मुंबई : (Devendra Fadnavis) महामार्गांवरील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्याकडे मानक कार्यप्रणाली (एसओपी) नाही. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्याने उद्धभवलेल्या परिस्थितीतून आपल्याला एक शिकवण मिळाली असून भविष्यात अशी परिस्थिती हाताळण्यासाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश सर्व वाहतूक कंपन्यांना दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. (Devendra Fadnavis)
आ. अमीत साटम यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. ते म्हणाले की, "३ फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रोपोलिनचा टँकर उलटल्याने त्यातून होणाऱ्या वायू गळतीमुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. यादरम्यान, तिथली वाहतूक थांबवली होती. त्यामुळे अशा प्रकारे द्रुतगती मार्गावर घातक आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होत असताना त्यांची तपासणी करण्याची व्यवस्था आहे का? या घटनेवेळी ही व्यवस्था कार्यान्वित होती का? आणि अशा प्रकारे घातक आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्याची नियमावली आहे का?" (Devendra Fadnavis)
यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. "संबंधित टँकरने आवश्यक परवाना घेतला होता आणि त्याची नियमित तपासणीही होते. वाहनचालकाचा तोल गेल्याने टँकर पलटी झाला, मात्र अधिकाऱ्यांनी आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी उपाययोजना करून ज्वलनशील पदार्थ सुरक्षितपणे हलवले. तसेच या घटनेदरम्यान निर्माण झालेल्या ३६ तासांच्या वाहतूक कोंडीच्या काळात वसूल केलेला टोल परत करण्याचा निर्णय एमएसआरडीसीमार्फत घेण्यात आला. काही देशांमध्ये अशा परिस्थितीत टँकर एअर लिफ्ट करण्याची पद्धत असून, त्या दृष्टीनेही एमएसआरडीसीमार्फत चाचपणी केली जाणार आहे," असेही त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्याकडे अशी वाहतूक करणाऱ्या केंद्रीय कंपन्यांकडेही अशा परिस्थितीत हवी असलेली साधने नव्हती. त्यामुळे यातून आपल्याला एक शिकवण मिळाली. अशी वाहतूक होत असताना एखादा अपघात झाल्यास तेव्हा काय करावे याची मानक कार्यप्रणालीच (एसओपी) नाही. इतके वर्ष वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडेही ही कार्यप्रणाली नाही. यातील बहुतांश कंपन्या केंद्र सरकारच्या आहेत. त्यामुळे असा परिस्थितीत बचावाची साधने त्यांच्याकडे असावीत आणि त्या परिस्थितीत पुढची कार्यप्रणाली काय असावी हे ठरवण्याचे आदेश या कंपन्यांना दिले आहेत." (Devendra Fadnavis)
आ. जयंत पाटील यांनीही या चर्चेत सहभाग घेत महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले ते म्हणाले की, "या घटनांमध्ये झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कुणालाही घटनास्थळी पोहोचणे शक्य नसते. त्यामुळे अशावेळी पोलिसांना किंवा इतर यंत्रणांना तिथे जाण्यासाठी एखाद्या विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून, मुंबई महापालिकेच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर कुठेही वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवल्यास तिथे पोहोचण्यासाठी हे हेलिकॉप्टर २४ तास कार्यरत असेल. तसेच प्रवाशांना वेळोवेळी माहिती मिळण्यासाठी साइनबोर्डची व्यवस्था असावी." (Devendra Fadnavis)
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आपल्या देशामध्ये सुर्यास्तानंतर हेलिकॉप्टर वापरता येत नाही. ही देशातील मोठी समस्या आहे. अन्यथा, आपल्याकडे हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. दुसरे म्हणजे, आता आपण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) लावलेली आहे. याचा उपयोग करून आपल्याला लवकरात लवकर लोकांपर्यंत माहिती पोहोचवता येते. आपल्याला वाहतूक विभागणी, वाहतूक थांबवणे आणि वाहतूक वळवणे शक्य आहे. या घटनेच्या वेळीसुद्धा ते केले पण उशीरा केले, असे माझे मत आहे. तसेच यासाठीचा पर्यायी मार्ग काढला तरी तो खूप फिरून आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आयटीएमएसचा उपयोग करून अगदी एकट्या व्यक्तीपर्यंतही कसा संदेश जाऊ शकेल, अशा प्रकारची सुविधा तयार करण्याचे आदेश देण्यात येतील." (Devendra Fadnavis)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....