ओलेक्ट्रा ग्रीनटेकला १,८०० कोटींची ऑर्डर; १,०८५ ई-बसेस पुरवणार!

    23-Feb-2026
Total Views |

मुंबई : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची हैदराबादस्थित कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळा (TGSRTC) कडून तब्बल १,०८५ इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे सुमारे १,८०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.

कोणत्या बसेसचा समावेश?

या ऑर्डरमध्ये १,०२५ नॉन-एसी आणि ६० एसी बसेसचा समावेश असून सर्व बसेस १२-मीटर लांबीच्या असतील. या बसेस शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत.

१२ वर्षांचा करार...

हा करार १२ वर्षांच्या कालावधीसाठी असून तो GCC (Gross Cost Contract) मॉडेलवर आधारित आहे. या मॉडेलनुसार बसेसचा पुरवठा, संचालन आणि देखभाल यांची जबाबदारी ओलेक्ट्रा कंपनीकडेच राहणार आहे. पुढील २० महिन्यांत सर्व बसेसचा पुरवठा पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत

गेल्या तीन वर्षांत सुमारे १५९ टक्के परतावा देणाऱ्या या कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारातही कंपनीच्या समभागांबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून, आगामी काळात शेअर किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.