तालिबानच्या राजवटीत, नागरिकांना जिवंतपणीच मृत्यू अनुभवायला मिळत आहे. माणसाचा केवळ श्वासोच्छ्वास चालू आहे, याचा अर्थ तो जिवंत आहे, असं नव्हे! माणूस ज्या वेळी मोकळ्या हवेमध्ये श्वास घेतो, मुक्तपणे वावरतो, त्याच्या जीवनावर कोणाचेही नियंत्रण नसते अशावेळी तो खर्या अर्थाने जीवन जगतो आहे असे म्हणता येते. माणसाच्या या जगण्याचा आनंद तो संगीतातून, सुरांच्या माध्यमातून व्यक्त करतो. मात्र, तालिबानला याच सुरांचेही वावडेच असल्याचे दिसते.
काही दिवसांपूर्वी तालिबानच्या परवान भागात, तालिबान्यांनी जवळपास ५०० संगीतवाद्ये उघड्यावर जाळली. अफगाणिस्तानमधल्या नागरिकांना एकूणच ‘संगीत’ या गोष्टीचा विसर पडावा, यासाठी तालिबानी सरकारकडून हे कृत्य घडवण्यात आले. तालिबानी सरकारच्या माहितीनुसार, परवान नजीकच्या लघमन प्रांतामध्येसुद्धा शेकडो वाद्ये उद्ध्वस्त करण्यात आली असून, त्यामध्ये तबला, ड्रम, गिटार, टोमबाक, डफ आदी वाद्यांचा समावेश आहे. याचबरोबर लाऊडस्पीकरसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. यातील एकेक वाद्य शिकण्यासाठी कलाकार आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतात मात्र, अफगाणिस्तानमधल्या सत्ताधार्यांकडून काही क्षणांतच या वाद्यांचा चुराडा करण्यात आला. काही कलाकारांच्या मते, अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे, त्याला ‘सांस्कृतिक नरसंहार’ असेच म्हणता येईल.
मागील दोन वर्षांत २१ हजारांहून अधिक वाद्ये तालिबान राजवटीमध्ये उद्ध्वस्त करण्यात आली. ‘संगीत’ हे माणसाच्या अभिव्यक्तीचे साधन आहे, असं म्हणतात. ज्या राजवटीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच गळचेपी सर्रास होते, तिथल्या सत्ताधार्यांना संगीताचे सूर तरी कसे आपलेसे वाटतील? तालिबानच्या या राजवटीत संगीताची गळचेपी होते, कारण त्यांच्या मते संगीत हे ‘हराम’ आहे. इस्लामी कायद्यांचा, वचनांचा त्यांनी म्हणून जो अन्वयार्थ लावला आहे, त्यात संगीताला स्थान नाही. म्हणूनच, लग्न समारंभ, हॉटेल, शाळा इत्यादी ठिकाणी संगीत वाजवण्यास परवानगी नाही. अशा या तालिबानच्या राजवटीत टीव्ही आणि रेडिओ सुरू आहे; मात्र त्यावरसुद्धा धार्मिक संगीताशिवाय लोकांना दुसरं काहीही ऐकायला मिळत नाही.
मागच्या चार वर्षांत जी माणसं संगीत ऐकताना, तयार करताना, वाजवताना पकडली गेली, त्यांना तालिबानने कठोर शिक्षा केली. प्रत्येक राष्ट्राचा, स्वतःचा असा एक सांस्कृतिक वारसा असतो. अफगाणिस्तानसारख्या देशात आज कितीही क्रूर शासन असलं, तरी या देशाचासुद्धा स्वतःचा म्हणून एक वारसा आहे. अफगाणिस्तानमध्ये एके काळी मुक्त कंठाने आणि मुक्त मनाने संगीताचा आस्वाद घेणारी माणसं होती. हा वारसा जपणारी एकमेव संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक होय. ही निर्वासित संस्था सध्या पोर्तुगाल या देशामध्ये कार्यरत आहे. पश्तून, ताजिक, हजारा समुदायांची स्वतःची एक जीवनपद्धती होती, त्यातूनच त्यांचं संगीत आकाराला आलं होतं. एखाद्या राष्ट्राला स्वतःची ओळख जोपसण्यासाठी दुसर्या राष्ट्राचा आधार घ्यावा लागत आहे, हीच खरी लाजीरवाणी बाब. मात्र, तालिबानच्या राजवाटीचे हेच दुर्दैवी वास्तव आहे.
तालिबानी राजवाटीतील शोकसंगीत केवळ इथेच थांबले असते, तर कष्टातही आनंद झाला असता. मात्र सत्य त्याहून कटू आहे. तालिबानच्या राजवटीमध्ये महिलांचा आवाज हा खासगी मानला जातो. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करणे, मोठ्याने वाचणे किंवा गाण्यावर पूर्णतः बंदी आहे. अनोळखी स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांकडे पाहणेदेखील गुन्हा मानला जाऊ शकतो. पत्रकारांवर जिवंत प्राण्याचे किंवा मानवाचे फोटो प्रसिद्ध करण्यास किंवा चित्रीकरण करण्यास, बंदी घालण्यात आली आहे. पाश्चात्य संस्कृतीचा या राजवटीला भलताच तिटकारा आहे. पुरुषांनी केवळ पारंपरिक सैल कपडे (पेरहन तुनबान) घालण्याची सक्तीच या राजवाटीत करण्यात आली आहे.
हा सारा पसारा कमी होता की काय म्हणून, तालिबानच्या राजवटीत नव्या नियमानुसार पती आपल्या पत्नीला आणि मुलांना शिस्त लावण्याची परवानगी देतो. अर्थात ही शिस्त लावताना त्यांच्या पाठीचा कणा तुटला तरी चालेल; मात्र हाडं तुटता कामा नये आणि जखमा दिसता कामा नये. असंवेदनशीलतेचा कळस गाठलेली ही राजवट कुठवर लोकांनी सहन करायाची, असा सवाल आता विचारला जातोय.