मुंबई: मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर बुधवारी विधानपरिषदेत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआयच्या उपयोगाने मुंबईतील प्रदुषणाचे मॉनिटरिंग होणार असल्याचे स्पष्ट केले.
आ. अनिल परब यांनी बांधकामांमुळे होत असलेल्या प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित केला. यात आ. भाई जगताप यांनीही सहभाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मुंबईत सध्या हायवे, मेट्रो आणि विविध इमारतींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे सर्व नियमांचे कडक पालन व्हावे यासाठी आम्हाला मुंबई महापालिकेची मदत लागते. यामध्ये आम्ही जागरुकपणे कारवाई करत आहोत. इथे मोठ्या प्रमाणात डेब्रिज (बांधकाम कचरा) निर्माण होत आहे. येत्या ३ ते ६ महिन्यांत डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी बैठक घेऊन एक ठोस आराखडा तयार केला जाईल. काही लोक प्रदूषणाचे चुकीचे आकडे सादर करत आहेत. त्यामुळे सर्वांनी अधिकृत आकडेवारीसाठी एमपीसीबीची वेबसाईट पाहावी, जेणेकरून आपण तात्काळ कारवाई करू. भविष्यातही कोणत्याही बांधकामावर प्रदुषणाची परिस्थिती निर्माण झाल्यास तिथे योग्य कारवाई करू."
डायनॅमिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार करण्याच्या पालिकेला सूचना
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर उत्तर दिले. ते म्हणाले की, "आयओटीवर आधारित आणि एआयचा उपयोग करून एक 'डायनॅमिक मॉनिटरिंग सिस्टीम' तयार केली पाहिजे, असे मुंबई महापालिकेला सांगितले आहे. सगळ्या बांधकामांची देखरेख त्यांनी केली पाहिजे. जोपर्यंत १०० टक्के आयओटीवर आधारित आणि एआयचा उपयोग करून ते होत नाही, तोपर्यंत बांधकामांच्या ठिकाणचे १०० टक्के मॉनिटरिंग करणे शक्य नाही. तशा सुचना दिलेल्या आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....