राज्यभरात ‘मराठी भाषा गौरव दिन’ अत्यंत उत्साहात संपन्न होतो आहे. यानिमित्ताने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याचा नेमका अन्वयार्थ काय? ‘एआय’च्या वाढत्या प्रभावामुळे मराठीचे भविष्य कसे असेल? या आणि अशा अनेक प्रश्नांची महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.आज ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत डॉ. किरण कुलकर्णी यांनी साधलेला विशेष संवाद...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून दीड वर्षांचा कालावधी लोटला, मागे वळून बघताना याचा अन्वयार्थ कसा लावायचा?
मला असं वाटतं की, आपण अभिजात भाषा याचा अर्थ म्हणजे नेमका काय, हे आधी समजून घेतलं पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा जो वर्षपूर्तीचा सोहळा झाला, त्याअनुषंगाने मराठी भाषा विभागाने काही पुस्तकं-मासिकं प्रकाशित केली आहेत. यामध्ये ‘अभिजात’ या संकल्पनेचे विविध पैलू मांडले असून, त्याचा हेतूच हा आहे की, लोकांना याची माहिती मिळावी. मला असं वाटतं की, अभिजात म्हणजे काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती एखाद्या कलाकृतीने काही नवीन संकेत रूढ केले, तर अशी भाषा जिवंत आहे, असे गृहीत धरून त्याला अभिजात म्हणावं; असं मला वाटतं. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अर्थ, केंद्र सरकारच्या अभिजात भाषेच्या योजनेमध्ये आपल्या भाषेचा समावेश झाला. आता या संदर्भातली केंद्र सरकारची योजना अगदी साधी, सोपी व सरळ आहे. त्या योजनेअंतर्गत कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, त्या भाषेसाठी एक ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स केंद्र’ सरकारतर्फे निर्माण केले जाते. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडून प्राप्त होणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे आपण आपल्या भाषेचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. येत्या काही महिन्यांत केंद्र सरकारकडून या संदर्भातली अधिसूचना जाहीर होणं अपेक्षित आहे. यानंतर भाषेच्या जतन-संवर्धनासाठीचे जे वेगवेगळे प्रकल्प हाती घ्यायचे आहेत, त्या संदर्भातील प्रस्ताव या ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’च्या माध्यमातूनच पाठवावे लागतात. त्याचीदेखील पूर्वतयारी आपण केलेली आहे.
यामध्ये मराठी भाषा विभागाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे?
या संदर्भात मराठी भाषा विभागापुढे खरोखरच एक वेगळ्याच प्रकारचं आव्हान उभं आहे. भाषेच्या जतन-संवर्धनासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेणं, त्यासंदर्भात तज्ज्ञांशी, साहित्यिकांशी चर्चा करणं, यातूनच आपलं काम सध्या सुरू आहे. मला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की, आपला सविस्तर प्रकल्प आराखडा ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’च्या माध्यमातून पाठवण्याचं काम आपल्याला करायचं असून, त्याचे कार्य अंतिम टप्प्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, मराठी भाषिक उत्साही असल्यामुळे केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता, राज्य सरकारच्या पातळीवरसुद्धा लोकसहकार्याने, भाषा विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहे. या उपक्रमांची माहिती ‘आकाशवाणी’वर आपण दररविवारी सकाळी देत असतो. आमच्या संकेतस्थळावरदेखील या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आपण अनेक उपक्रम राबवत असतो. माझं तर लोकांनादेखील सांगणं आहे की, त्यांच्या मनातदेखील काही नावीन्यपूर्ण उपक्रम असतील, तर निश्चितपणे त्यांनी आम्हाला सांगावं.
‘नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन’च्या माध्यमातून सुरू झालेल्या ‘भाषिणी अॅप’ची सध्या बरीच चर्चा होत आहे, त्याबद्दल काय सांगाल?
