भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरची मोठी चिंता. मधुमेहाच्या निदानासाठी ‘एचबीए१सी’ ही चाचणी व्यापकपणे वापरली जात असली, तरी दक्षिण आशियातील विशिष्ट आरोग्यस्थिती लक्षात घेता, तिच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. अॅनिमिया, हिमोग्लोबिन विकार आणि आनुवंशिक घटक यांमुळे या चाचणीचे निष्कर्ष दिशाभूल करणारे ठरू शकतात. परिणामी, मधुमेहाचे निदान उशिरा होणे किंवा चुकीचे ठरण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर मधुमेह निदानाच्या पद्धतींचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारतात मधुमेह हा विकार केवळ जीवनशैलीशी संबंधित असलेली व्याधी राहिली नसून; ती आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर उभी ठाकलेली एक मोठीच सामाजिक आणि वैद्यकीय समस्या झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर मधुमेहाचे अचूक आणि वेळेवर निदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. परंतु, अलीकडील संशोधनानुसार, ‘एचबीए१सी’ अर्थात ‘ग्लायकेटेड हिमोग्लोबिन’ या एकाच रक्तचाचणीवर आधारित निदान दक्षिण आशियातील लोकसंख्येसाठी, विशेषतः भारतीयांसाठी अपुरे असून ते कधीकधी दिशाभूल करणारे ठरू शकत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे.
सामान्यतः ‘एचबीए१सी’ चाचणी मागील दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवते. त्यामुळे एकेका दिवसातील साखरेच्या चढ-उतारांपेक्षा, शरीरातील साखरेच्या दीर्घकालीन स्थितीचा अंदाज आपल्याला या चाचणीतून येतो. तसेच या चाचणीसाठी उपाशीपोटी रक्त देण्याची आवश्यकता नसल्याने, रुग्णांच्या दृष्टीनेही ही चाचणी सोयीची आणि व्यवहार्य ठरते. जागतिक आरोग्य संस्थांसह अनेक आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांमध्येही मधुमेहाच्या तपासणीसाठी या चाचणीचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, कोणतीही चाचणी सर्व परिस्थितींमध्ये अचूक ठरतेच, असे निश्चित नाही.
भारतीयांमध्ये लोहाच्या अभावामुळे अॅनिमियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते. महिलांमध्ये, विशेषतः तरुण वयातील महिलांमध्ये, तसेच देशाच्या ग्रामीण भागांत याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय, थॅलेसेमिया, सिकल-सेल यांसारखे हिमोग्लोबिनशी संबंधित विकारही देशातील काही भागांत सामान्य झाले आहेत. या परिस्थितीध्ये शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य, त्यांची रचना किंवा कार्यक्षमता यावर परिणाम होतो. ‘एचबीए१सी’ या चाचणीमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनला जोडलेल्या साखरेचे प्रमाण मोजण्यात येते. जर शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्यच बदलले, तर साखरेचे प्रमाणही प्रत्यक्ष परिस्थितीशी जुळणारे येत नाही. अशा वेळी ‘एचबीए१सी’चे मूल्य कृत्रिमरित्या अधिक किंवा कमी दिसू शकते आणि त्याचा थेट परिणाम निदानावर होतो.
आजमितीला काही रुग्णांमध्ये मधुमेह असूनही ‘एचबीए१सी’चे प्रमाण सामान्य दिसू शकते. परिणामी, निदान होण्यास दोन-तीन वर्षांचा उशीर होेतो. तोपर्यंत शरीरात हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, दृष्टिदोष, शरीरातील नसांवर परिणाम होणे, अशी गुंतागुंत सुरू होण्याची शक्यता निर्माण होते. याउलट, काही प्रकरणांत अॅनिमियामुळे ‘एचबीए१सी’ जास्त दाखवल्याने, रुग्णाला अनावश्यक औषधांचे सेवन करावे लागते. त्यामुळे त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. भारतामध्ये सध्या दहा कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त असल्याचा अंदाज आहे. ‘प्री-डायबेटीस’ अवस्थेतील लोकांची संख्या तर त्याहून अधिक आहे. शहरीकरण, बदलती आहारपद्धती, शारीरिक हालचालींचा अभाव आणि मानसिक ताण यांमुळे या व्याधी तरुण वयोगटातही वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत निदानातील त्रुटी ही केवळ वैद्यकीय बाब नसून, सार्वजनिक आरोग्य धोरणाशी निगडित प्रश्न ठरतो.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतेही ‘एचबीए१सी’ चाचणी उपयुक्त आहेच; मात्र ती एकमेव निकष मानणे अयोग्य ठरणार आहे. उपाशीपोटी रक्तातील साखर, जेवणानंतरची साखर, ‘ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट’ यांसारख्या चाचण्या एकत्रितपणे केल्यावरच मधुमेहाविषयीचे अधिक विश्वासार्ह चित्र मिळू शकते. काही प्रकरणांत ‘फ्रुटोसामाईन’सारख्या पर्यायी सूचकांचाही विचार करता येण्यासारखा आहे. तसेच निदान करतानाही रुग्णाचा आहार, वजन, कुटुंबातील इतिहास, रक्तदाब, लिपिड प्रोफाईल आणि इतर विकार यांचाही समग्र आढावा घेणे आवश्यक झाले आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने अॅनिमियावर नियंत्रण, पोषणपूरक आहार, नियमित तपासणी शिबिरे आणि निदानाच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. डॉक्टरांनाही याबाबत मार्गदर्शन तत्त्वांची गरज निर्माण होऊ शकते. तसेच केवळ एकच चाचणी करून निर्णय घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमध्येही बदल घडवून आणावा लागेल. सामान्य नागरिकांसाठीही हा इशारा महत्त्वाचा असाच. वर्षातून किमान एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी, नियमित व्यायाम, संतुलित व तंतुमय आहार, साखर आणि कर्बोदकांचे मर्यादित सेवन, वजन नियंत्रण आणि ताणतणाव व्यवस्थापन या गोष्टी या व्याधीला दूर ठेवण्यासाठी अनिवार्य ठरणार आहेत. विशेषतः कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असल्यास तपासण्या अधिक काळजीपूर्वक करणेही आवश्यक आहे.
मधुमेहाविरुद्धच्या लढ्यात अचूक निदान ही पहिली आणि सर्वांत महत्त्वाची पायरी आहे. ‘एचबीए१सी’ चाचणी ही प्रभावी साधन असली, तरी भारतासारख्या विविध आरोग्यस्थिती असलेल्या देशात ती एकमेव आधार मानणे धोकादायक ठरू शकते. विज्ञानाधारित आणि बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारल्यासच मधुमेह नियंत्रणाची लढाई अधिक सक्षमपणे लढता येईल.