तत्त्वनिष्ठ संघर्षाचा पांथस्थ!

    28-Feb-2026
Total Views |
Hemant Chopade
 
स्वाभिमान अंगी बाणवत, न थकता मार्गक्रमण करत, इतरांना आपले विचार आणि साहित्यातून प्रेरणा देणारे तत्त्वनिष्ठ संघर्षाचे पांथस्थ हेमंत चोपडे यांच्याविषयी...
 
लहानपणापासून कीर्तनकार आणि शिक्षक अशा संस्कारक्षम घरात जन्मलेल्या हेमंत चोपडे यांच्यात संवेदना, अहिंसा, कणव यांसोबतच राष्ट्रप्रेमाची जाणीव दृढ होत गेली. नांदुरा तालुक्यातील कोळंबा या गावात त्यांचे बालपण गेले. याच गावात त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. सातवीला बोर्डाची परीक्षा होती. त्या काळात इंदिरा गांधी यांच्या ‌‘नसबंदी‌’ मोहिमेमुळे शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर धरपकड झाल्याने गणिताचे शिक्षक वर्षभर शाळेपासून दूर होते. परिणामी, गणिताचा बोर्डाचा पेपर मोठे आव्हान ठरला. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले सातवीचे गणित शिक्षक स्वतः त्यांचे वडील असूनही, वर्षभरात त्यांना गणित विचारण्याची किंवा त्यांनी शिकवण्याची पद्धत नव्हती. तरीही, इयत्ता दहावीमध्ये प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर आजोबांपासून चालत आलेली शिक्षकपरंपरा पुढे न्यायची, अशी वडिलांची इच्छा होती.
 
त्यांनी तालुक्याच्या गावी ‌‘गणित‌’ विषयात पदवी पूर्ण केली आणि ‌‘विदर्भाचे पुणे‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयातून गणितात पदव्युत्तर पदवी संपादन केली. अकरावीत असताना हेमंत यांनी संघस्थानावर ध्वज उभारून दलित वस्तीमधील मुलांना एकत्र खेळविण्याचा उपक्रम राबविला. त्या काळात हा बदल दुर्मीळ होता. मात्र, अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने तो प्रयोग थांबला. नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि कोठारी विज्ञान महाविद्यालय ही दोन महाविद्यालये होती. दोन्हीकडे ‌‘एनएसयूआय‌’ची सत्ता होती. तालुका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून हेमंत चोपडे यांच्या नेतृत्वाखाली तीनही वर्षे दोन्ही महाविद्यालयांत ‌‘अभाविप‌’ची सत्ता आली. याचे श्रेय ते तत्कालीन सहकारी डोंगरकर, सारभूकन आणि माजी नगराध्यक्ष वामनराव यांना देतात. शेवटच्या वर्षी संस्थेने ऐनवेळी विज्ञान महाविद्यालय बंद केले. मार्गदर्शक प्राध्यापक संस्थेशी संबंधित असल्याने विद्यार्थी संघटनेने विरोध करू नये, अशा सूचना मिळाल्यानंतरही हेमंत यांनी त्याविरोधात आंदोलन छेडले.
 
बंद साखळी आणि आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तीन-चार महिन्यांनी महाविद्यालय पुन्हा सुरू झाले. विद्यार्थी-जीवनातील हा त्यांचा पहिला मोठा विजय ठरला. या लढ्यासाठी त्यांचे ज्येष्ठ बंधू दादा मुकुंदराव यांचे मार्गदर्शन लाभले. तीनही वर्षे महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवत, त्यांनी अकोला येथील शासकीय शिक्षण महाविद्यालयातून ‌‘शिक्षण‌’ विषयात पदवी घेतली. शासनाकडून शिक्षकभरती नसल्याने सिंदखेडराजा जवळ खासगी संस्थेत नोकरी स्वीकारली. मात्र, फसवणूक झाल्याने वर्षभरातच नोकरी सोडली. पुढे तालुक्यातील अध्यापक विद्यालयात दोन वर्षे प्राध्यापक म्हणून कार्य करताना शिक्षणाच्या सर्व अंगांचा सखोल अभ्यास केला. 1991 मध्ये प्रत्येक जिल्ह्यात ‌‘मिलिटरी ज्युनिअर कॉलेज‌’ सुरू करण्याची मागणी करणारा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. दि. 15 ऑगस्ट 1993 रोजी ‌‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल‌’मध्ये त्यांची नियुक्ती झाली. योगशिक्षक, पी.टी. शिक्षक, ग्रंथपाल, इंग्रजी-मराठी-विज्ञान शिक्षक, गिर्यारोहण प्रशिक्षण (उत्तरकाशी) अशा विविध क्षेत्रांत त्यांनी प्रावीण्य मिळवले. आपल्या 16 वर्षांच्या सेवेनंतर दि. 11 जून 2009 रोजी शहापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद आदिवासी आश्रमशाळा, चिंध्याची वाडी (कसारा) येथे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले.
 
