विजय-रश्मिकाची लगीनघाई! उदयपूरमध्ये रंगणार विवाहसोहळा

    23-Feb-2026
Total Views |

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) अखेर लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम देत स्वतःच मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. मात्र आता या दोघांनी आपल्या लग्नाला अधिकृत स्वरूप देत त्याला खास नाव दिलं आहे ते म्हणजे विरोश (VIROSH) विजय आणि रश्मिका यांच्या नावापासून हे छान नाव त्यांनी आपल्या नात्याला दिलं आहे.

उदयपूरमध्ये लग्नसोहळ्याची लगबग

रश्मिका आणि विजय कुटुंबासह उदयपूरमध्ये दाखल झाले असून त्यांचे एअरपोर्टवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही वेस्टर्न आणि मॅचिंग आउटफिटमध्ये दिसले. विशेष म्हणजे ते एकत्र न येता स्वतंत्रपणे पोहोचले. रश्मिका पापाराझींसमोर हसतमुखाने पोझ देताना दिसली, तर विजयने नम्रपणे वाकून अभिवादन केले. दोघांच्या चेहऱ्यावर लग्नाची आनंदी उत्सुकता स्पष्ट दिसत होती.

रविवारी दोघांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिलं. “तुम्ही आम्हाला प्रेमाने एक नाव दिलं VIROSH. त्यामुळे आज आम्ही आमच्या या मिलनालाही तेच नाव देत आहोत,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. चाहत्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानत त्यांनी हा सोहळा ‘विरोशचं लग्न’ म्हणून संबोधलं.

लग्नाची तारीख काय?

अधिकृत पोस्टमध्ये तारीख किंवा स्थळाचा उल्लेख नसला तरी, मागील आठवड्यात व्हायरल झालेल्या कथित निमंत्रणपत्रिकेनुसार २६ फेब्रुवारी २०२६ रोजी छोट्या आणि खासगी समारंभात हे लग्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचं समजतं आहे. तसेच रश्मिकाची आई आणि बहीणही उदयपूरमध्ये दाखल झाल्या आहेत.

पडद्यावरची जोडी, आता खऱ्या आयुष्यातही

रश्मिका आणि विजय यांनी प्रथम गीता गोविंदम (Geetha Govindam) या चित्रपटात एकत्र काम केलं. त्यानंतर डियर कॉम्रेड (Dear Comrade) मध्येही त्यांची जोडी झळकली. या चित्रपटांमधील केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि रिअल लाइफमध्येही त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या. जवळपास सहा ते सात वर्षे दोघांनी आपल्या नात्याबद्दल मौन राखलं; मात्र आता त्यांनी स्वतःच या नात्याची कबुली देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रश्मिका आणि विजय हे साऊथचे प्रसिद्ध कलाकार असले तरीही देशभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. तर रश्मिकाने साऊथसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू असून, अनेकांनी त्यांना इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोड्यांपैकी एक म्हटलं आहे. काहींनी तर त्यांची तुलना बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांशीही केली आहे. ‘विरोश’च्या या नव्या अध्यायाकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या लग्नाची झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुकही आहेत.