मुंबई (ओंकार मुळ्ये) : रमजान महिन्यातच मुंबईतील नळ बाजार परिसरात गोमांस आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे संशयित गोमांसाचा साठा जप्त करण्यात आला. सदर प्रकरणाची पोलिसांद्वारे चौकशी सुरु असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी माहिती आहे की, ज्यावेळी गोरक्षक घटनास्थळी पोहोचले तेव्हा धर्मांध मुस्लिमांचा जमावाने त्यांना मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेश पाल यांना नळबाजारातील शॉप क्रमांक ०५ (मक्का मेडिकल) येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी इतर कार्यकर्त्यांना कळवून पहाटे घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही तत्काळ माहिती देण्यात आली आणि तेही घटनास्थळी दाखल झाले.
संबंधित दुकानातील तीन जण संशयित गोवंशीय मांस वजन करून दुचाकींवर चढवत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. त्याचवेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर इसमांनी आजुबाजुच्या लोकांना जमवुन घटनास्थळी गर्दी केली व गोरक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळाचा फायदा घेत एक जण स्कुटरसह तर इतर दोघे घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी तत्काळ दुकान सील केल्याची माहिती आहे.
फरार तीन आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम २२१ आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ अन्वये कलम ५ ब अंतर्गत सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
हे आमचे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात गौमातेला ‘राज्यमाता’चा दर्जा देण्यात आला असतानाही राज्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होताना दिसतायत. गोरक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसाई पकडण्यात सक्षम असतात; मात्र पोलीस प्रशासनातील काही ठराविक अधिकाऱ्यांच्या संगनमताने कसाई खुलेआम गोहत्या करून मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत पुरवठा करत असल्याचे दिसतेय. या प्रकरणाकडे शासन-प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
– रुपेश दुबे, गोरक्षक, मीरा-भाईंदर
कठोर कारवाई करणे आवश्यक
भाजपचा पदाधिकारी मी नंतर असून सर्वप्रथम मी एक गोरक्षक आणि स्वयंसेवक आहे. कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मी या घटनेची तीव्र भाषेत निंदा करतो. घडलेल्या घटनेकडे कुठलाही धार्मिक रंग देण्याचा आमचा प्रयत्न नाही, कुठल्याही धार्मिक सणामध्ये आम्हाला बाधा आणायची नाही; परंतु जर अशाप्रकारे गौतस्करी होत असेल आणि गौमातेची कत्तल होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. गोहत्या विरोधी कायदा लागू करण्याबाबत सरकारची हालचाल सुरु आहेच, मात्र अशा घटनांविरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक