जेरुसलेम, इस्रायल : ( PM Narendra Modi Israel Honor ) भारत–इस्रायल संबंधांना नवे बळ देणाऱ्या ऐतिहासिक घडामोडीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या संसदेच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. इस्रायलची संसद म्हणजेच Knesset (नेसेट) चे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी त्यांना “स्पीकर ऑफ द नेसेट” हे सर्वोच्च पदक प्रदान केले. हा सन्मान स्वीकारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान तसेच हे पदक मिळवणारे पहिले जागतिक नेते ठरले आहेत.
नेसेटमध्ये ऐतिहासिक क्षण!
पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसद, नेसेटला संबोधित केले, जिथे त्यांना संसदेचा सर्वोच्च सन्मान, नेसेट पदक अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले. नेसेटला संबोधित करताना मोदींनी इस्रायलवरील हमास हल्ल्याचा निषेध केला. भारत–इस्रायल सामरिक संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेत हा बहुमान देण्यात आला. संरक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेती, जलव्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्य या क्षेत्रांत दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सभापती अमीर ओहाना यांनी नमूद केले.
सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदी यांनी हा गौरव विनम्रतेने स्वीकारत असल्याचे सांगितले. त्यांनी हा सन्मान भारत–इस्रायल मैत्रीला समर्पित असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या भाषणानंतर नेसेटमधील सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
दहशतवादाविरोधात ठाम भूमिका
नेसेटला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. “भारताला अनेक वर्षे दहशतवादाचा सामना करावा लागला आहे. आम्ही तुमचे दुःख समजू शकतो आणि भारत इस्रायलसोबत ठामपणे उभा आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने दोन्ही देशांतील सुरक्षा सहकार्य अधिक दृढ होण्याचे संकेत मिळाले.
दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यावर तेल अवीव येथे दाखल झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः विमानतळावर त्यांचे स्वागत केले. “नमस्ते” आणि “शालोम” असा संदेश देत दोन्ही देशांनी परस्पर स्नेह व्यक्त केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली. संरक्षण सहकार्य, प्रगत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि दहशतवादविरोधी उपाययोजना यांसारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींना पॅलेस्टाईनकडूनही सर्वोच्च सन्मान
दरम्यान, पॅलेस्टाईन कडूनही पंतप्रधान मोदी यांना २०१८ मध्ये ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ हा विदेशी नेत्यासाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्हीं देशांकडून सर्वोच्च सन्मान प्राप्त करणाऱ्या मोजक्या जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाले आहे. विशेष म्हणजो इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही शत्रू देशांकडून त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.
सामरिक सहकार्याला नवे पर्व
या सन्मानामुळे भारत आणि इस्रायल यांच्यातील वाढते सामरिक, तांत्रिक आणि राजनैतिक सहकार्य अधोरेखित झाले आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण भागीदारी नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जलसंधारण तंत्रज्ञान या क्षेत्रांत संयुक्त प्रकल्प राबविण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत.
एकूणच, नेसेटमध्ये मिळालेला हा सर्वोच्च सन्मान भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे प्रतीक मानला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले असून, भविष्यातील सहकार्याची दिशा अधिक स्पष्ट झाली आहे.