राष्ट्रपती भवनातील एडविन लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी आता राजगोपालाचारी यांचा पुतळा; ब्रिटिशांचे पुतळे काढून गुलामीची मानसिकता नष्ट करण्याचा प्रयत्न

Total Views |

मुंबई :
राष्ट्रपती भवनातील ग्रँड ओपन स्टेअरकेस परिसरात असणाऱ्या ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांचा पुतळा काढण्यात आला आहे. त्याजागी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी दि. २२ रोजी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

केंद्र सरकारने वसाहतवादी मानसिकता संपवण्याची पाऊले उचलली आहेत. त्याच्याच आधारे ब्रिटिशांचे आपल्या देशातील पुतळे आणि स्मारके काढून आपल्या देशात आपल्याच महापुरूषांचे पुतळे आणि स्मारके उभारली जात आहेत. राजगोपालाचारी यांचा पुतळा महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर स्थापित करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी दि. २२ रोजी 'मन की बात' मध्ये याबाबत सांगितले होते की, दुर्दैवाने देशाच्या स्वातंत्र्यानंतरही ब्रिटीश प्रशासकांचे पुतळे राष्ट्रपती भवनातच होते. स्वातंत्र्यानंतर देशाच्या महान सुपुत्रांना तिथे स्थान देऊन त्यांचा सन्मान करायला हवा होता, जो झाला नाही. त्यामुळेच एडविन यांचा पुतळा काढण्यात येईल.

गुलामगिरीची मानसिकता दूर करा
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले होते की, आझादी का अमृत महोत्सवादरम्यान त्यांनी लाल किल्ल्यावरील पाच प्रतिज्ञांबद्दल सांगितले. त्यापैकी एक म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्तता करून घेणे आहे.



चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.