मुंबई : (Bhojshala Case) मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील भोजशाला परिसर येथे असलेल्या कमाल मौला मस्जिद संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने आपल्या सविस्तर तपास अहवालात निष्कर्ष काढला आहे की या मशिदीचे बांधकाम प्राचीन मंदिरांच्या अवशेषांचा वापर करून करण्यात आले आहे. एएसआयच्या मते, हा निष्कर्ष वैज्ञानिक तपासणी, सर्वेक्षण, उत्खनन, सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास, स्थापत्य रचना, शिलालेख, कला आणि मूर्तींचे विश्लेषण यांच्या आधारे काढण्यात आला आहे.(Bhojshala Case)
एएसआयचा हा अहवाल मध्य प्रदेश उच्च न्यायालय यांच्या इंदौर खंडपीठात सादर करण्यात आला. अहवालात नमूद करण्यात आले आहे की विद्यमान संरचना शतकांनंतर उभारण्यात आली असून त्यामध्ये समरूपता, डिझाइन आणि स्थापत्य संतुलनाचा विशेष विचार करण्यात आलेला नाही. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती विजय कुमार शुक्ला आणि न्यायमूर्ती आलोक अवस्थी यांच्या खंडपीठाने एएसआयचा अहवाल सर्व संबंधित पक्षांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच, सर्व पक्षांनी दोन आठवड्यांच्या आत आपले आक्षेप, सूचना आणि मते सादर करावीत, असेही सांगण्यात आले. प्रकरणाची पुढील सुनावणी १६ मार्च रोजी होणार आहे.(Bhojshala Case)
सुमारे २,१०० पानांचा हा अहवाल १० खंडांत तयार करण्यात आला असून त्याचे नेतृत्व एएसआयचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी केले. ९८ दिवस चाललेल्या सर्वेक्षणादरम्यान आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. उत्खननात एकूण ९४ मूर्ती आणि त्यांचे अवशेष सापडले, ज्यांपैकी अनेकांची तोडफोड करण्यात आलेली होती. यामध्ये गणेश, ब्रह्मा, नरसिंह, भैरव यांसह विविध देवी-देवतांच्या तसेच मानव आणि प्राण्यांच्या आकृत्यांची नक्षी आढळली. एएसआयने संकेत दिला आहे की हे स्थळ कदाचित देवी सरस्वतीला समर्पित असलेले प्राचीन मंदिर असावे.(Bhojshala Case)
असी माहिती आहे की, याचिकाकर्ते आणि हिंदू फ्रंट फॉर जस्टिस चे प्रदेश उपाध्यक्ष आशीष गोयल यांनी सांगितले की एएसआयचा सर्वे स्पष्टपणे दर्शवतो की संपूर्ण रचना परमार वंशाच्या कालखंडातील असून तिचे बांधकाम राजा भोज आणि त्यांच्या पूर्वजांनी केले होते. त्यांनी दावा केला की ही रचना सुमारे ९५० ते १,००० वर्षे जुनी असून हा अहवाल हिंदू समाजासाठी उत्साहवर्धक आहे.(Bhojshala Case)
मंदिर शैलीच्या वास्तुकलेचे संकेत आढळले
सर्वेक्षण अहवालानुसार, भोजशाला परिसरात नाणी, सनातन धर्माशी संबंधित प्रतीकचिन्हे आणि देवी-देवतांच्या मूर्तींचा उल्लेख करण्यात आला आहे. मंदिर शैलीच्या वास्तुकलेचे संकेत आढळले आहेत. अनेक स्तंभांवर नक्षीकाम, कमळाच्या आकृती आणि शिल्पांचे अवशेष सापडले. तसेच संस्कृत भाषेतील शिलालेखांची नोंद करण्यात आली असून ते १२व्या ते १६व्या शतकादरम्यानचे असल्याचे सांगितले जात आहे.(Bhojshala Case)
५०० हून अधिक छायाचित्रांचा पुरावा म्हणून समावेश
२१०० पानांच्या या अहवालात भोजशाला सर्वेक्षणादरम्यान काढलेल्या ५०० हून अधिक छायाचित्रांचा पुरावा म्हणून समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, भोजशालेचे बांधकाम १२ व्या शतकात झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर मालव्यात कमाल मौला यांचे आगमन १२६५ मध्ये झाले होते, असे नमूद करण्यात आले आहे.(Bhojshala Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक