महापुरुषांच्या विचारांचा ‌‘अमर‌’ वारसा

Total Views |

महापुरुषांच्या गळ्यात हार घालून त्यांचे विचार जपता येत नाहीत, तर महापुरुषांनी केलेले कार्य वाचून तसे कार्य उभे केले; तरच त्यांचे विचार जपले जातात, हे कृतिशीलतेतून सिद्ध करणाऱ्या अमर हजारे यांच्याविषयी...

मराठवाड्यातील बीड अनेक दशके कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायमच चर्चेत असते. मात्र, याच बीडने वंचित आणि शेतकरी घरातून पुढे येऊन देशपातळीवर कार्य करणारे अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चेहरे देशाला दिले आहेत. याच बीडमध्ये अनेक तरुण समाजहिताचा ध्यास घेऊन कार्यरत आहेत. असाच एक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजहिताचा ध्यास घेतलेला आणि आपल्या ओजस्वी व्याख्यानांतून गावोगावी समाजप्रबोधन करणारा एक युवा व्याख्याता म्हणजे अमर हजारे!

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील रामतीर्थ सालेवडगावसारख्या एका छोटेखानी गावात अमर हजारे यांचा जन्म झाला. गावातीलच प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे काहीकाळ शिक्षण थांबवावे लागेल की काय, अशा परिस्थितीतही नेटाने शिक्षण पूर्ण करणारा हा ध्येयवेडा तरुण. अभ्यासातील गुणवत्ता उत्तम, त्याच्याच जोडीला वाणीला उत्तम धार. त्यामुळे बालवयातच अमर सालेवडगाव पंचक्रोशीत नावारूपाला आला. तालुक्यातील अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये अमरचा प्रथम क्रमांक ठरलेला. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर त्याने विज्ञान विभागात प्रवेश मिळवला. पदवीधर झाल्यानंतर आपल्याकडे असलेले कौशल्य लक्षात घेऊन आपण शिक्षक होऊ शकतो, असे अमरला वाटले. त्याने त्यानंतर ‌‘बीएड‌’ला प्रवेश घेतला.

‌‘बीएड‌’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षक झालेल्या अमर यांना प्रसिद्ध अशा ‌‘रयत शिक्षण संस्थे‌’त नोकरी लागली. मात्र, नोकरी करत असताना त्यांना जाणवले की, वक्तृत्व स्पर्धांमधून सोशीत, पीडित आणि वंचितांविषयी कळवळा येऊन आपण बोलत असतो; परंतु इथे नोकरी करत असताना प्रत्यक्ष गावगाड्यात जाऊन समाजाच्या मुख्य प्रश्नांवर काम करता येत नाही. यामुळेच त्यांनी विचारपूर्वक नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर बीडच्या रामनगर येथील ‌‘स्नेहसावली फाऊंडेशन‌’च्या माध्यमातून चालणाऱ्या वंचित मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. येथे बीडच्या ऊसतोड कामगारांची मुले ज्यांना आई-वडिलांच्या कष्टदायक कामामुळे एका ठिकाणी कधी थाराच मिळत नसे. अशा मुलांना मायेचा आधार देण्याचे कार्य त्यांनी केले.

पुढे याच आधारे त्यांनी ‌‘स्नेहझरा फाऊंडेशन‌’ची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या आधारे मुलांमध्ये राष्ट्रनिर्माणाची भावना जागवण्याचे कार्य केले जाते. भाषा, पंथ आणि जातीच्या पलीकडे जाऊन मानवता हीच सर्वतोपरी असल्याचे शिकवले जात आहे. आज शेकडो युवा ‌‘स्नेहझरा फाऊंडेशन‌’च्या माध्यमातून वीटभट्टी कामगारांच्या, मजुरांच्या मुलांना शिकवण्याचे कार्य करत आहेत. या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून पुण्याच्या खानवडी परिसरात ‌‘क्रांतिबा प्रबोधन छावणी‌’च्या नावे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार गावागावांत पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे. छावणीच्या माध्यमातून आज पुणे परिसरात अनेक प्रबोधनकार व्याख्याते विचारवंत घडले आहेत. खानवडी हे महात्मा फुले यांचे दुसरे गाव, जिथे महात्मा फुले यांचे पूर्वज कटगुण सातारा येथून खानवडी याठिकाणी आले. अशा भागातून महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य अमर आणि त्यांचे काही साथीदार करत आहेत. आजवर अमर यांची हजारो व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न झाली आहेत. याच दरम्यान, त्यांना प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे ज्यांचा विचार आपण गावागावांत पोहोचवण्याचे कार्य करतोय; त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेची अवस्था अत्यंत बिकट आहे. ती सुस्थितीत आणावी, त्याचबरोबर या जागेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, यासाठी त्यांनी आणि त्यांचे सहकारी कल्याण जाधव, अरुण हरकळ, प्रशांत माळी आणि देव राजळे यांसह अनेकांनी लढा सुरू केला. वेळप्रसंगी रस्त्यावरील संघर्षाचे आंदोलन हाती घेतले. या आंदोलनातील अनेकांवर गुन्हे दाखल झाले, कधी अटक व्हावे लागले; परंतु हा लढा सुरू ठेवत त्यांनी मोठा संघर्ष केला. यावेळी झालेल्या आझाद मैदान येथील आमरण उपोषण, पुंगी बजाव आंदोलन, मशाल मोर्चा, पदयात्रा, नायगाव ते भिडेवाडा पुणे ‌‘प्रबोधन यात्रा‌’ अशा अनेक आंदोलनात सक्रिय भाग घेतला. या आंदोलनांचा परिपाक म्हणून चार वर्षांपूव राज्य सरकारने या जागेला राष्ट्रीय स्मारक घोषित केले. यासाठी अमर यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले; परंतु कोणत्याही पुरस्कारापेक्षा महापुरुषांच्या विचारांचा
वारसा जपण्याचे भाग्य लाभते, यातच खरा आनंद असल्याचे अमर सांगतात.

ते त्यांच्या व्याख्यानात नेहमी सांगतात की, “महापुरुषांच्या गळ्यात हार घालून त्यांचे विचार जपता येत नाहीत, तर महापुरुषांनी केलेले कार्य वाचून तसे कार्य उभे केले; तरच त्यांचे विचार जपले जातात.” यासाठी पुणे परिसरातील अनेक ग्रंथालयांत पुस्तके पुरवत ते विचारांची पेरणी करतात. त्यांचे हे कार्य असेच दिवसेंदिवस वाढत राहो, यासाठी दै.‘मुंबई तरुण भारत‌’कडून खूप खूप शुभेच्छा!

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.