मेक्सिकोचा मेंचो मेला तरी...

    24-Feb-2026   
Total Views |
El Mencho
 
मेक्सिको...उत्तर अमेरिकेतील या देशात कुख्यात ड्रग्जमाफिया एल मेंचो परवा लष्करी कारवाईत ठार झाला. जागतिक ड्रग्जविरोधी लढाईतील हे मोठे यश म्हणावे लागेल. परंतु, म्हणून ही लढाई संपलेली नाही. अमली पदार्थांच्या समूळ उच्चाटनासाठी सीमाभेद विसरून सर्व देश एकत्र येतील, तेव्हाच ‘ड्रग्जतस्करी’वर पोसणार्‍या रक्तबीजरूपी या राक्षसाचा कायमचा अंत होईल.
 
अमेरिका... जगातील सर्वांत विकसित देश. ३०-३१ ट्रिलियन डॉलरची डोळे दिपवणारी शक्तिशाली अर्थव्यवस्था. पण, एकीकडे ‘जगातील आर्थिक महासत्ता’ असे बिरुद मिरवणार्‍या अमेरिकेला दुसरीकडे अमली पदार्थांनी पुरते पोखरून काढले. २०२३च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत तब्बल एक लाख, दहा हजार, ९०० नागरिकांचा मृत्यू हा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाला. यावरून अमेरिकेतील ड्रग्जच्या नशेचे गांभीर्य लक्षात यावे. त्यातही अमेरिकेतील कित्येक शहरांच्या पदपथांवर, सबवेंमध्ये ड्रग्जच्या पूर्णत: आहारी गेलेले तरुण-तरुणी अर्धमेल्या अवस्थेत खितपत पडलेले असतात. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, अमेरिकेत सहजासहजी उपलब्ध होणारे ‘झाँबी’ ड्रग्ज. ‘जाईलाजीन’ या पशुवैद्यकशास्त्रात वेदनाशामक म्हणून वापरल्या जाणार्‍या औषधात ‘हेरॉईन’ किंवा ‘फेंटानिल’ मिश्रित करून त्याचा नशेसाठी वापर केला जातो. ही नशा इतकी भयंकर असते की, त्याच्या अतिसेवनाने जीवही गमवावा लागतो.
 
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी दरवर्षी अमेरिकेतील केंद्रीय आणि राज्यांची सरकारे कठोर पावले उचलतात. २०२५ साली जवळपास दोन लाख, ७२ हजार, १५५ किलोंचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यापैकी बहुतांश अमली पदार्थ अमेरिकेत दाखल होतात, ते शेजारी देश मेक्सिकोमार्गे. अमेरिका-मेक्सिकोची सीमा ही ३ हजार १४५ किमी पसरलेली. याच मेक्सिकोमधील ‘जलिस्को न्यू जनरेशनकार्टेल’ (सीजेएनजी)चा म्होरक्या नेमेसियो रूबेन ओसेगुएरा सर्वेंटेस ऊर्फ ‘एल मेंचो’ला परवा लष्करी कारवाईत ठार करण्यात आले. मेक्सिकोसह अमेरिकेसाठीही ड्रग्जविरोेधी लढ्यातील हा निर्णायक टप्पा असला, तरी ही लढाई इथे संपलेली नाही.
 
एल मेंचो हा जगातील ‘मोस्ट वॉण्टेड’ ड्रग्ज-तस्करी करणार्‍या ‘कार्टेल’चा अर्थात, संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळीचा प्रमुख. अमेरिकेने त्याच्यावर १३० कोटी रुपयांचे घसघशीत इनामही ठेवले होते. यावरून मेंचोचे उपद्रवमूल्य लक्षात घ्यावे. आता हा मेंचो कोणी तिशी-चाळीशीतला तरणाबांड मेक्सिकन तरुण नव्हे, तर त्याचे वयवर्षे होते ५९. म्हणजे, साठीला टेकेपर्यंत त्याने आयुष्यभर अमली पदार्थांच्या तस्करीतून बक्कळ माया तर कमावलीच; पण लाखोंना नशेच्या दलदलीत ढकलून त्यांचा बळीही घेतला. अशा या आधी पोलिसांत सेवा बजावलेल्या मेंचोला संपवायला मेक्सिकोसह अमेरिकेलाही इतकी वर्षे लागली, यावरून त्यांच्या नक्षल्यांसारख्याच छुप्या रणनीतीचा अंदाज यावा.
 
