जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त पाळू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षांकडून सातत्याने जनदेशाचा अपमान...

    23-Feb-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) आम्ही या अधिवेशनात एक चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न करू. अजिदादांना अपेक्षित सगळे मुद्दे यात नमूद करू. जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त पाळण्याची गरज पडल्यास कडक पावले उचलू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री अतुल सावे उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महायुती सरकारचे सहावे अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून या अधिवेशनाच्या माध्यमातून गोर गरीब आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. देशात सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक दिवस अधिवेशन महाराष्ट्रात होते. अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतू, दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कुठल्याही मुख्यमंत्र्याला निर्धास्तोने अर्थखाते देता यावे, असे अजितदादा होते. ते आर्थिक शिस्त पाळायचे. यावेळी दादा नाहीत. सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच या अधिवेशनात येणार असून त्यासुद्धा अतिशय ठामपणे या अधिवेशनाला सामोरे जातील, असा विश्वास आहे."
 
"या अधिवेशनात एकूण १५ विधेयके मांडले जातील. त्यातील २ विधेयक जुने प्रलंबित आहेत. हे सगळे विधेयक आम्ही पूर्ण चर्चेअंती मंजूर करू. भरपूर चर्चा करणार असून विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ. चर्चेतून प्रश्न सुटतात हे मानणारे आम्ही लोक असून पूर्ण काळ अधिवेशन चालेल," असेही त्यांनी सांगितले.
 
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला वाढीव २० हजार कोटी
 
"केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत २० हजार कोटी रुपयांची वाढ झाली. यासाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो. रेल्वेच्या बजेटमध्ये आपल्याला २३ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. याउलट यूपीए सरकारच्या काळात १० वर्षात १२ हजार कोटी रुपये मिळाले. दावोसमध्ये आपण ३० लाख कोटींचे करार केले. सभागृहात यावर चर्चा होईल आणि याबाबतीत असलेल्या शंका आणि गैरसमज आम्ही दूर करू. अजितदादांनी त्यांच्या बजेटमध्ये ५०० कोटी रुपयांचे एआय बजेट तयार केले होते. त्यातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप सुरू करण्यात आले आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
हेही वाचा : अधिवेशनाच्या तोंडावर मोठा निर्णय! उपमुख्यमंत्री शिंदेंकडील महत्त्वाची खाती इतर मंत्र्यांकडे...
 
 
विरोधकांच्या मातृभाषेत भरपूर चुका
 
"आम्हाला विरोधकांचे ६ पानांचे आणि १८ मुद्द्यांचे पत्र मिळाले. शरद पवार गटाचे आमदार नसल्याने त्यांनी त्या पत्रावर एक माजी आमदाराची सही घेतली. जागतिक मातृभाषा दिनी त्यांच्या पत्रात मातृभाषेत खूप चुका दिसल्या. आदित्य ठाकरेंना हे पत्र दाखवले असते तर त्यांनी कदाचित तज्ञांना दाखवून ते दुरुस्त केले असते. विरोधी पक्षांकडून सातत्याने जनदेशाचा अपमान करण्याचे काम होते. आमचे पक्ष जनतेत जाऊन प्रामाणिकपणे त्यांची सेवा करत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेने आम्हाला अभूतपूर्व विजय दिला. विरोधक यातूनही शिकणार नसतील तर त्यांचे काय होईल ते माहिती नाही," अशी टीकाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती मिळून ठरवतील.
 
अभ्यास न करता विरोधकांचे आरोप
 
"मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पात १२ हजार कोटींचा भ्रष्टाचार असा आरोप विरोधकांनी अभ्यास न करता केला. परंतू, ज्यांना ही कामे दिली होती त्यातील ज्या लोकांनी कामे पूर्ण केली नाहीत त्यांनी ४० कोटी रुपयांची बँक गॅरंटी आपण जप्त केली. त्यामध्ये ५ कंपन्यांची बँक गॅरंटी फसवी आहे हे लक्षात आले असून त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी जे काम केले त्याच्यासहित ते काम दुसऱ्यांना देणार आहे. यामध्ये राज्य सरकारची यात एक पैशांचीही गुणवणूक नाही. विरोधी पक्षाने आरोप करावा. पण तो माहिती आणि पुराव्यासहित करावा. हवेत गोळीबार करणे योग्य नाही. सभागृहात विरोधक जे आरोप प्रत्यारोप करतील त्याला उत्तर देण्यास आम्ही त्या आहोत."
 
