Municipal Education Budget : महापालिका शिक्षण अर्थसंकल्पात २९२ कोटींची वाढ
25-Feb-2026
Total Views |
मुंबई : (Municipal Education Budget) महापालिकेच्या शिक्षण विभागाचा वाढीव अर्थसंकल्प; सीबीएसई शाळा, इंग्रजी प्रयोगशाळा, सीसीटीव्हीचा विस्तार मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) अविनाश ढकणे यांनी सादर केला. यंदा ४,२४८.०८ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून, ती मागील वर्षाच्या तुलनेत २९२.४४ कोटी रुपयांनी अधिक आहे. शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसोबतच डिजिटल सुविधा आणि पायाभूत विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.(Municipal Education Budget)
अर्थसंकल्पानुसार अंधेरी पूर्व येथील कोडीविटा परिसरात नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार आहे. ‘निपुण भारत’ अभियानाचा विस्तार करून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणिताच्या व्यावहारिक वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यापूर्वी ही योजना इयत्ता दुसरीपर्यंत मर्यादित होती. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी २७९ शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ३ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच सध्या ५५ शाळांमध्ये उपलब्ध असलेले खगोलशास्त्र शिक्षण यंदा आणखी ४० शाळांपर्यंत विस्तारित केले जाणार आहे.(Municipal Education Budget)
पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी १७ जुन्या आणि २ नवीन शाळांच्या इमारतींचे बांधकाम सुरू असून त्यापैकी १० शाळा यावर्षी पूर्ण होतील, तर उर्वरित ९ शाळा पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित केल्या जातील. उपनगरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी ४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील शाळांमध्ये ही सुविधा यापूर्वीच उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी २८,४७० बाके आणि ४४,९३८ खुर्च्या खरेदी करण्यात येणार आहेत. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीकरिता ६ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक थेरपी उपकरणे उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.(Municipal Education Budget)
दरम्यान, राज्य शासनाकडे प्राथमिक शिक्षणासाठी ५,६५५.३० कोटी रुपये आणि माध्यमिक शिक्षणातील ४९ अनुदानित शाळांसाठी १,५८६.०८ कोटी रुपये अशी एकूण ७,२४१.३८ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. ही रक्कम तातडीने मंजूर करण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.(Municipal Education Budget)