मुंबई : (Pankaj Bhoyar) राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी दिली. विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, "राज्य सरकार धर्मांतराच्या तक्रारींची दखल घेत यासंदर्भातील कायद्याचा मसुदा आणि अंमलबजावणीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कुणाचेही नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही. परंतू , कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे."
मदरशांची पडताळणी होणार
"मदरशांमधील कामाची आणि तिथे घडणाऱ्या प्रकारांची सखोल पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मदरशात दोन लहान मुलांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल," असेही त्यांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारचा परवाना पहिल्यांदा काही दिवसांसाठी निलंबित केला जाईल. मात्र, वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळल्यास, संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा भोयर यांनी दिला.
मंत्रालयाविषयी चुकीची विधाने टाळावी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रालयाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, "मंत्रालय हे कोणाच्या विरोधात कट रचण्याचे ठिकाण नसून सर्वसामान्यांना न्याय देणारे केंद्र आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मंत्रालयाविषयी चुकीची विधाने करणे टाळावे," असेही राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....