हे ‌‘शेर‌’ नाही शेळपट!

    25-Feb-2026   
Total Views |

दिल्लीतील ‌‘एआय इंडिया इम्पॅक्ट समिट‌’मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले आणि देशाची अब्रू आंतरराष्ट्रीय पाहुणे, मान्यवरांसह धुळीस मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, तेथील सुरक्षारक्षकांसह सुज्ञ भारतीयांनी या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना वेळीच पिटाळून लावले. आता पोलिसांनीही या अतिउत्साही कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहेच. पण, हे प्रकरण वाटते तितके नक्कीच सरळसाधे नाही. अशा आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताची प्रतिमा मलिन करण्याचेच हे एक नियोजित षड्यंत्र होते. असे म्हणतात की, यामागचे डोके होते, ते वृत्तवाहिन्यांवर काँग्रेसची बाजू मांडण्याच्या नावाखाली कोकलणाऱ्या त्या ‌‘शोर‌’कर्त्या प्रवक्ता बाईंचेच...

संकल्पना कुणाची का असोत, काँग्रेसचे युवराज राहुल गांधींच्या परवानगीशिवाय तर असे पाऊल उचलले गेले नसेलच. त्यामुळे प्रत्यक्षात ‌‘भारत मंडपम‌’मध्ये राडा करणारे काँग्रेस कार्यकर्ते जितके दोषी, त्याहूनही अधिक दोषी या कार्यकर्त्यांना फितवणारे. पण, याची काँग्रेस पक्षाला, राहुल गांधींना ना खंत ना खेद. उलट, “शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे. हे आमच्या रक्तातच असून, तो प्रत्येक भारतीयाचा लोकशाहीतील अधिकार आहे,” अशी दर्पोक्ती राहुल गांधींनी केली. एवढेच नाही, तर काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना आपल्या ‌‘ट्विट‌’मध्ये त्यांनी चक्क ‌‘बब्बर शेर‌’ असेही संबोधले. आता अशा शेळपटांनाच ‌‘शेर‌’ मानणारा त्यांचा शेखचिल्ली नेता असेल, तर संघटनेच्या अवस्थेची कीव करावी तितकी कमीच. पण, तरीही सत्तेला सत्याचा आरसा दाखवणे ही देशभक्ती आहे, अशी वल्गना करीत राहुल गांधींनी अपेक्षितपणे आपल्या या निर्बुद्ध कार्यकर्त्यांवर स्तुतिसुमनेच उधळली. यावरून राहुल गांधींची कोती मानसिकता आणि देशविघातक वृत्ती पुन्हा एकदा देशासमोर आली. विरोधी पक्षनेते असूनही राहुल गांधींना याचेही भान राहिले नाही की, ‌‘एआय परिषद‌’ हा कोणताही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता, तर तो बदलत्या भारताचे दर्शन घडविणारा सोहळा होता. पण, मुळातच ज्यांना देशाबद्दल काडीचीही आस्था नाही, देशाच्या प्रगतीचे कौतुक नाही, अशांकडून फार अपेक्षा बाळगणेच चुकीचे. राहुल गांधींनी केलेल्या अशा अपेक्षाभंगांमुळेच काँग्रेसवर आज अशी नामुष्कीजनक परिस्थिती ओढवली आहे, हेच खरे!



बुद्धिवंतांकडून समाचार!




राहुल गांधी आणि त्यांच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‌‘एआय समिट‌’मध्ये जो काही धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला, तो सर्वसामान्य भारतीयांची मानही शरमेने खाली घालणारा होता. समाजमाध्यमांपासून ते मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत काँग्रेसवर या प्रकरणावरुन टीकेची झोडही उठली. अशा वेळी समाजातील सज्जनशक्ती, बुद्धिवंतांनीही काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. 270 निवृत्त न्यायाधीश, अधिकारी आणि पोलिसांनी एकत्रितपणे काँग्रेसच्या या कृत्याला ‌‘भारत मंडपममध्ये राष्ट्रीय लाज आणणारा प्रसंग‌’ असे संबोधत, काँग्रेसच्या अरेरावी वृत्तीचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. अशा या 270 माजी सरकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “लोकशाहीत आंदोलन करणे हे मान्य आहे. परंतु, असा निषेध अराजकता किंवा राष्ट्राचा सार्वजनिक अपमान करण्याचा परवाना देत नाही.

बौद्धिक कठोरता आणि संसदीय चर्चेद्वारे खरा विरोध व्यक्त केला पाहिजे होता.” तसेच अशाप्रकारचे विरोधप्रदर्शन गुंतवणूकदारांचा विश्वास आणि परराष्ट्र संबंधांनाही ठेस पोहोचविणारे ठरू शकते, असेही संयुक्त निवेदनात माजी अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने नमूद केले आहे. एकूणच, आपल्या अशा निंदनीय कृत्यामुळे आपण केवळ सत्ताधाऱ्यांनाच नाही, तर संपूर्ण देशाला, ‌‘एआय‌’ क्षेत्रात मेहनत घेणाऱ्या वैज्ञानिकांचाही अपमान करतोय, याचेही साधे भान काँग्रेसला राहिलेले दिसत नाही. कारण ते तसे असते, तर अशाप्रकारे जागतिक परिषदेला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य करण्यासाठी यांचे ‌‘हात‌’ शिवशिवले नसते. एकूणच काय; तर देश, सरकार, राजकारण यातील पुसट रेषा आणि त्यातील अंतर विरोधी पक्षनेते असूनही राहुल गांधींना उमजलेले नाही. दुसरीकडे विविध देशांशी भारताचे सांस्कृतिक, आर्थिक, राजनैतिक संबंध दृढ करण्यासाठी मोदी सरकारने मित्रपक्षांसह अन्य पक्षांतील खासदारांचे 23 संसदीय मैत्री-गट स्थापन केले असून, त्यात राजकीय विरोधक असलेल्या सुप्रिया सुळे, असदुद्दीन ओवेसी, कनिमोळी, चिदंबरम, संजय राऊत यांनाही स्थान दिले आहे. यावरून मोदी सरकार आणि राहुल गांधी यांच्या विचारांतील, कार्यशैलीतील जमीन-आसमानाचा फरक स्पष्टपणे अधोरेखित व्हावा. मोदी सरकारसाठी ‌‘राष्ट्र प्रथम‌’, तर राहुल गांधींसाठी ‌‘मीच प्रथम‌’ हीच नीती!



विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची