Ajit Pawar Plane Crash : डीजीसीएची मोठी कारवाई! व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणावर घातली बंदी

    25-Feb-2026   
Total Views |

DGCA

मुंबई : (DGCA grounds four aircraft of VSR Ventures)
बारामती विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) पहिली मोठी कारवाई केली आहे. अपघातग्रस्त विमान हे व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीच्या चार लिअरजेट विमानांची उड्डाणे तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हीएसआर कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत डीजीसीएने कंपनीच्या विमान उड्डाणावर बंदी घातली आहे.(DGCA grounds four aircraft of VSR Ventures)

DGCAने काय म्हटलंय?

बारामतीतील दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) व्हीएसआर कंपनीच्या कामकाजाचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार, विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात व्हीएसआर कंपनीची विविध पातळ्यांवर विविध पथकांनी तपासणी केली. या तपासणीत सदर कंपनीद्वारे सेवा दिल्या जाणाऱ्या विमानांची उड्डाणयोग्यता, हवाई सुरक्षा आणि फ्लाइट ऑपरेशन्स या प्रक्रियांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. तसेच देखभाल प्रक्रियेतही गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या गंभीर अनियमिततेमुळे डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांचे उत्तर मागितले आहे.(DGCA grounds four aircraft of VSR Ventures)

या पार्श्वभूमीवर डीजीसीएने जोपर्यंत कंपनी त्रुटींचे मूळ कारण शोधून दुरुस्त करत नाही आणि सुरक्षेचे निकष पूर्ण करत नाही तोपर्यंत व्हीएसआर कंपनीची लियरजेट ४०/४५ प्रकारातील चार विमानांच्या उड्डाणावर तत्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये व्हीटी - व्हीआरए, व्हीटी - व्हीआरएस, व्हीटी - व्हीआरव्ही आणि व्हीटी - टीआरआय यांचा समावेश आहे.(DGCA grounds four aircraft of VSR Ventures)
 
नवीन कडक सुरक्षा आदेश जारी
 
दरम्यान, नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर्ससोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर डीजीसीएने नवीन कडक सुरक्षा आदेश जाहीर केले आहेत. सुरक्षेला व्यावसायिक बाबींवर प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले असून, पायलट-इन-कमांडचा निर्णय अंतिम असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार, विमानाचे वय, देखभाल, इतिहास आणि वैमानिकांचा अनुभव यासारखी माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक असेल. तसेच डीजीसीए सुरक्षा मानांकन जाहीर करणार असून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि डेटा तपासणी अधिक कडक केली जाणार आहे. निष्काळजीपणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असून परवाना निलंबनासह कडक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.(DGCA grounds four aircraft of VSR Ventures)



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\