‘एसआयआर’ समितीचे अध्यक्ष डॉ. किरीट सोमय्या मालेगावमध्ये जाणार आहेत. यावर मालेगावच्या महापौर नसरीन बानो आणि उपमहापौर ‘शान-ए-हिंद’ म्हणाल्या, “आम्ही त्यांना महापालिकेत येऊ देणार नाही, आमच्या हातात दंडुका आणि पायात चपला असतील.” काय म्हणावे? यांनी महापालिका भवन विकत घेतले आहे की, मालेगाव महापालिकेच्या कार्यालयाचा सातबाराचा उतारा यांच्या अब्बूच्या नावावर आहे का मियाच्या? मात्र, या दोघींच्या काळातच कालपरवा महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये त्यांचे कौमवाले यथासांग नमाज पढले. मालेगावचे महापौर-उपमहापौर जनतेच्या कामासाठी आहेत की धर्मांधता माजवण्यासाठी धर्मांधांच्या हातचे बाहुले आहेत? अर्थात, त्यांच्याकडून फारसे काही अपेक्षित नाहीच. वाईट फक्त मालेगावच्या हिंदूंचे वाटते.
नुकताच मालेगावमध्ये एका सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाला. काही महिन्यांपूर्वी एका चार वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. याबाबत या दोघींचे काय म्हणणे आहे? मागे मालेगावच्या उपमहापौरबाई ‘टिप्या’च्या फोटोसाठी जीव काढत होत्या. तो फोटो कशासाठी लावायचा? हिंदूंना सातत्याने लक्षात राहावे की, त्याने तुमच्या पूवर्जांचे शिरकाण केले यासाठी? ‘टिप्या’च्या फोटोसाठी जीव काढणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या या दोघींनी मालेगावच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी तितका नव्हे; थोडासा तरी जीव काढला तर? हातात दंडुका आणि चपला घेऊन मालेगावच्या गुन्हेगारांना धाक दाखवला असता तर? केवळ महापालिका ताब्यात आल्यावर हा उन्माद आहे. देश आणि राज्य यांच्या ताब्यात गेले असते तर? मालेगावचा इतिहास काय? 1740 साली पेशव्यांचे सरदार नारो शंकरराजे यांनी ‘मालवाडी’ नावाचे गाव वसवले. बहुसंख्य हिंदू असलेले त्यावेळचे ‘मालवाडी’ पुढे ‘मालेगाव’ झाले. वस्त्रोद्योग उभा राहिला. कामगार म्हणून दूरदूरचे मुस्लीम इथे वसले. कमी वेतनात काम करू लागले. मात्र, यथावकाश ते मालेगावचे बहुसंख्य झाले. असो. तूर्तास मालेगावच्या महापौर-उपमहापौर यांनी लक्षात घ्यावे की, ‘टिपू’ मरून जमाना झाला. देश स्वतंत्र असून, लोकशाही आहे. त्यामुळे धर्मांधतेचा फुकटचा धाक कुणीही दाखवू नये आणि हो, मालेगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच आहे, हे विसरू नये!
केरळम् आणि बांगला!
केरळचे नाव बदलले; पण प. बंगालचे नाव बदलले नाही. जेव्हा आमचे केंद्रात सरकार येईल, तेव्हा आम्ही प. बंगालचे नाव ‘बांगला’ करू,” असे ममता बॅनर्जी म्हणत आहेत. जेव्हा देशभरातील इंग्रजी किंवा मुस्लीम आक्रांताचे नाव असलेल्या शहरांचे नाव बदलले जाते, तेव्हा ममता बॅनर्जी असू देत की, केरळातलेही कम्युनिस्ट असू देत; हे लोक उपहास करतात की, नाव बदलून काय होणार? पण, शेक्सपिअर कितीही म्हणून गेले असले की, नावात काय आहे? तरी, अत्याचार करून गुलामीत ठेवणाऱ्यांची नावे स्वतंत्र देशात का बरे तशीच ठेवावीत?
त्यामुळे केंद्रात भाजपची सत्ता येताच अनेक ठिकाणांची नावे बदलली गेली आणि तिथे त्या-त्या शहरांना त्यांच्या पूर्वीच्या वैभवशाली परंपरेची नावे पुन्हा दिली गेली. या सगळ्याबाबत ममता बॅनर्जी यांनी कायम नाक मुरडले. पण, याच पार्श्वभूमीवर केरळच्या ‘कम्युनिस्ट’ मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना केरळचे नाव ‘केरळम्’, तर ममता बॅनर्जीना प. बंगालचे नाव ‘बांगला’ असे हवे आहे. केंद्र सरकारने ‘केरळम्’ नावाला सहमती दिली. मात्र, ‘बांगला’ नावाला सहमती दिली नाही. यावर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आगपाखड सुरू आहे. बरे, ममता बॅनर्जी यांनी प. बंगालचे नाव ‘बांगला’ व्हावे असे का वाटते, याला काही ऐतिहासिक किंवा तर्कसुसंगत आधार त्यांनी दिला का? जसे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘केरळम्’ नावावरून ‘मल्याळम’ भाषिक एकत्र येतात. तसे काही कारण ममता यांनी दिले का? तर त्या म्हणाल्या, “कोणत्याही राष्ट्रीय बैठकीला मला आमंत्रित करायचे असेल, तर मला सगळ्यात शेवटी कळवले जाते. कारण, मी प. बंगालची मुख्यमंत्री आहे. माझे नाव इंग्रजी शब्द वर्णमालेत शेवटी येते. त्यामुळे माझ्या नावाचे निमंत्रण शेवटी देण्यात येते. जर ‘बांगला’ नाव असते, तर मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझे नाव सुरुवातीला असते. मग मला आधी निमंत्रण मिळाले असते.” खरेतर प. बंगाल हे नाव इतिहासाची खूण. शेजारी बांगलादेश हा आमच्या प. बंगालचा भाग आहे, हे लक्षात राहण्याची साक्ष आहे. प. बंगालचा ‘बांगला’ झाला की, हा इतिहास केवळ पुस्तकात राहील. पण, ममतादीदींना त्याचे काय सोयरसुतक असणार म्हणा. या पार्श्वभूमीवर ‘केरळम्’ला शुभेच्छा!
9594969638