 हे वाचलत का? - चेन्नईच्या गोल्डन बीचवर दुर्दैवी घटना; महाराष्ट्रातील विद्यार्थिनीचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
 
शंका उपस्थित करताना अजितदादांच्या परिवाराला त्रास होता कामा नये
 
"अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताने सर्वच लोक दुःखी आहेत. या घटनेची डीजीसीएच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. याची सीबीआय चौकशी करण्यासंदर्भात मी केंद्र सरकारने पत्र लिहिले आहे. १३ निर्धारित मानकांवर डीजीसीए ची चौकशी सुरू आहे. व्हॉईस रेकॉर्डर प्राप्त केले आहे. त्यामुळे सगळ्या रेकॉर्डची चौकशी सुरू आहे. व्ही एस आर कंपनीचे पूर्ण ऑडिट सुरू आहे. त्यामुळे या चौकशीच्या निकालाची वाट बघितली पाहिजे. कुणाच्याही मनात शंका असल्यास योग्य संस्थेकडे ती व्यक्त केली पाहिजे. त्यांनी डीजीसीए ला या शंकांबाबत पत्र लिहिले पाहिजे. आम्हाला पत्र दिल्यास आम्ही ते डीजीसीएला पाठवू. आम्ही सगळे रोज हवाई प्रवास करतो. त्यामुळे या चौकशीतून जे काही पुढे येईल ते आमच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. शंका घ्याव्या परंतू, कुठल्याही प्रकारे अजितदादांना आणि त्यांच्या परिवाराला त्रास होता कामा नये," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
"माझ्या कार्यालयात जरी एखादी तक्रार मिळाल्यास तिथे एसीबीला धाड पाडून कारवाई करण्याची सूचना मी दिली आहे. आम्ही तिन्ही पक्ष समन्वयाने चाललो आहोत. त्यामुळे आम्हाला असे काम करण्याची गरज नाही. ज्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत, त्यांच्यावर कारवाई होते. या प्रकरणात कुठल्याही संभाषणात मंत्र्यांचे नाव आले नाही. त्यांचे नाव आले असते तर आम्ही त्यांचा राजीनामा घेतला असता," असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीनचिट दिली.
 
दिल्ली सारखी झालेली कृती अधिवेशनात होऊ नये - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्याकडे लागून राहायचे. परंतू, आज ते आपल्यात नाहीत. त्यांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आली आहे. आमचे मंत्रिमंडळ सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहे. अजितदादांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असून महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार असून ते एक अर्थतज्ज्ञ आहे. त्यांना राज्याची आर्थिक नाडी माहिती आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षात आम्ही अनेक योजना राबवल्या. राज्याला प्रगती पथावर नेण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अजितदादांनी राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली. विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला आहे. हे अधिवेशन सर्वांचे आहे. पण 'हम नहीं सुधरेंगे' हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या बैठकीवर त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. जनतेने विरोधकांना नाकारले आणि महायुतीला स्वीकारले आहे. दिल्ली येथे एआय समिटमध्ये जगभरातील लोक आले असतांना तिथे चड्डी बनियन गँग आली. त्यांनी स्वतःची अब्रु टांगली पण देशाची बदनामीही केली. हेच त्यांचे देशप्रेम आहे का? या अधिवेशनात पायऱ्यांवर अशी कृती होऊ नये, अशी अपेक्षा आम्हाला आहे. भारत मंडपम मध्ये घडलेल्या कृतीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे."
 
अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीशी तडजोड केली नाही - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. चहापानाचा कार्यक्रम हा केवळ औपचारिक नसून संवादाचा प्रभावी मंच असतो. अजितदादांनी ११ वेळ राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. वानखेडे साहेबांनंतर त्यांना सर्वाधिक वेळ अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला. दादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीशी आणि पारदर्शकतेशी कधीही तडजोड केली नाही. यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकीर्दीतील बारावा अर्थसंकल्प ठरला असता. पण नियतीचा वेगळाच निर्णय होता. लाडकी बहीण योजना बंद होईल अशी टीका झाली. परंतू, अजितदादांनी योग्य आर्थिक नियोजन करून ही योजना सुरूच ठेवली. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री सादर करणार असून तो राज्याच्या प्रत्येकाला न्याय देणारा असेल, असा विश्वास आहे. माझे हे पहिलेच अधिवेशन असून ते चांगल्या पद्धतीने चालेल अशी मला खात्री आहे."
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....