यांचे सहकारी भाई मतिदास, भाई सतीदास आणि भाई दयाला यांना अमानुष छळ सहन करावा लागला; पण गुरुजी डगमगले नाहीत. दि. 11 नोव्हेंबर 1675 रोजी दिल्लीतील चांदनी चौक येथे, आज जिथे गुरुद्वारा ‌‘शीश गंज साहिब‌’ उभा आहे, त्याठिकाणी त्यांनी ‌‘शिर‌’ अर्पण केले. त्यांनी धर्मांतर किंवा चमत्कार दाखवण्यास नकार देत, ‌‘शहादत‌’ स्वीकारली. त्यांच्या या सर्वोच्च त्यागामुळे त्यांना ‌‘हिंद-दी-चादर‌’ ही पदवी लाभली, म्हणजेच ‌‘हिंदुस्थानच्या धर्म-संस्कृतीचे रक्षण करणारी ढाल.‌’
 
अंतिम संस्कार आणि अमर स्मृती
 
‌‘शहादती‌’नंतर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम संस्कार करण्यास बंदी होती. परंतु, लखी शाह बंजारा यांनी आपल्या घराला अग्नी देऊन गुरुजींचे अंत्यसंस्कार केले. त्या स्थळी आज गुरुद्वारा ‌‘रकाब गंज साहिब‌’ उभारण्यात आला आहे. त्यांचे ‌‘शिर‌’ भाई जैताजी यांनी आनंदपूर साहिब येथे नेऊन दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंह यांच्याकडे सुपूर्द केले. त्याठिकाणी आज ‌‘आनंदपूर साहिब‌’ हे पवित्र स्थळ आहे. श्री गुरू गोविंद सिंह यांनी त्यांच्या ‌‘दोह्या‌’त लिहिले :
 
शीख दिया पर सिरर न दिया,
धर्म हेतु साका जिन किया|
बलिदानाचा खरा अर्थ
 
श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हते; ते असहिष्णुतेच्या विचारसरणीच्या विरुद्ध होते. त्यांनी केवळ आपले ‌‘शिर‌’ दिले नाही, तर जगण्याचा मार्ग दिला; अन्यायासमोर न झुकण्याचा, सत्यासाठी उभे राहण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा. भारतीय संस्कृती ‌‘वसुधैव कुटुम्बकम्‌‍‌’, सर्वधर्मसमभाव आणि सहजीवनाचा संदेश देते. हजारो मतमतांतरे असूनही एकत्र राहण्याची क्षमता, हीच भारतीयत्वाची खरी ओळख आहे.
 
आजच्या पिढीसाठी संदेश
 
भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहत आहे; परंतु विकास केवळ आर्थिक नसतो, तो मूल्याधिष्ठित असतो. सत्य, साहस, त्याग, कर्तव्य आणि समभाव हीच गुरुपरंपरेची देणगी आहे. आजच्या युवकांसाठी श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांची ‌‘शहादत‌’ ही केवळ इतिहासातील घटना नाही, ती जीवनाची दिशा आहे.
 
संत भगत नामदेवांचा संदेश
संत भगत नामदेव म्हणतात : 
 
ऐसा गुरू वडभागी पाइआ,
जिनि हउमै मारि सबदि मिलाइआ|
 
अहंकार नष्ट करून परमसत्याशी एकरूप करणारा गुरू भाग्यानेच लाभतो. श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे जीवन हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान हे भारतीय इतिहासातील सुवर्णपान आहे. त्यांच्या ‌‘शहादती‌’तून आपण असा भारत घडवण्याची प्रतिज्ञा करूया, जिथे सहिष्णुता, न्याय, मानवाधिकार आणि वैश्विक शांतता सर्वोच्च असतील. हीच त्यांना खरी आदरांजली.
 
ऐतिहासिक नातं
 
‌‘हिंद-दी-चादर‌’ कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण राज्यशासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्वातंत्र्याची जपणूक, श्रद्धेचे स्वातंत्र्य, मानवतेचे रक्षण व मानवी प्रतिष्ठेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च ‌‘शहिदी‌’चे हे कालातीत प्रतीक आहे.
 
हा ऐतिहासिक स्मरणोत्सव बहुदिवसीय, व्यापक स्वरूपातील सार्वजनिक कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात येत असून, त्यामध्ये आध्यात्मिक साधना, ऐतिहासिक जागृती, युवकांचा सहभाग, तसेच सामाजिक एकात्मता यांचा समन्वय साधण्यात येत आहे. प्रथमच या उपक्रमांच्या माध्यमातून शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, तसेच भगत नामदेव संप्रदाय अशा श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्याशी ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक नाते असलेल्या समुदायांना एका व्यासपीठावर आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. 350 वर्षांनंतर या ऐतिहासिक नात्याचे पुनरुज्जीवन व बळकटीकरण करण्याचा राज्यशासनाचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
 
या कार्यक्रमांमध्ये आध्यात्मिक प्रवचने, कीर्तन, ऐतिहासिक प्रदर्शन, शैक्षणिक सादरीकरणे, तसेच समुदाय संवाद यांचा समावेश असून, श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे जीवन, कार्य, शिकवण व त्याग यांचे सखोल दर्शन घडविले जात आहे. गुरुजींच्या ‌‘शहिदी‌’चे ऐतिहासिक महत्त्व व संविधानिक मूल्ये-धर्मस्वातंत्र्य, समानता व न्याय यांच्याशी असलेले त्यांचे नाते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.
 
या कार्यक्रमातून गुरुजींच्या काळात बंजारा व लबाना समाजाने दिलेल्या सहकार्यावर प्रकाश टाकण्यात येत आहे. तसेच औरंगजेबाच्या राजवटीत अत्यंत धोकादायक परिस्थितीतही श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे अंत्यसंस्कार पार पाडणाऱ्यांनी दाखविलेल्या अपूर्व धैर्याचा गौरव करण्यात येत आहे. यासोबतच, श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत खंबीरपणे सोबत राहिलेल्या मोहयाल समाजातील भाई मतिदासजी, भाई सतीदासजी व भाई दयालाजी यांच्या सर्वोच्च ‌‘शहिदी‌’लाही मानवंदना देण्यात येत आहे. श्री गुरुनानक देवजी यांच्या परंपरेनुसार सिंधी समाज हा या उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे. ‌‘गुरुनानक नाम लेवा संगत‌’ या संकल्पनेखाली या शिकवणींवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना एका समान व्यासपीठावर आणण्यात येत आहे.
 
या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे सेवाभावनेतून आयोजित करण्यात येणारा भव्य ‌‘लंगर‌’, जो गुरुजींच्या समानता, करुणा व निःस्वार्थ सेवेच्या मूल्यांचे प्रतीक आहे. केंद्र सरकारतर्फेदेखील विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले असून, श्री गुरू तेग बहादूरजींशी संबंधित ‌‘कर्तारपूर कॉरिडोर‌’चे काम पूर्ण करणे असो, हेमकुंड साहिब येथे रोपवे प्रकल्पाचे बांधकाम असो, किंवा आनंदपूर साहिब येथील ‌‘विरासत-ए-खालसा‌’ संग्रहालयाचा विस्तार असो, अशा गुरूंच्या प्रत्येक पवित्र स्थळाला आधुनिक भारताच्या दृष्टिकोनाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
 
 
- देवेंद्र फडणवीस मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र