‘भाषिणी अॅप’ हे केंद्र सरकारचे अनुवादासाठीचे अॅप असून, त्यामध्ये एकूण ३७ भाषांचा समावेश आहे. ज्यापैकी २२ भाषा भारतीय आणि १५ परकीय आहेत. या अॅपचं काम कसं चालतं, हे आम्ही दिल्लीतील तज्ज्ञांकडून समजून घेतलं. आमच्या असं लक्षात आलं की, शब्दसाठा यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे. सगळ्याच भाषांच्या बाबतीत ४० एक हजार शब्दांचा साठा ‘भाषिणी’कडे असून, त्याच्याच बळावर अनुवादाचे कार्य सुलभ होते. आमच्याकडे जे पारिभाषिक कोश आहेत, त्यातील शब्दांची संख्या तीन लाखांपर्यंत जाते. आता ‘भाषिणी’ला ज्या पद्धतीने हा शब्दसाठा हवा आहे, त्याअनुषंगाने हे शब्द पुरवण्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे त्यातील भाषेची तथा भाषांतराची गुणवत्ता वाढणार आहे.
आता यातील दुसरा भाग असा की, महाराष्ट्रामध्ये अनेक बोलीभाषा आहेत. या बोलीभाषेतील शब्दांचे उच्चार, लहेजा हे सगळं ‘भाषिणी’ला कळावं म्हणून आम्ही काम हाती घेतलं आहे. या संदर्भात आम्हाला दिल्लीतील तज्ज्ञांनी अशी माहिती दिली की, या प्रक्रियेमध्ये मराठीचं जे काम होतं आहे, ते गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकाचं आहे. याचं कारण असं की, आपण सर्व क्षेत्रातील मराठी भाषेचे शब्द यामध्ये समाविष्ट करत आहोत, त्यामुळे डिजिटल मराठीच्या भविष्यासाठी हे काम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
भाषा हा बर्याचदा समाजकारणाचा, राजकारणाचा विषय होतो आणि त्यातून अनेक प्रवाह जन्माला येतात, यामुळेच प्रसंगी समाजात दुफळीही निर्माण होते. मात्र, भाषा हे समाजाला जोडण्याचं माध्यम कशाप्रकारे होऊ शकेल?
भाषा हे लोकांना जोडण्याचंच माध्यम होतं, आहे आणि राहील. मी असं कायम म्हणतो की, शासन व्यवस्था, समाजव्यवस्था उदयाला येण्यापूर्वीपासून भाषा अस्तित्वात आहे. भाषा हा मानवी प्रज्ञेचा विलास असल्याचं माझं ठाम मत आहे. माझं माझ्या मातृभाषेवर प्रेम आहे; याचाच खरा अर्थ, माझं कोणत्याही भाषेवर प्रेम आहे असाच होतो. अभिजात भाषांचा अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की, अनेक भाषा-भगिनी स्वकीय तथा परकीय अस्तित्वात आहेत. वेगवेगळ्या भाषेतील शब्दसंपदेमुळे आपली भाषासुद्धा समृद्ध झाली. म्हणूनच, गेल्या ऑक्टोबरमध्ये अभिजात भाषा सप्ताहाच्या निमित्ताने, सर्व ११ अभिजात भाषांचं एक संमेलन घेतलं. प्रत्येक भाषेचे पाच तज्ज्ञ असे ५५ तज्ज्ञ या संमेलनाला उपस्थित होते. त्यामध्ये या भाषांची आपापसातली देवाणघेवाण अधिक स्पष्ट झाली. त्यामुळे अभिजात भाषांना जोडण्याचं काम मराठीने केलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
अभिजात मराठी भाषेचा हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीला देत असताना इथल्या सामान्य माणसाची भूमिका नेमकी काय असली पाहिजे?
आपण सारेच या भाषेची लेकरं आहोत. भाषेचा प्रवाह अनेक वळणं घेतो, भाषा काळाच्या ओघात समृद्ध होते. त्यामुळे भाषेच्या संवर्धनासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्नरत राहायला पाहिजे. आजच्या डिजिटल मराठीच्या पार्श्वभूमीवर सांगायचं झालं, तर मोबाईलवरती टाईप करताना आपण जितके जास्तीत-जास्त मराठी शब्द वापरू, तेवढी डिजिटल शब्दसाठ्यामध्ये भर पडणार आहे. मध्यंतरी माझ्या एका व्याख्यानामध्ये मी म्हटलं की, घरातली गृहिणीसुद्धा या माध्यमातून शब्दसाठ्यामध्ये भर घालू शकते. उदाहरणार्थ ‘ओग्राळं’, ‘तपेलं’ हे शब्द. भाषेचा हा समृद्ध वारसा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो.