‘साधनामस्त’ कलाकार

    24-Feb-2026   
Total Views |
Jagdish Kannam
 
रुपेरी पडद्यावर अभिनय साकारताना आपल्या मातीतली लोककला जपणार्‍या जगदीश कन्नमची गोष्ट...
 
कुठल्याही कलाकारासाठी त्याचं जीवन हीच त्याची साधना असते, असं म्हणतात. कलाकाराच्या वाटेत असंख्य अडचणी, खाचखळगे त्याच्या प्रतिक्षेत असतात. पण, तरीही कलाकाराला साधनामस्त होऊनच त्याचं आयुष्य घडवावं लागतं. असाच एक युवा कलाकार म्हणजे जगदीश कन्नम. तंत्रज्ञानाच्या युगामुळे प्रसिद्धीचं माध्यमसुद्धा लोकांच्या तळहातावर आलं. एका बाजूला रुपेरी पडद्यावर अभिनय साकारणार्‍या बड्या नटाला ज्या टाळ्या मिळतात, त्याच पद्धतीचं कौतुक एखादी वेब-सीरिज, रील बनवणार्‍या कलाकारालासुद्धा मिळतं. (अर्थात, चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा याचा अवकाश जरी लहान असला, तरी त्याला कमी लेखण्याची चूक कोणी करू नये) आज भारतामध्ये या नव्या माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ग्रामीण भागातील असंख्य मुले-मुली करत आहेत. त्यांना तितयाच उत्स्फूर्तपणे प्रतिसादसुद्धा लाभतो. अशा या माध्यमांच्या जगात वावरणार्‍या कलाकाराचं भावविश्व तितक्याच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे.
 
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे जगदीशचा जन्म झाला. जगदीशची मातृभाषा तेलुगू. अर्थात, त्याने ही माहिती न पुरवल्यास आपल्याला हे जाणवत नाही, इतकं अस्खलित मराठी तो बोलतो आणि त्याचं मराठीपण जपतो. पाचवीत असताना पितृछत्र हिरावलं गेलं. मात्र, या प्रवासात त्याच्या आईने ही पोकळी भरून काढली. अशा काळामध्ये जीवनात ज्या संघर्षाचा सामना करावा लागतो, तो करता-करता आयुष्याचे अनेक धडे जगदीश शिकत गेला. उन्हाळी सुट्यांमध्ये शिबिरांना जायला मिळालं नाही, याची बोच अधिक होती. मात्र, याही परिस्थितीमध्ये त्याच्यातील कलाकाराने त्याला उभारी दिली. दहावीच्या परीक्षेत कमी टक्के मिळाले म्हणून परत एकदा त्याच परीक्षेला बसण्याची तयारी दाखवणार्‍या जगदीशची करुण प्रतिमा आपल्यासमोर लगेच उभी राहते. त्याच्या जीवनाच्या या प्रवासात कलाक्षेत्र त्याला खुणावत होतं. अभिनय, संगीत यांच्या संयोगातून त्याच्या अंतरंगात काही तरी आकार घेत होतं. छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन वाणिज्य व कला महाविद्यालयात त्याचा दहावीनंतरचा प्रवास सुरू झाला. प्राध्यापक गजानन केचे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा संगीताचा प्रवास सुरू झाला. राज्यस्तरीय भक्तिगीत स्पर्धेमध्ये त्याचा आवाज घुमला. याच काळात जगदीशने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले. दरम्यान, अशाच एका चित्रपटाच्या शिबिरामुळे जगदीश अभिनयाकडे वळला. काही चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. मात्र, त्याच्या प्रदर्शनाची त्याला प्रतीक्षाच करावी लागली. रंगभूमीवरसुद्धा त्याचा या काळात वावर सुरू होता.
 
अशातच त्याने मुंबईची वाट धरली आणि त्याच्या जीवनाचा भूगोल बदलला. युवक महोत्सवांमध्ये रंगणार्‍या लोककलेची त्याला भुरळ पडली आणि त्याच्या जाणिवांचा पैस पूर्णपणे बदलून गेला. लोककलेचं अधिकृत शिक्षण त्याने या मुंबईतच घेतलं. मुंबई विद्यापीठातील ‘मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स इन फोक आर्ट्स’ हा अभ्यासक्रम जेव्हा मुंबई विद्यापीठात सुरू झाला, त्यावेळी पहिल्या तुकडीतील विद्यार्थी म्हणून जगदीशला अनेकांचं मार्गदर्शन लाभलं. लोककलेचे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी विद्यार्थांचा पाया पक्का केला. मुंबईची वारी शिक्षणामुळे, कामानिमित्ताने होतच होती. अशातच, निखिल महाजन लिखित ‘जून’ या चित्रपटात २०२१ साली जगदीशने पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे, २०२२ साली ‘भाडिपा’ या ‘युट्यूब’वरील डिजिटल वाहिनीच्या ‘B.E Rojgaar’ या वेब-सिरीजमध्ये काम करण्याची संधी जगदीशला मिळाली. याच काळामध्ये संभाजी सासणे या मित्राचा पाठिंबा जगदीशला मिळाला. याच काळात सुरज खरटमल या समविचारी कलावंतासोबत काही नवीन योजना आकाराला आल्या. मराठी संस्कृती, मराठी मातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या लोककलांचा जागर आज सगळीकडे होतोय. मात्र, या कलेचं अस्सल आणि पारंपरिक रूप प्रेक्षकांसमोर योग्य त्या पद्धतीने पोहोचत नाही, ही विवंचना एक विद्यार्थी म्हणून त्याला सतावत होती.
 
यातूनच ‘विश्व लोककला मंच’ हा प्रयोग जन्माला आला. तमाशा, भारुड, गोंधळ या लोककलांमागची आख्यायिका, अस्सल विचार या कलाकारांनी मांडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाचं लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या ‘अभिव्यक्ती आर्ट फेस्टिव्हल’मध्ये, ‘विश्व लोककला मंचा’च्या सादरीकरणाने अनेकांचे डोळे दिपले. मराठी मुलखाचा आवाज भाषेच्या सीमा ओलांडून लोकांच्या काळजात घुमत राहिला. आपल्या अभिनयातून लोककलेसाठी, संस्कृतीसाठी भरीव कामगिरी करण्यासाठी जगदीश आणि त्याचे मित्र सज्ज आहेत. त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
 
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.