मेंचोच्या मृत्यूनंतर ‘सीजेएनजी’ कार्टेलच्या तस्करांनी मेक्सिकोमधील काही शहरांत जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले. खबरदारीचा उपाय म्हणून मेक्सिकन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा तेथील सरकारने दिला आहे. यावरून कार्टेलच्या टोळ्यांचा संबंध हा फक्त ड्रग्ज-तस्करीपुरता मर्यादित नसून, देशाला वेठीस धरण्याइतपत पैसा, शस्त्रास्त्रांचे बळही त्यांच्या पाठीशी आहे. मागे तर या कार्टेलच्या टोळ्यांनी रॉकेट ग्रेनेडचा वापर करून मेक्सिकन सैन्याचे हेलिकॉप्टरही पाडले होते. एवढेच नाही, तर या टोळ्यांच्या आड येणारे सरकारी अधिकारी, ‘एनजीओ’च्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या दिवसाढवळ्या हत्या करणे, विरोधकांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी त्यांची हत्या करून मृतदेह पुलावर लटकवणे, महिलांवर नृशंस अत्याचार असा हा सगळा ‘नार्कोटिक्स दहशतवाद.’ परंतु, मेंचोच्या मृत्यूनंतर ‘सीजेएनजी’ कार्टेलचे खोलवर पसरलेले जाळे एकाएकी उद्ध्वस्त होणारे अजिबात नाही. दहशतवादी संघटनांप्रमाणे इथेही दुसर्‍या फळीतले नेतृत्व ही संघटना ताब्यात घेते किंवा अशा संघटना फुटून त्यांचे गटतट आपापसातच भिडायला सज्ज होतात. त्यातच मेक्सिकोमध्ये ‘सीजेएनजी’चा प्रतिस्पर्धी म्हणजे ‘सिनोला कार्टेल.’ शिवाय, आणखीन १० ते १५ असे ड्रग्ज-तस्करांचे समूह आणि शेकडो लहान-मोठे गटही सक्रिय आहेत. त्यामुळे मेक्सिकोमध्ये अमली पदार्थांची ही विषारी कीड किती खोलवर फोफावलेली आहे, याचा प्राथमिक अंदाज यावा.
 
अमली पदार्थ तस्करीची समस्या ही केवळ मेक्सिको अथवा अमेरिकेपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जगाला या जीवघेण्या नशाबाजीने विळखा घातला आहे. अमली पदार्थांचा धोका जगाने ७०-८०च्या दशकातच ओळखला होता. त्यानंतर याविषयी जागतिक करारही झाले. ‘जागतिक आरोग्य संघटना’, ‘इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड’ (आयएनसीबी), ‘युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ ड्रग्ज आणि क्राईम’ (यूएनओडीसी), ‘कमिशन ऑन नार्कोटिक्स ड्रग्ज’ (सीएनडी) यांसारख्या संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरतदेखील आहेत. परंतु, दुर्दैवाने अमली पदार्थांच्या या वैश्विक संकटावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, एखाद्या कार्टेलवर कारवाईनंतरही नवीन रूपात, विविध शकले घेऊन ते कार्यरत राहतात.
 
अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियामधील सुमारे ४०-५० देशांत मेक्सिकोच्या ‘सिनोला कार्टेल’चे जाळे विखुरलेले आहे. इस्मायल एल मायो झाम्बाडा याला २०१४ मध्ये अटक होऊनही ‘सिनोला कार्टेल’ बिनबोभाटपणे सुरुच आहे. म्हणजेच, या कार्टेलची अवस्था ही रक्तबीजाच्या राक्षसासारखीच. त्यावर कितीही वार केले, तरी त्याच्या उरल्यासुरल्या तुकड्यांमधून हा राक्षस पुनरुज्जीवित होतो. त्यातच देशोदेशीचे ड्रग्जविरोधी कारवाईचे विविध कायदे-कानून, कारवायांसाठीच्या मर्यादा आणि एकूणच आंतरराष्ट्रीय सहकार्यातील उदासीनपणा या कार्टेलच्या पथ्यावरच पडताना दिसतो. चीनसारखे काही देश तर अशा तस्करांना अमली पदार्थांसाठी लागणारा कच्चामालाचा पुरवठा करून त्यांच्या शत्रू देशाविरोधात छुप्या शस्त्रासारखा वापर करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर या कार्टेलकडे असलेला अमाप पैसा, शस्त्रास्त्रे, अमली पदार्थांची वाढती मागणी, देश-विदेशातील भ्रष्टाचार, कार्टेलवरील कारवाईनंतर मानवाधिकारांच्या नावाखाली होणारा विरोध, या कारणांमुळेही हे कार्टेल जणू अजेय ठरतात.
 
भारतातही अमली पदार्थांची दाहकता तितकीच चिंताजनक. २०२५ च्या अखेरीस १.३३ लाख किलोंचे ड्रग्ज भारतीय यंत्रणांनी जप्त केले होते, ज्याचे मूल्य अंदाजित एक हजार, ९८० कोटी रुपये इतके होते. एल मेंचोच्या कार्टेलचे २०२४ साली अंदमानमध्ये सहा हजार किलोचे तब्बल सहा हजार कोटी मूल्यांचे ड्रग्जचे मोठे घबाडही ‘नार्कोटिक्स ब्युरो’कडून जप्त करण्यात आले होते. यावरून मेंचोच्या कार्टेलचा जागतिक प्रभाव लक्षात यावा. आता मेंचो मेला असला, तरी त्याचे कार्टेल कोलमडेल, असे मुळीच नाही. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी रोखायची असेल, तर सर्व देशांना मतभेद विसरुन एकत्रितपणे या समस्येच्या मुळावरच घाव घालावा लागेल.
 
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची