satara - साताऱ्यातील किरकसालने मोजली गावातील तरसांची संख्या; महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

    26-Feb-2026
Total Views |
 kiraksal satara
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सातारा जिल्ह्यातील किरकसाल या गावाने आपल्या गावातील माळरानांवर अधिवास करणाऱ्या तरसांची संख्या मोजली आहे (kiraksal satara). राज्यात एकीकडे वाघ-बिबट्यांची गणना होत असताना तरस गणनेचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे (kiraksal satara). या गावाने वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनासाठी राबवलेलं मॉडेल हे गावपातळीवर राबवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संवर्धनाच्या कामाला दिशा दाखवणार ठरले आहे. (kiraksal satara)
 
 
 
माण तालुक्यातील किरकसाल हे गाव गवताळ भूमी संवर्धन आणि संरक्षणासाठी राबविण्यात येणार्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखले जाते. किरकसालची जैवविविधता नोंदवही तयार करण्याच्या निमित्ताने गावातील तरुण एकत्र आले. ही नोंदवही तयार करता करता संपूर्ण गावच त्यांच्या या कार्यात सहभागी झाले. यामाध्यमातून त्यांनी गावातील वन्यजीव आणि जैवविविधता संशोधनासाठी मोहिमेच सुरू केली. या मोहिमेचा एक भाग म्हणून गावातील तरुणांनी डब्लूडब्लूएफ इंडियाच्या आर्थिक पाठबळावर आणि सातारा वन विभाग, किरसकसाल जैवविविधता समिती व किरकसाल ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात एक प्रकल्प राबवला. त्याचे नाव होते, किरकसाल काॅन्झर्वेशन प्रकल्प. या प्रकल्पाअंतर्गत किरकसालच्या १८.२ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या प्रदेशावरील जैवविविधतेची तपशीलवारपणे नोंद करण्यात आली. मुख्य संशोधक चिन्मय सावंतसोबत फिल्ड बायोलाॅजिस्ट नयन उपाध्ये, अर्णव गंधे, अनीत बनसोडे आणि फिल्ड एस्टिन्टंट अभिजीत विजय माने व प्रथमेश हनुमंत काटकर यांनी हे शोध कार्य पूर्ण केले.
 
 
 
या प्रकल्पाअतंर्गत पक्ष्यांच्या २१२ प्रजाती, फुलपाखरांच्या ९१ प्रजाती, किटकांच्या ५६ प्रजाती, चतुरांच्या १५ प्रजाती, कोळ्याच्या १३ प्रजाती, सरीसृपांच्या ३४ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या १८ प्रजाती, माशांच्या ७ प्रजाती आणि वनस्पतीच्या १६० प्रजाती नोंदवण्यात आल्या. सस्तन प्राण्यांच्या नोंदीसाठी कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यासाठी १२ कॅमेरा ट्रॅप वापरण्यात आले. या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये निरनिराळ्या प्राण्यांचे फोटो टिपले गेले. त्यामधील तरस या प्राण्यांची संख्या मोजण्याचे काम तरुण संशोधकांनी केले. कारण, वाघांप्रमाणे भारतातील तरसाच्या अंगावर पट्टेरी रचना असतात. म्हणूनच त्याला भारतीय पट्टेरी तरस असे म्हणतात. वाघांप्रमाणे या प्रत्येक तरसाच्या अंगावरील पट्टेरी रचना वेगवेगळी असते आणि या विशिष्ट पट्टेरी रचनेवरुनच त्यांची स्वतंत्र ओळख पटवता येते. स्वतंत्र ओळख पटवलेल्या सात तरसांना वेगवेगळा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील तरसाची संख्या मोजण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. किरकसाल हे गाव अशाच जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने निरनिराळे माॅडेल विकसित करण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे अशा माॅडेलला राज्यस्तरावर अवलंबण्याची गरज आहे.
 
 
 
दोन वर्ष राबवलेल्या या प्रयोगामध्ये हंगामानुसार कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात आले. लावलेल्या १२ कॅमेरा ट्रॅपमध्ये तरसांची ५३ छायाचित्र टिपण्यात आली. या छायाचित्राद्वारे आम्ही तरसाच्या शरीरावरील निरनिराळ्या पट्टेरी रचना तपासून त्याव्दारे सात तरसांची संख्या मोजली. यामध्ये पाच प्रौढ आणि दोन निमवयस्क तरस आहेत. हे सगळे तरस किरकसालच्या गवताळ प्रदेशातील स्थानिक तरस आहेत. थोडक्यात वर्षभर आम्ही या तरसांची नोंद केली, त्यांच्या विणीच्या जागांची नोंद केली आणि त्यांच्या वर्तवणूकीचा अभ्यास केला - चिन्मय सावंत, वन्यजीव संशोधक, किरकसाल