एकीकडे सधन विद्यार्थ्यांची शाळा; तर दुसरीकडे अत्यंत गरीब आदिवासी विद्यार्थ्यांची ‌‘निवासी शाळा‌’ असे दोन टोकांचे अनुभव त्यांनी घेतले. त्यांनी तत्त्वांशी कधी तडजोड केली नाही. मिलिटरी स्कूलमध्ये असतानाच ‌‘गवताला फुटती भाले‌’ हा काव्यसंग्रह आणि ‌‘सावरकर-आंबेडकर : एक समांतर प्रवास‌’ हा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला. आश्रमशाळेत रुजू झाल्यानंतर ‌‘भारतरत्नांच्या देशा, महाराष्ट्रातील भारत‌’ हा युवकांसाठी ग्रंथ प्रकाशित केला. गणिताच्या मूलभूत संशोधनावर आधारित ‌‘बहुपर्यायी चाचणी प्रकार‌’ या प्रबंधाला महाराष्ट्र शासनाचा ‌‘नवोपक्रम‌’ पुरस्कार मिळाला. तसेच ‌‘सर फाऊंडेशन‌’ पुरस्कार, ‌‘अंकुर वाङ्मय‌’ पुरस्कार, ‌‘हुतात्मा जगदेव भालेराव‌’ पुरस्कार, ‌‘संत तुका म्हणे‌’ पुरस्कार आदी सन्मान मिळाले. 2023 मध्ये संस्थेचा मानाचा ‌‘विवेकानंद आदर्श शिक्षक‌’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
‘शून्य-एक-अनंत प्रवास‌’ या संशोधन ग्रंथाला निवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाचा ‌‘स्व. यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार‌’ दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी मिळाला. सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांच्या ‌‘वाचनकलेचे शास्त्र‌’ आणि ‌‘चमत्कारिक व मजेशीर वैदिक गणित‌’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन झाले. नवीन पेन्शन योजनेतून निवृत्त होणारे ते पहिले शिक्षक असल्याने शासन-निर्णय उपलब्ध नव्हते. त्यांनी आयुक्त, आदिवासी सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पाठपुरावा करून ‌‘ग्रॅच्युइटी‌’ व ‌‘डीसीपीएस‌’ ते ‌‘एनपीएस‌’ वर्गीकरणासंबंधी शासन-निर्णय काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक शिक्षकांना मार्गदर्शन केले. सावरकर, आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा सम्यक अभ्यास करताना कोणत्याही टोकाच्या विचारधारेत स्वतःला बंदिस्त न ठेवणारे, ‌‘प्रतित्यसमुत्पाद‌’ या बौद्ध वैज्ञानिक कार्यकारणभावाच्या तत्त्वांचा अभ्यास करणारे हेमंत चोपडे हे खरोखरच विरळ व्यक्तिमत्त्व आहे. यावर्षी शिक्षणव्यवस्थेचा चिकित्सक अभ्यास करणारा त्यांचा नवा ग्रंथ प्रकाशित होत आहे. तत्त्वनिष्ठ संघर्षाचा हा पांथस्थ, हेमंत चोपडे यांना स्वाभिमानाने, न थकता आपले मार्गक्रमण करण्यासाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
 
- विराम गांगुर्डे