Palghar Healthcare Infrastructure Update : पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात संयुक्त बैठक घेणार
26-Feb-2026
Total Views |
मुंबई : (Palghar Healthcare Infrastructure Update) विधानपरिषदेच्या सभागृहात आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत प्रश्न उपस्थित करून याप्रकरणी संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सकारात्मक उत्तर दिले.(Palghar Healthcare Infrastructure Update)
सभागृहात सदस्य चित्रा वाघ यांनी आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभागी होत आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसताना परिचारिकांकडून प्रसूती केली गेली. रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला. या केंद्रातून ३८,०१४ आदिवासी लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरवली जाते. परंतु बहुतांश डॉक्टर गैरहजर राहत असल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि रुग्ण त्रस्त आहेत. डहाणू तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांतही गैरसोयी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबतच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. या आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचाऱ्यांकडून प्रसुती केली गेली. या घटनेस जबाबदार असलेल्यांविरुध्द शासन कोणती ठोस कारवाई करणार आहे ? प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर पदांनुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत का ? नसल्यास पदे किती काळापासून रिक्त आहेत ? पद भरण्यास का कमी पडलो? मागील एक वर्षामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुपस्थिती-उशिरा येणे, याबाबत किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ? प्राप्त तक्रारींवर कोणती चौकशी करण्यात आली ? डहाणू तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वतः जाऊन तपासणी शासन करणार का ? याबाबत उपाययोजना करण्यासाठी एक संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही दरेकरांनी केली.(Palghar Healthcare Infrastructure Update)
दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, सुदैवाने माता व बालक सुदृढ आहे. कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु पालघर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११२ पदे मंजूर आहेत व ३४ रिक्त पदे आहेत. वैद्यकीय अधिकारी जिल्हास्तर ८७ पदे मंजूर आहेत व त्यातील ८ रिक्त आहेत. २७ फेब्रुवारीपासून नवीन भरती चालू केलीय. ती रिक्त पदेही लवकरात लवकर भरण्यात येतील. पालघर येथे ४६ पीएसई आहेत. उपकेंद्र ३१४ आहेत. ३० बेडेड ग्रामीण रुग्णालय ७ व ५० बेडेड उपजिल्हा रुग्णालय ५ आहेत. पालघरमध्ये नवीन २०० बेडेड जिल्हा रुग्णालये तयार होताहेत. १०० बेडेड स्त्री रुग्णालयांनाही मंजुरी मिळालीय. ४६ पैकी २८ पीएसई या कायाकल्पसाठी पात्र झाल्या आहेत. त्यांचा दर्जाही चांगला आहे. सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा देण्याचा संकल्प आहे. तक्रारीवर कारवाई झाली असून ज्या दोन कंत्राटी डॉक्टर होत्या त्यांना निलंबित करण्यात आले असून या विषयाबाबत संयुक्त बैठक घेऊ.(Palghar Healthcare Infrastructure Update)