आज दि. 27 फेब्रुवारी अर्थात ‘मराठी भाषा गौरव दिन’. आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख जपणारी मराठी भाषा समृद्ध व्हावी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी विविध क्षेत्रांतील भाषाप्रेमी अखंड कार्यरत आहेत. मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनीदेखील मराठी भाषा संवर्धनासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी डॉ. निशिगंधा वाड यांनी साधलेला हा ‘विशेष’ संवाद...
मराठी भाषेसाठी कार्य करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
‘आई’ या शब्दातील ‘आ’ हा आत्म्याचा आणि ‘ई’ हा ईश्वराचा. जे कार्य ईश्वरालाही इहलोकी पूर्ण करता येत नाही, ते पूर्ण करणारी ती आई. घरी सगळंच वातावरण मराठी भाषेला पोषक आणि प्रेरक असल्याने, भाषेची गोडी, संस्कार आणि संवेदना आपोआपच मनात रुजल्या. यात काही आमूलाग्र असे नाही, हीच तर खरी आईची आणि घरच्या संस्कारांची ताकद आहे. मराठी भाषेवरचं माझं प्रेम लहानपणापासून आहे. त्याचा वारसा घरातूनच मिळाला आमच्या घरात आजी-आजोबा, आई-वडील यांच्यामुळे, मराठी वातावरण नैसर्गिकपणे रुजलं. बाबा रोज ‘अथर्वशीर्ष’ म्हणायचे, आई लेखन करायची. आम्ही लहानपणापासून तिच्या कथा-कवितांचे श्रोते होतो. तिच्या ‘अतोल’ या कादंबरीचा शेवटही मी रडून बदलायला लावला होता, इतकं साहित्याशी नातं जडलं होतं. हीच पार्श्वभूमी मराठीबद्दलचं प्रेम अधिक घट्ट करत गेली. भाषेची गोडी ही केवळ शब्दांपुरती नसून, ती मनावर संस्कार करणारी अमोघ शक्ती असल्याचा माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच, आजही ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही संस्कारवर्ग घेताना, आधी मुलांना शुद्ध मातृभाषेचीच ओळख करून देतो.
डॉ. विजया वाड, नीला सत्यनारायण, डॉ. स्नेहलता देशमुख आणि इतर सहकाऱ्यांसोबत, आम्ही भाषेचा प्रसार करतो आहोत. आमचा प्रयत्न आहे की, मराठीची गोडी प्रत्येक मुलापर्यंत, अगदी विशेष गरज असलेल्या मुलांपर्यंतही पोहोचावी. कारण, भाषा मनाला आनंद देते आणि त्यातूनच चांगल्या विचार आणि आचारांचा जन्म होतो. आपण एक मूलभूत विचार केला तर एक साहजिक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, ज्ञानेश्वर माऊलींना ‘गीता’ मराठीत का लिहावीशी वाटली? कारण, ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, समजावं, आत्मसात व्हावं म्हणूनच ना? यासाठीच त्यांनी संस्कृतमधील ‘भगवद्गीते’चं रूपांतर लोकभाषेत केलं. साहित्य म्हणजे ‘स-हित’! जे सर्वांच्या हितासाठी लिहिलं जातं ते साहित्य; असं आमच्या आईचं म्हणणं आहे. मातृभाषेतला विचार सुद्धा आईच्या दुधासारखाच मऊ, सहज आणि नैसर्गिक असतो. माणूस ज्या भाषेत विचार करतो, ती भाषा त्याच्या अस्तित्वाचा, संस्कारांचा आणि जणू त्याच्या जनुकांचाच एक भाग होते. त्यामुळेच मातृभाषेतून व्यक्त होणारा विचार अधिक खोल, जिव्हाळ्याचा आणि परिणामकारक ठरतो.
आपण करत असलेल्या मातृभाषेच्या प्रसारकार्याचं स्वरूप कसं असतं? त्याला भाषा शुद्धीकरण की संवर्धन, नेमके काय म्हणता येईल?
‘भाषा शुद्धीकरण’ वगैरे हा आपला उद्देशच नाही. अगदी संस्कृतसदृश मराठी बोललं म्हणजेच ते खरं मराठी, असंही अजिबात नाही. मुळातच भाषा ठरवणारे आपण कोण? भाषेचा खरा अर्थ काय, तर विचार पोहोचवणं. हा विचार जितका सहज, सुलभ आणि आहे तसा ज्या भाषेतून पोहोचतो, तीच भाषा खरी. बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आपल्याला आवडतात; कारण त्या साध्या, ओघवत्या आणि भावनांनी परिपूर्ण आहेत म्हणूनच. मराठी भाषेलाही कितीतरी चवी आहेत. खान्देश, मराठवाडा, विदर्भ, कोकण, घाटमाथा, कोळी, धनगर अशा विविध बोली मराठीमध्ये आहेत. प्रत्येक बोली वेगळी असली; तरीही ती तितकीच गोडही आहे. आपली मातृभाषा जर आपण अस्खलित, मनापासून बोलताना तिचा आनंद घेतला, तरच त्यातील निर्भेळ आनंद अनुभवास येतो. दुसऱ्या भाषेची छाया नको म्हणून नव्हे, तर आपल्या भाषेची गोडीही सर्वांनी अनुभवावी यासाठीच हा साधा प्रयत्न आहे. आमचा प्रयत्न भाषा शुद्धीकरण नाही, तर ते भाषेवरचं निर्व्याज प्रेम आहे.
