ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष नुकतेच भारत दौर्यावर आले आणि दिल्लीच्या राजनैतिक पटावर एक शांत; परंतु अर्थपूर्ण घटना घडली. ही फक्त औपचारिक भेट नव्हती, तर दोन मोठ्या लोकशाही, दोन उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि ‘ग्लोबल साऊथ’चे प्रतिनिधी एकत्र येत, नव्या समीकरणांची ती नांदी ठरली.
भारत आणि ब्राझील या दोन देशांकडे आपण अनेकदा भौगोलिक अंतराच्या चष्म्यातून पाहतो. एक आशियात, दुसरा लॅटिन अमेरिकेत; पण जागतिक राजकारणाचा पट पाहिला, तर ही दोन राष्ट्रे एकाच रेषेवर उभी दिसतात. वसाहतवादानंतर उभी राहिलेली राष्ट्र, प्रचंड लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्ती, विषम सामाजिक रचना आणि तरीही, लोकशाही-प्रक्रियेवरचा विश्वास. म्हणूनच, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या भारतभेटीकडे केवळ ‘प्रोटोकॉल’ म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. दिल्लीतील औपचारिक स्वागत समारंभ हा बाह्य भाग होता. प्रत्यक्षात या भेटीत दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली म्हणजे भारत आणि ब्राझील दोघेही स्वतःला केवळ ‘प्रादेशिक शक्ती’ म्हणून मर्यादित ठेवू इच्छित नाहीत. दुसरी म्हणजे, ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आता केवळ घोषणांपुरता न राहता, व्यवहारात उतरू लागला आहे.
भारत आणि ब्राझीलचे संबंध नवे नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळातच दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. परंतु, २१व्या शतकात या नात्याला रणनीतिक भागीदारीचा दर्जा मिळाला. ‘आयबीएसए’ म्हणजे इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका या त्रिपक्षीय मंचाने दक्षिण-दक्षिण सहकार्याचा आराखडा मांडला. नंतर ‘ब्रिक्स’ या व्यासपीठाने या सहकार्याला व्यापक परिमाण दिले. आज ‘ब्रिक्स’ हा फक्त आर्थिक गट राहिलेला नाही, तर तो जागतिक सत्तासमीकरणांना पर्याय सुचवणारा मंच ठरत आहे. लुला आणि मोदी यांच्या भेटीत ‘व्यापार’ हा केंद्रस्थानी विषय होता. सध्या दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे १५ अब्ज डॉलर्सच्या आसपास. हे प्रमाण दोन मोठ्या अर्थव्यवस्थांसाठी अपुरे आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत २० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याचे ध्येय व्यक्त झाले. भारत ब्राझीलकडून कच्चे तेल, सोयाबीन, साखर यांसारख्या वस्तू घेतो. ब्राझील भारताकडून औषधे, वाहनांचे सुटे भाग, रसायने, ‘आयटी’ सेवा घेतो. या पारंपरिक स्वरूपाला बदलून मूल्यवर्धित उत्पादन आणि तंत्रज्ञान सहकार्याकडे वळण्याची गरज दोघांनाही जाणवते.
इथेच महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. जागतिक पुरवठा साखळ्या आज अस्थिर आहेत. ‘कोविड’नंतर आणि रशिया-युक्रेन संघर्षानंतर जगाला कळले की, काही मोजक्या देशांवर अवलंबून राहणे धोकादायक आहे. चीनवरचे अवलंबित्व कमी करण्याची चळवळ पाश्चात्त्य देशांत सुरू आहे. अशा वेळी भारत आणि ब्राझील दोघेही पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून पुढे येऊ शकतात. ब्राझीलकडे खनिजसंपत्ती आणि कृषी उत्पादनाची ताकद आहे. भारताकडे उत्पादन-कौशल्य, तंत्रज्ञान आणि मोठी बाजारपेठ आहे. या पूरक क्षमतांचा मेळ घातला, तर दोन्ही देशांना परस्पर लाभ होऊ शकतो. दुर्मीळ खनिजांच्या क्षेत्रांत सहकार्याची चर्चा विशेष उल्लेखनीय आहे. इलेक्ट्रिक वाहनांपासून ते सेमीकंडक्टरपर्यंत अनेक उद्योग या खनिजांवर अवलंबून आहेत. चीनने या क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले आहे. भारताला आत्मनिर्भरतेचा मार्ग शोधायचा आहे. ब्राझीलकडे या खनिजांचे साठे आहेत. त्यामुळे या सहकार्याचा अर्थ केवळ द्विपक्षीय करारात मर्यादित राहत नाही, तो जागतिक आर्थिक संतुलनाशी जोडला जातो.
कृषी क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये परस्पर शिकण्यासारखे बरेच आहे. ब्राझीलने मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेती, जैवतंत्रज्ञान आणि निर्याताभिमुख उत्पादन विकसित केले. भारताकडे लघू शेतकरी, विविध पिके आणि अन्नसुरक्षेची गरज आहे. जैव-इंधनाच्या क्षेत्रात ब्राझीलचे ‘मॉडेल’ उल्लेखनीय आहे. उसावर आधारित ‘इथेनॉल’निर्मितीत ब्राझील अग्रणी आहे. भारतानेही इथेनॉल मिश्रणाच्या दिशेने पावले टाकली आहेत. या क्षेत्रातील तांत्रिक सहकार्य ऊर्जा-सुरक्षेसाठी उपयुक्त ठरू शकते. ‘डिजिटल अर्थव्यवस्था’ हा आणखी एक महत्त्वाचा दुवा आहे. भारताने डिजिटल पेमेंट, आधार, ‘यूपीआय’ यांसारख्या प्रणालींमुळे मोठा बदल अनुभवला. ब्राझीलमध्येही डिजिटल व्यवहारांची वाढ होत आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या अनुभवांचा अभ्यास केल्यास ‘ग्लोबल साऊथ’साठी एक पर्यायी ‘डिजिटल मॉडेल’ उभे राहू शकते.
‘ग्लोबल साऊथ’ या संकल्पनेला भारताने गेल्या काही वर्षांत नवे परिमाण दिले. ‘जी-२०’ अध्यक्षपदाच्या काळात विकसनशील देशांचा आवाज पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. ब्राझीलनेही समान भूमिका घेतली आहे. विकसित देशांनी लादलेल्या नियमांना पर्याय सुचवण्याची गरज आहे. भारत आणि ब्राझील एकत्र आले, तर हा आवाज अधिक ठाम होऊ शकतो. कोणत्याही एका गटाशी पूर्णतः बांधील न राहता, बहुपक्षीय संबंध ठेवण्याची दोन्ही देशांची भूमिका आहे. ही भूमिका ‘ग्लोबल साऊथ’साठी आदर्श ठरू शकते. भारताच्या दृष्टीने लॅटिन अमेरिकेत आपली उपस्थिती वाढवणे आवश्यक आहे. ब्राझीलसारख्या द. अमेरिकेतील मोठ्या अर्थव्यवस्थेशी दृढसंबंध निर्माण केले, तर त्या प्रदेशातील इतर देशांशीही व्यापार आणि गुंतवणूक वाढवता येईल. औषधनिर्मिती, ‘आयटी’, अवकाश तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन या क्षेत्रात भारताकडे क्षमता आहे. ब्राझीलसाठी भारत हा प्रचंड बाजारपेठ आहे. तसेच आशियातील रणनीतिक भागीदारही आहे. चीनसोबत ब्राझीलचे मोठे व्यापारसंबंध आहेत; परंतु एकाच देशावर अवलंबून राहण्याचा धोका त्यांनाही जाणवतो. भारतासोबतचे संबंध संतुलन साधण्यास मदत करू शकतात. सांस्कृतिक पातळीवर दोन्ही देशांमध्ये साम्य आहे. तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली, तर लोकांमधील जवळीक राजनैतिक संबंधांना अधिक भक्कम आधार देईल.
भारत-ब्राझील संबंधांचा हा टप्पा म्हणूनच महत्त्वाचा आहे. ही भेट एखाद्या तत्कालिक राजकीय कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता, दीर्घकालीन रणनीतिक आराखड्यात रूपांतरित झाली; तर दक्षिण गोलार्धातील समीकरणे बदलू शकतात. दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रांनी एकमेकांकडे केवळ व्यापार भागीदार म्हणून नव्हे, तर समान प्रवासातील सहप्रवासी म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. विकास, स्वायत्तता आणि जागतिक न्याय्यतेच्या शोधात भारत आणि ब्राझीलची ही सांगड भविष्यातील राजनैतिक समीकरणांना आकार देऊ शकते. दक्षिण गोलार्धात उगवणार्या नव्या सूर्योदयाची ही चाहूल आहे की नाही, हे काळ ठरवेल; पण त्या दिशेने पावले पडू लागली आहेत, हे नक्की!
- संजीव ओक