हरहुन्नरी अश्विनी

    23-Feb-2026   
Total Views |

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अवघड मार्ग चालत, ज्यांचे जीवन आज समाजातील अनेक मुलींसाठी पथदर्शी ठरले आहे, अशा अश्विनी डोमाडे यांच्याविषयी...

गोदावरीच्या काठावर वसलेले अहिल्यानगरमधील वडगाव हे एक छोटेसं गाव. याच गावात भाऊसाहेब आणि वत्सलाबाई सोनवणे हे एक शेतकरी कुटुंब राहात होते. पुढे कौटुंबिक वादामुळे ते विभक्त झाले. वत्सलाबाई आपली दोन लहान मुलं संजय आणि अश्विनी यांच्यासह आपल्या माहेरी आल्या. वत्सलाबाई यांच्या माहेरी आई मंजाबाई आणि लहान भाऊ नरहरी हे दोघेच होते. वत्सलाबाईंनी शेती करत नरहरी यांचा संसार उभा केला आणि आपल्या मुलांचंही संगोपन केलं.

अश्विनी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जाऊ लागल्या. गावात पाचवीपर्यंतच शाळा असल्याने, गावापासून सुमारे पाच ते सहा किमी दूर सहावीपासूनचे वर्ग भरत होते. शाळेच्या वेळात गावातून दळणवळणाची सुविधा नसल्याने, शाळेत जाणार्‍या पायीच जावे लागे. परिणामी, पालक मुलींना परगावी शाळेत पाठवीत नसत. मुलींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, हा दृष्टिकोनच गावकर्‍यांमध्ये नव्हता. अश्विनी यांनी पुढील शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा आपल्या आईला सांगितली. शिक्षणाअभावी आपल्यासारखे कष्ट मुलीच्याही वाट्याला येऊ नये, असेच त्यांच्या आईलाही वाटे. परंतु, गावातून चास या गावी शिक्षणासाठी एकट्या मुलीला कसे पाठवायचे? असा प्रश्न त्यांना पडला.

शाळेत जाताना मुलींची सोबत मिळावी म्हणून वत्सलाबाईंनी अश्विनीच्या वर्गातील पाचवी पास झालेल्या दहा ते बारा मुलींच्या घरी जाऊन, त्यांच्या आई-वडिलांना मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. अनेकांनी बावळटपणा असल्याचे म्हणत, स्पष्ट नकारच दिला. कशातरी त्या दहा-बारा मुलींपैकी दोन मुलींचे पालक तयार झाले. अश्विनी यांच्याबरोबर शिक्षणासाठी दुसर्‍या गावी जाणार्‍या संगीता सांगळे आणि भारती कांगणे या पहिल्या दोन मुली ठरल्या. अश्विनीची शिक्षणाची इच्छाशक्ती आणि वत्सलाबाई यांच्या धडपडमुळेच, सावित्रीच्या लेकी शिक्षणाची पाऊलवाट चालू लागल्या होत्या. त्यातूनच अनेक मुलींना प्रेरणा मिळाली. पुढच्या वर्षी इतर मुलींनीही आपल्या पालकांकडे या तिघींचे उदाहरण देऊन, चासला पुढील शिक्षणासाठी जाण्याचा आग्रह धरला. पालकांनाही मुली शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकतात, याचा आत्मविश्वास आला. त्यावेळची पहिली पाऊलवाट आता मुलींच्या शिक्षणाची अधिकृत वहीवाट झाली आहे. कितीतरी मुली आता बिनधास्त जाऊन, शिक्षण घेऊ लागल्या आहेत.

१९९१ साली अश्विनी यांची विवाहगाठ अर्जुन डोमाडे यांच्याशी बांधली गेली. पुढे एकत्र कुटुंबासोबत कल्याण येथे राहू लागल्या. घरची परिस्थिती बेताची असल्याने सासू जनाबाई या भाजीविक्री करत, तर सासरे भीमा हे माथाडी कामगार होते. पती अर्जुन हे पोलीस खात्यात पोलीस शिपाई म्हणून, नव्यानेच रुजू झाले होते. अश्विनी यांना अर्धवट राहिलेले शिक्षण शांत बसू देत नसल्याने, पुढील शिक्षणाचा विचार त्यांनी अर्जुन यांना सांगितला. अर्जुन यांनीही पुढील शिक्षणाला होकार दर्शविला. पण कौटुंबिक जबाबदारी संभाळत शिक्षण घेण्यासाठी त्यांना, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हा एकमेव पर्याय दिसला. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बिर्ला कॉलेज केंद्रात, अकरावी कला विभागात प्रवेश घेतला. घरातील सर्व कामे सांभाळून सायंकाळी त्या महाविद्यालयात जाऊ लागल्या. मेहनतीच्या जोरावर त्या प्रथम श्रेणीत ‘बीए’ उत्तीर्ण होऊन, पदवीधरही झाल्या.

शिक्षण, कौटुंबिक जबाबदारी यांबरोबरच त्यांनी, सामाजिक बांधिलकीही जपली. त्यांनी ‘गोदावरी नागरी सहकारी पतपेढी कल्याण’ येथे महिला संचालिका म्हणून काम केले आहे. तसेच ‘अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती’ या संस्थेच्या महिला शाखेच्या पदाधिकारी म्हणूनही त्या सक्रिय आहेत. महिला शाखा अध्यक्षा लता पालवे यांच्या सहकार्याने त्यांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी ’आपुलकी महिला बचत’गटाची स्थापना केली असून, सदर बचतगटाच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांनी वंजारी समाजाचे मुखपत्र ‘मनातलं गोंदण’चे इतर समाजबांधवांच्या सहकार्याने संपादन केले असून, त्यांचा ‘लोकसाहित्य’ विशेषांक हा विशेष गाजला होता. समाजातील ज्येष्ठ महिला मीराबाई घुगे आणि कलावती घुगे यांना सोबत घेऊन, पारंपरिक मौखिक गाणी व समाजाची संस्कृती सर्व महाराष्ट्रभर पसरविली.

त्यांची शिक्षिका होण्याची इच्छा कारणास्तव पूर्ण न झाल्याने, त्यांनी बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम पूर्ण करून कामगार व कष्टकरी वस्ती असलेल्या शिंदे मळा, घुगे चाळ परिसरात आपली बालवाडी सुरू केली. झेरॉक्सचे दुकान भाड्याने घेऊन, त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला. वास्तुतज्ज्ञ रविराज यांच्याकडे वास्तुशास्त्रातील शिक्षण पूर्ण करून, त्या वास्तुतज्ज्ञ म्हणूनही आज काम पाहात आहेत. हे सर्व करीत असताना अश्विनी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडेदेखील विशेष लक्ष दिले. त्यांचा मोठा मुलगा स्वप्निल हा सध्या एक सिनेमेटोग्राफर म्हणून आपले काम करीत असू, लहान मुलगा राहुल हादेखील नाट्यलेखन, अभिनय आणि स्पिरिच्युअल हिलिंग या क्षेत्रात काम करीत आहे. अश्विनी यांना फोटोग्राफी, गायन आणि पर्यटन याची विशेष आवड आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या अश्विनी डोमाडे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप खूप शुभेच्छा.