आपल्या उपक्रमाचे नेमके स्वरूप कसे आहे?
थोडक्यात सांगायचं, तर मुलांना चांगली पुस्तकं, कवितासंग्रह, ललित निबंध वाचायला द्यायचे आणि त्यावर चर्चा घडवून आणायची. वाचनातून विचार वाढतो आणि चर्चेतून तो अधिक परिपक्व होतो. आई (डॉ. विजया वाड) तर ‘विश्वकोशा’च्या स्पर्धा घ्यायची. ती विश्वकोशाच्या अध्यक्षपदी असताना, अगदी तुरुंगातही तिने हा उपक्रम राबवला. तिने ‘विश्वकोश’ केवळ पुस्तकापुरता न ठेवता, डिजिटल करून जगभर पोहोचवला. जिथे-जिथे मराठीवर प्रेम आहे, तिथपर्यंत आज तो पोहोचला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून, विद्यार्थ्यांकडून दोन लाख पत्रं लिहून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली, हादेखील भाषाप्रेमाचाच भाग. पण, याचवेळी मराठी शाळा बंद होत आहेत, ही वस्तुस्थितीही आपण नाकारू शकत नाही. म्हणून, निदान आपली भाषा लोकांच्या मुखी असावी, लोकगंगेसारखी अखंड वाहती राहावी, हाच या सगळ्या प्रयत्नांमागाचा साधा आणि मनापासूनचा हेतू आहे.
आताच आपण म्हणालात की, मराठी शाळा बंद होत आहेत, हे आपण नाकारु शकत नाही. मग यामागची कारणे नेमकी काय? शासनाचं दुर्लक्ष की, पालकांची चूक?
मराठी शाळा बंद होत आहेत ही वस्तुस्थिती असली; तरी त्याचं सगळं खापर सरकारवर फोडणं योग्य ठरणार नाही. सरकारने दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली आहे, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. मग ती शाळा ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’ किंवा ‘एसएससी’ कोणत्याही पद्धतीची असो, मराठी शिकवणं बंधनकारक करणं हा भाषेला जपण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाचा भाग ठरतो. तरीही, आज मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या घटते आहे, यामागे सामाजिक बदल, पालकांची अपेक्षा आणि जागतिक स्पर्धा असे अनेक कारक घटक आहेत. पालकांनी आपल्या मुलांसाठी कोणती शाळा निवडावी, हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही. प्रत्येक जण आपल्या परिस्थितीनुसार निर्णय घेतो. पण, तरीही मनात एक हळवी भावना राहतेच. मातृभाषेच्या शाळेत शिकण्याचा जो अनुभव, जी गंमत आणि जी जिव्हाळ्याची नाळ असते, ती आम्ही अनुभवल्यामुळे तिची किंमत आम्हांला अधिक जाणवते. हे शल्य आहे, आरोप नसून; हा अंतर्मुख होण्याचा विषय आहे.
इंग्रजी शाळांचा कल मराठी पालकांमध्ये वाढताना दिसतो. यामागची नेमकी काय कारणे असू शकतात?
मराठी शाळांमध्ये इंग्रजी नीट शिकवलं जात नाही, हे सरसकट विधान ठरेल. इथे प्रश्न केवळ शिकवण्याच्या गुणवत्तेचा नसून, बदलत्या सामाजिक मानसिकतेचाही आहे. आपण आज स्वतःला ‘ग्लोबल व्हिलेज’चा भाग मानतो. पाल्याला भविष्यात जगाशी संवाद साधताना उत्तम इंग्रजी सहज यावं, त्याच्या करिअरमध्ये अडथळे येऊ नयेत, त्याला न्यूनगंड वाटू नये असे अनेक विचार पालकांच्या मनात असतात. जसं अमेरिकेत काही विद्याथ करिअरच्या गरजेनुसार ‘स्पॅनिश’सारखी दुसरी भाषा निवडतात, तसंच आपल्या देशात इंग्रजी माध्यम निवडण्यामागे व्यवहार्य कारणं असूच शकतात. आजच्या ‘इन्स्टंट सक्सेस’च्या युगात प्रत्येकजण आपला स्वतंत्र मार्ग आखतो. नंतर वेगळी मेहनत नको म्हणून सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमात शिक्षण असावं, अशीही विचारसरणी यामागे असू शकते. पण, याचा अर्थ मातृभाषा कमीपणाची नाही.
जर घराघरांत मराठी जपली गेली, संवाद मराठीत झाला, मुलांना वाचनाची गोडी लावली; तर शाळेचं माध्यम काहीही असले तरी भाषेची नाळ तुटणार नाही. आज आपण मुलांच्या हातात मोबाईल देतोच आहोत, तर त्यातूनही मराठी साहित्य, कथा, गाणी यांची ओळख करून देणं सहज शक्य आहे. म्हणजेच, प्रश्न स्पर्धेचा नाही, संतुलनाचा आहे. जगाशी जोडताना आपल्या मुळांशीही घट्ट राहणं, हेच खऱ्या अर्थाने भाषासंवर्धन!
अलीकडे अनेकदा मराठी चित्रपट, मालिकांमध्ये सर्रास इंग्रजी संवादांचा वापर होताना दिसतो. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचा विचार केला, तर सध्याची मराठीची स्थिती नेमकी कशी आहे?
मनोरंजन क्षेत्रातील मराठीची आजची परिस्थिती, मला अजिबातच वाईट वाटत नाही. काही चित्रपटांमध्ये इंग्रजी संवाद असतात म्हणून, संपूर्ण चित्रपटसृष्टीबद्दल नकारात्मक मत बनवणं योग्य नाही. एखाद्या कथेला, पात्राला किंवा परिस्थितीला जर तशी भाषा आवश्यक असेल, तर तो त्या कथानकाचा भाग असतो. त्यावरून सर्वसाधारण निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. मराठी चित्रपट आज आशय, विषयांची विविधता, सादरीकरण आणि जागतिक पातळीचा दर्जा या सर्व बाबतीत खूपच समृद्ध झाले आहेत. ‘कंटेंट’च्या दृष्टीने ते अधिक धाडसी, प्रयोगशील आणि व्यापकही झालेले दिसतात. आपण सगळेच आज ‘ग्लोबल सिटिझन’ झालो आहोत, तर आपला सिनेमा संकुचित कसा राहील? बदलत्या काळानुसार भाषा आणि अभिव्यक्ती बदलतात; पण त्यामुळे मराठीची श्रीमंती कमी होत नसून उलट, ती अधिक विस्तारते.
मराठी भाषेच्या नावावर आंदोलने, हिंदी-मराठी वादंगही दिसतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाकडे आपण यासाठी काय मागणी करू शकतो?
मराठी भाषेबाबत शासनाकडे काय मागणी करावी या प्रश्नाचं उत्तर देताना एक गोष्ट स्पष्ट आहे; शासन काहीच करत नाही, असं म्हणणं योग्य नाही. वेळोवेळी विविध योजना, अनुदाने, मंडळं, महामंडळं, साहित्य-विज्ञान-संस्कृतीला पोषक उपक्रम राबवले जातात, मराठी चित्रपटसृष्टीला अनुदान दिलं जातं, विविध सांस्कृतिक प्रकल्पांनाही सरकारचे पाठबळ मिळतच असतं. मराठीला ‘अभिजात भाषा’चा दर्जा मिळणं, हीसुद्धा मोठीच पायरी आहे. हे सगळं शासनाच्या प्रयत्नांशिवाय शक्यच झालं नसतं. त्यामुळे शासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे, असं म्हणणं वस्तुनिष्ठ ठरणार नाही. आंदोलनांबाबत बोलायचं तर प्रत्येक आंदोलनामागे काहीतरी विशिष्ट कारण असतं. सगळ्यांना एकाच रंगात रंगवणं योग्य नाही. मात्र, कोणताही वैयक्तिक किंवा स्थानिक वाद विकोपाला जाऊन, त्याचा राजकीय उपयोग करून घेणं मात्र सपशेल चुकीचंच आहे. माझं स्पष्ट मत इतकंच आहे की, भाषा जपणं केवळ शासनाचीच जबाबदारी नसून; ती आपल्या सर्वांची आहे. प्रत्येकाने आपली मातृभाषा जपली, तिचा अभिमान बाळगला, संवादात आणि वाचनात तिचा वापर वाढवला; तर मोठी आंदोलने करण्याची वेळच येणार नाही. मी मराठी आहे म्हणून माझी मायमराठी जपणं, ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी माझ्यासारख्यांनी हा छोटासा प्रयत्न सातत्याने करत राहणं, हाच खरा मार्ग आहे.
मी आणि माझी थोरली बहीण इंग्रजी माध्यमातून शिकलो; पण आम्ही आजही घरी मराठीच बोलतो. कारण, आई-वडिलांनी घरचं वातावरण तसंच ठेवलेलं होतं. त्यामुळे मला माझी पहिली कविता मराठीतच सुचली. कवितेला शीर्षक असतं, हेही मला माहिती नव्हतं. दुसरीत असताना मला मराठी नीट लिहिताही येत नव्हतं; पण शब्दांची गोडी कळत होती. त्यामुळे कवितादेखील मराठीतच सुचली. हा संस्कारांचा आरसाच म्हणायचा, नाही का?
- अपर्णा कड