सामाजिक न्याय विभागाच्या ‘त्या’ जाहिरातीवर आक्षेप; हिंदू साधूच्या प्रतिमेचा वापर केल्याबद्दल रोष

    25-Feb-2026   
Total Views |


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या भोंदूगिरीविरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका शासकीय जाहिरातीवरून नवा वाद निर्माण झालाय. संबंधित जाहिरातीत भोंदूगिरीचे प्रतीक म्हणून केवळ साधूची प्रतिमा वापरण्यात आल्याने रोष निर्माण होऊ लागलाय. भोंदूगिरीच्या विरोधातील शासकीय जाहिरातीत फक्त साधूचा उल्लेख आहे; इस्लामिक किंवा ख्रिस्ती अंधश्रध्दांचा उल्लेख नाही. त्यामुळे मोहिमेची व्याप्ती सर्वसमावेशक आहे का, असा प्रश्न उद्भवू लागलाय. दि. २३ फेब्रुवारी रोजी समाजमाध्यमांवर प्रसारित केलेली ही जाहिरात सध्या डिलिट केल्याचे लक्षात येत आहे. 

अंधश्रद्धा किंवा भोंदूगिरी हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित प्रश्न नसून विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो. अंधश्रद्धेविरोधी मोहिमा आखताना संवेदनशीलता आणि सर्वधर्मीय समतोल राखणे आवश्यक असते. अन्यथा, मूळ उद्दिष्टापेक्षा वेगळ्या दिशेने सार्वजनिक चर्चा वळू शकते. अंधश्रद्धा निर्मूलन हा व्यापक सामाजिक प्रश्न असून, तो व्यक्ती किंवा धर्मविशेषाविरोधी नसल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्ते अधोरेखित करतात. त्यामुळे भविष्यातील मोहिमांमध्ये सर्वसमावेशकतेचा विचार होईल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

https://x.com/LegalLro/status/2026326756396068968?s=20


अखिल भारतीय संत समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला असून, यामधून हिंदू साधू-संतांची बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे. संत समितीने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देताना विशिष्ट वेषातील साधूचे चित्रण करणे म्हणजे संपूर्ण हिंदू साधू परंपरेलाच संशयाच्या भोवऱ्यात ढकलण्यासारखे आहे. भोंदूगिरी या शब्दाचा संबंध थेट साधूंशी जोडला गेल्याचा आरोप करत संबंधित पोस्टर तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक