आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मणक्याच्या आजारांचे प्रमाण सर्वच वयोगटांत वाढलेले दिसते. मानदुखी, खांदेदुखी, कंबरदुखी याचे रुपांतर कालांतराने मणक्याच्या आजारात होते. बैठी जीवनशैली, प्रवासातील धक्के आणि ताणतणाव, व्यायामाचा अभाव यांसारख्या कारणांमुळे हा त्रास उद्भवतो. त्यातच मोबाईलच्या अतिवापरानेही या यादीमध्ये अलीकडच्या काळात भर घातली आहे. त्यामुळे मणक्याचे आजार उद्भवू नये, म्हणून सुरुवातीपासूनच नोकरी करणार्यांपासून ते अगदी गृहिणींपर्यंत प्रत्येकाने काळजी घेणे हे क्रमप्राप्त ठरते. तेव्हा आजच्या लेखातून मणक्याचे आजार टाळायचे कसे, या आजारामागची नेमकी कारणे, त्याचे योग्य निदान आणि उपचारपद्धती यांची माहिती करुन घेऊया...
दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही मैत्रिणी जानेवारीमध्ये भेटलो. वर्षाच्या पहिल्या महिन्यात भेटलो की वर्षभर एकमेकांशी जोडलेल्या राहणार, अशी आमची प्रेमळ श्रद्धा आहे. सुचिता मात्र आली नाही. ग्रुपवर तर ‘हो’ म्हणाली होती; मग का नाही आली; म्हणून तिला फोन लावला. फोन नेहाने, तिच्या मुलीने उचलला, "मावशी, अगं, आईला cervical spondylitis मुळे खूप चक्कर आणि उलट्या सुरू झाल्या. झोपूनच आहे रात्रीपासून. अगं बाबाने औषधं चालू केली आहेत. बरं वाटलं की करेल फोन. तोपर्यंत मी किंवा बाबा तुला कळवत राहू.”
सुचिताचं ऐकल्यावर जुईलीलापण तिच्या 'lumber spondylitis' ची आठवण आली. पैज लावून ५० सूर्यनमस्कार घातले आणि मग आठवडाभर शवासनात झोपून राहण्याची वेळ आली दोन वर्षांपूर्वी मलाही दिवाळीत 'cervical spondylitis' ने चक्कर येऊन दिवाळीचं दिवाळं वाजल्याची कथा मीही सांगितली. मणक्यांचे हे आजार सध्या खूप बोकाळले आहेत, यावर सगळ्याजणींचं एकमत झालं आणि पुन्हा सगळ्याजणी गप्पांमध्ये रमल्या.
मी मात्र अंतर्मुख झाले. खरंच हल्ली दवाखान्यातही सारखं मान दुखणं, कंबर दुखणं, सायटिका आणि गुडघेदुखी या चार आजारांचेच रुग्ण जास्त येत आहेत, याची मनात नोंद झाली. ज्यावेळी आजार सार्वत्रिक असतो, तेव्हा दोन कारणं असतात. एक तर, जंतुसंसर्ग जसा ‘कोविड’मध्ये होता आणि दुसरं म्हणजे, बदललेली जीवनशैली. मणक्यांच्या आजारांत अर्थातच दुसरे कारणच घडत आहे.
मणक्यांचे काम आहे, शरीराला आधार देण्याचे. पाठीचा कणा आहे, म्हणून पाठ आणि मग त्याला जोडलेले मान, डोके, हात, पाय हे सर्व अवयव सुस्थितीत योग्य हालचाल करीत स्वतःला तोलून धरतात. पण, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर झाला की त्याच्यावर ताण हा पडणारच. सध्या आपण अधिक वेळ उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत असतो. त्यामुळे पाठीला-पर्यायाने त्या मणक्यांच्या माळेला विश्रांतीच नाही. घरची कामं, ऑफिसची कामं, बाजारहाट आदी करत आपण सतत उभे, बसलेले किंवा चालतोच आहे. त्यात आणि भर पडलीय, ती मोबाईलनामक समस्येची. आपण त्याला वापरतोय की, तो आपल्याला, हेच कळेनासं झालंय. मान आणि खांद्यांच्या मधे फोन धरून बोलत राहाणं, सतत बसून मान खाली घालून मोबाईल पाहाणं, यामुळे मणक्यांचे आजार बळावत आहेत.
मणके म्हणजे साधारण अर्धगोलाकृती चौकोनी आकाराचे हाडांचे ठोकळे एकावर एक रचलेले असतात. त्यांच्यामध्ये ते घासले जाऊ नये, म्हणून गाद्या असतात. मेंदूमधून जो मज्जारज्जू नावाचा नसांचा एक पुंजका/शेपटा बाहेर पडतो, तो या मणक्यांच्या माळेतून जातो. ठरावीक अंतरावर प्रत्येक मणक्यापासून त्या त्या पातळीवर असणार्या अवयवांसाठीच्या नसा बाहेर पडतात आणि त्या त्या अवयवांचे कार्य चालवतात. या मणक्यांना मांसपेशी (muscles) आणि संधिबंधनांचा (ligaments) आधार असतो, जेणेकरून ते आपल्या जागेवर राहतील आणि त्यांची आवश्यक तशी आवश्यक तेवढी हालचाल होऊ शकेल.
अर्थात, या आधार देणार्या पाठीच्या काट्याला विश्रांतीचीही तितकीच आवश्यकता असते. पण सतत उभं-बसलेलं-चालत किंवा वाहनातून प्रवास करत राहिल्याने त्यांच्यावर ताण पडतो. मांसपेशी आणि संधिबंधन दमतात आणि मग हळूहळू मणक्यांमधील अंतर कमी व्हायला लागतं. त्यांची हाडं एकमेकांवर घासली जातात. बाहेर पडणार्या नसा दबल्या जातात आणि वेदन, मुंग्या येणे (बधीरता) किंवा स्तब्धता (stiffness) ही लक्षणे उद्भवतात .
याशिवाय मार बसणे, अपघात, चमक भरणे, अधिक लिखाण किंवा टायपिंग, सतत प्रवास, उठणे-बसणे-वाकणे यांच्या अयोग्य पद्धती यांमुळे मणक्यांना त्रास होऊ शकतो. अयोग्य किंवा अपुरा आहार वयाची ज्येष्ठता किंवा एखादा मोठा आजार यांमुळे मणक्यांच्या हाडातील कॅल्शियमची मात्रा कमी झाली, तरी मणक्यांना दुखापत होऊ शकते. तिथे वेदना होऊ लागतात. पोटामधील आजार, गर्भाशय किंवा जननेंद्रियांचे आजार, मूत्राशयाचे व्याधी यांमध्येही पाठीच्या कण्यामध्ये वेदना जाणवू शकतात.
मग या सगळ्यांवर उपाय काय?
सर्वांत महत्त्वाची म्हणजे, पुरेशी विश्रांती. शरीर थकतंय, जरा आडवं पडावंसं वाटतंय, पण आपण काम रेटत राहतो. तसं नका करू. थोडं बसा, थोडं आडवं व्हा. प्रत्येकाने अगदी आपापल्या ऑफिसेसमध्येही २० मिनिटांच्या वामकुक्षीसाठी जागा निर्माण करता आली, तर बघा. काम बंद, फोन बंद. बरोबर २० मिनिटं फक्त. कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि दुखण्याच्या आजाराच्या तक्रारी नक्की कमी होतील.
रोज न चुकता कंबर, मान आणि गुडघे यांना तेल लावा.
बाथरूममध्ये तेल ठेवा. आंघोळीपूर्वी तेल लावा आणि अंगावरून गरम पाणी घ्या. फक्त तेल सांडणार नाही, याची दक्षता घ्या.जास्त वेदना असतील, तर झोपतानाही लावा.अंथरूण खराब झालं, तर होऊ द्या. शरीर खराब होण्यापेक्षा बरं. आठवड्यातून एक वेळा संपूर्ण पाठीला आणि महिन्यातून एक वेळा संपूर्ण अंगाला तेल मालिश करून घ्या.
योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य त्या मुद्रा व योगासने करा.
रोज सकाळी तीळ चावून खा आणि झोपताना थंडीमध्ये तीळतेल, उन्हाळ्यात खोबरेल तेल व पावसाळ्यात तूप एक-एक चमचा एक कप. गरम पाण्यातून प्या. पाण्यात चिमूट चिमूट हळद व मिरपूड घाला.
आहारामध्ये राजगिरा, केळी, नाचणी, खारीक यांचा नियमित समावेश कॅल्शियमसाठी असावा. प्रथिनांकरिता डाळी, कडधान्ये, चणे-शेंगदाणे, बलकासकट अंडी, मासे व हाडांसहित मांस यांचे सेवन करावे.तेल, तूप, खोबरे हे हाडांमधील वंगणाकरिता आवश्यक आहे. पालेभाज्या कमी खा. आठवड्यातून दोनवेळा वगैरे. पालक क्वचित खा. फळभाज्या जास्त खा. गाजर, बीट आदी नुसतेच कापून न खाता, त्यांची कोशिंबीर बनवून घ्यावी. स्निग्ध पदार्थ सोबत असल्याशिवाय त्यातील जीवनसत्त्वे पचत नाहीत आणि प्रमाण अर्धा वाटीपेक्षा जास्त नसावे. नाहीतर, पोटात वायू धरतो व पाठ दुखते. संध्याकाळी भेळ, वडे, फरसाण, सॅन्डविच असला काहीतरी नाश्ता करण्यापेक्षा कोणतेही एक फळ खा. स्वतःला न पचणारे, तसेच शिळे पदार्थ खाऊ नका.
वारंवार वेदना जाणवत असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या. फक्त वेदनाशामक औषधे हा उपचार नसतो.
पंचकर्मातील सर्वांग स्नेहन स्वेदन, पिंड स्वेद, मन्याबस्ती, कटिबस्ती, योगबस्ती, नस्य या उपचारक्रिया फायदेशीर ठरतात. पण त्यासाठी वैद्यांचा सल्ला आवश्यक आहे.
सर्वांग स्नेहन स्वेदन - संपूर्ण अंगाला तेलाने मालिश व शेक
पिंड स्वेद - धान्य व औषधांच्या पोट्टलीने शेक
मन्याबस्ती - मानेच्या ठिकाणी उडदाच्या पीठाचे आळे करून त्यात तेल सोडणे.
कटिबस्ती - वरील क्रिया कंबरेच्या मणयांभोवती.
योगबस्ती - औषधी तेल व काढ्याचे एनिमा
नस्य - नाकात औषध सोडणे. विशेषतः cervical spodylitis मध्ये फायदेशीर
योग्य वेळी व पुरेशी झोप, योग्य वेळी व योग्य घटकांसह आहार, नियमित व्यायाम ही निरोगी आयुष्यासाठी गुरूकिल्ली आहे. त्याचबरोबर मानसिक तणावांना दूर करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मित्र-मैत्रिणींसोबत हास्यविनोद, छोट्या सहली, नातेवाईकांसोबत तणावरहित नातं, छंद जोपासणे इ. गोष्टी जरूर करा. पाठीचा कणा हा फक्त ताठा दाखवण्यासाठी नसतो, तर ताठपणे निरामय आयुष्य व्यतीत करण्यासाठीही महत्त्वाचा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा आणि आतापासूनच त्याची काळजी घ्यायला सुरुवात करा.
- वैद्य चंदाराणी बिराजदार
(‘आरोग्य भारती’द्वारे प्रकाशित)