शतक : भव्य, भावनिक आणि विचारप्रवर्तक मांडणी

    22-Feb-2026   
Total Views |

इतिहास जेव्हा पडद्यावर जिवंत होतो, तेव्हा तो केवळ कथा राहत नाही; तर एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो. आशिष मल्ल दिग्दर्शित, वीर कपूर निर्मित ‘शतक : संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट अशाच एका वैचारिक आणि ऐतिहासिक प्रवासाची अनुभूती देणारा ठरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या वाटचालीतील विचार, संघर्ष आणि राष्ट्रनिर्माणाची भूमिका उलगडत हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जातो. इतिहासाच्या कोरड्या पानांना भावनिक आणि दृश्यात्मक रूप देत हा चित्रपट एका वैचारिक चळवळीचा प्रवास पडद्यावर जिवंत करतो.

वैचारिक आणि ऐतिहासिक विषय मोठ्या पडद्यावर तितक्याच भव्यदिव्यपणे मांडण्याची चढाओढ भारतीय सिनेसृष्टीत अलीकडे प्रकर्षाने पाहायला मिळते. नुकताच प्रदर्शित झालेला ‘शतक : संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट त्यापैकी एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून समोर आला आहे. चित्रपटाची शैली गंभीर आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी दिग्दर्शक आशिष मल्ल यांनी संघप्रवासाच्या १०० वर्षांची कथा मर्यादित वेळेत सादर करण्याची जबाबदारी उत्तमप्रकारे पेलली आहे. चित्रपटाचे नाव आणि पोस्टर पाहिल्यावरच स्पष्ट होते की, हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाची कथा उलगडून सांगतोय. संघटनेची स्थापना, तिची विचारधारा आणि तिचे दोन प्रभावी स्तंभ म्हणजेच आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) यांच्या जीवनसंघर्षांचे चित्रण हे या चित्रपटाचे मुख्य केंद्रबिंदू. राजकारणाच्या झगमगाटापासून दूर राहून शांतपणे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात संघ कशा पद्धतीने कार्यरत आहे, हे चित्रपटात डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्या विचारांतून  प्रकट होते.

दिग्दर्शकाने आपल्या समज आणि सूक्ष्म दृष्टिकोनातून हा चित्रपट केवळ माहितीपट न ठेवता, तो अशा पद्धतीने मांडला आहेे की, संघाच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या प्रत्येक विचारसरणीचे तो दर्शन घडवतो. दिग्दर्शकाने इतिहासाच्या कोरड्या पानांना जणू जिवंत कथेत रूपांतरित केले आहे. जिथे प्रेक्षक फक्त घटना पाहत नाहीत, तर त्या अक्षरशः अनुभवतात. एकूणच संघासंदर्भात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वाद आणि टीकांच्या पार्श्वभूमीवर ‘शतक’ हा चित्रपट निश्चितच वेगळा अनुभव देतो. मध्यांतरापूर्वीचा भाग डॉ. हेडगेवार यांचा जीवनप्रवास मांडणारा आहे. १८९७चा काळ, डॉ. हेडगेवारांच्या बालपणातले किस्से, बालवयातच त्यांचे राष्ट्राप्रती निर्माण झालेले प्रेम, स्वातंत्र्याबाबत तयार झालेली वैचारिक बुद्धिमत्ता अशा विविध प्रसंगांपासून चित्रपटाचे कथानक पुढे सरकत जाते. डॉ. हेडगेवार बालवयात किती बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि प्रखर राष्ट्रवादी बालक होते, हे त्यावरून दिसते. दिग्दर्शकाने डॉ. हेडगेवार यांचे चित्रण अत्यंत आदराने आणि तितक्याच संवेदनशीलतेने केले आहे. त्यांचे साधे जीवन, आयुष्यातील प्रारंभीचा संघर्ष आणि एका विचाराला प्रत्यक्षात उतरवण्याची त्यांची अपरिमित जिद्द मनाला स्पर्श करते. छोट्या मैदानांवरील बैठकींपासून सुरू झालेला प्रवास १०० वर्षांच्या इतिहासात कसा परिवर्तित होतो, हे मोठ्या पडद्यावर पाहणे खरोखरीच प्रेरणादायी आहे.

आई-वडिलांच्या निधनानंतर पुढे पुणे आणि कोलकाता येथे केशव बळीराम हेडगेवार यांनी घेतलेले वैद्यकीय शिक्षण आणि ‘अनुशीलन समिती’सारख्या क्रांतिकारी गटांशी त्यांचा आलेला संबंध, यांचे तपशीलवार चित्रण केले आहे. हा चित्रपट दर्शवितो की, या अनुभवांनी त्यांच्या विचारांना कशाप्रकारे आकार दिला आणि अखेरीस १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ‘शतक’ सुरुवातीपासूनच स्पष्ट करतो की, हा केवळ जुन्या घटनांची पुनरावृत्ती करणारा चित्रपट नव्हे. निर्मात्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि लाईव्ह-अ‍ॅशनच्या साहाय्याने ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि प्रसंग अत्यंत प्रभावी, तसेच वास्तववादी पद्धतीने सादर केले आहेत. चित्रपटातील अनेक दृश्ये अशी वाटतात की, आपण खरोखरंच त्या काळातच उपस्थित आहोत.

चित्रपटाचा दुसरा महत्त्वाचा भाग द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) यांच्या भोवती फिरतो. त्यांना आध्यात्मिक आणि दृढनिश्चयी नेता म्हणून दाखवले आहे, ज्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या स्वप्नाला संघटनात्मक रूप दिले आणि कार्यकर्त्यांचे विशाल जाळे उभे केले. चित्रपटाची कथा जेव्हा श्रीगुरुजींच्या काळात येते, तेव्हा वातावरण अधिक गंभीर होते. जसे की, महात्मा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख येतो; पण मारेकर्‍याचे नाव घेतले जात नाही. स्वातंत्र्यानंतर आणि महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर आलेल्या बंदीचा काळ चित्रपटात अतिरंजित न दाखवता, संतुलित पद्धतीने दाखवला आहे. त्या काळात संघटनेला पुन्हा उभे करणे सोपे नव्हते. त्यामुळे हा भाग चित्रपटाला अधिक गती आणि खोली प्रदान करतो.

चित्रपटातील कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहेच; परंतु त्यांच्या पात्रांना मिळालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्पर्शामुळे सर्वच पात्रे प्रभावी वाटतात आणि चित्रपटाच्या शैलीशी सुसंगत राहतात. अतिनाट्यपूर्ण सादरीकरण टाळणे, ही चित्रपटाची जमेची बाजू म्हणावी लागेल. आशिष मल्ल यांचे दिग्दर्शन नियंत्रित आणि स्पष्ट असल्याचे यावरून दिसते. चित्रपट आपल्या उद्दिष्टापासून कुठेही भरकटत नाही. तांत्रिकदृष्ट्या चित्रपटात ‘एआय’, ‘व्हीएफएस’चा वापर केल्याचे दिसते. हीच तांत्रिक झळाळी काही ठिकाणी कृत्रिम भासत असली, तरी ‘मशीन लॅण्डिंग’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे हा चित्रपट पाहताना अधिक प्रभावी वाटतो.
चित्रपटाचे पार्श्वसंगीत कथानकाच्या वातावरणाला पूरक ठरते आणि गंभीरता टिकवून ठेवते. संगीत प्रभावी असल्याने दीर्घकाळ लक्षात राहील, असा विशेष क्षण म्हणजे चित्रपटात दीव-दमण (सिल्वासा) पोर्तुगीज सत्तेतून मुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रसंग. सुधीर फडके व लता मंगेशकर यांच्यातील मोहिमेपूर्वीचा संवाद प्रेक्षकांना भावनिक करून टाकतो. लतादीदींची झालेली मदत, मोहिमेत स्वतः उतरून सुधीर फडकेंनी त्यात मिळवलेले यश आणि शेवटी त्यांनी लतादीदींना पाठवलेले पत्र या एकंदरीत प्रसंगाच्या वेळी, मागे...

माटी पे तेरी जन्म लिया हमने
पिछले जनम ऐसा कर्म किया हमने
आंचल का तेरे हम तो कर्ज चुकाएंगे
सोचेंगे न एक बार मर मिट जाएंगे|
जिसमें भारत नाम का मोती
उस माला को जपना
युग-युग जिए ये भारत अपना

हे गाणे सुरू असते. त्यामुळे हा संपूर्ण  प्रसंग मनाला भावनिक स्पर्श करुन जातो. सुधीर फडके यांची ओळख जरी ज्येष्ठ संगीतकार आणि गायक म्हणून असली, तरी इतिहासात संघ स्वयंसेवक म्हणून त्यांच्या भरीव योगदानाची अशी ही दखल दिग्दर्शकाने घेतली आहे.

एकंदरीत, हा चित्रपट संघाच्या स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी अनुभव ठरू शकतो. पण, केवळ स्वयंसेवकच नाही, तर संघाचा खराखुरा इतिहास समजून घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठीच हा चित्रपट निश्चितच मार्गदर्शक ठरु शकतो. चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनातही टीमने संतुलन राखले आहे. सनसनाटीपणा किंवा अतिशयोक्ती टाळून साधेपणा आणि गांभीर्याने कथा मांडली आहे. अजय देवगण यांच्या आवाजातील निवेदन फक्त सुरुवातीलाच असले, तरी ते तितकेच प्रभावी वाटते. पटकथेतील काही तांत्रिक उणिवा निश्चितच जाणवतात; पण दिग्दर्शकाची प्रामाणिक धडपड आणि त्यांनी उचललेले हे शिवधनुष्य पाहता, त्या चुका नगण्य वाटू लागतात.

चित्रपट शेवटाला जाताना तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस, श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री अशा विविध व्यक्तिमत्त्वांची झलक दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आणीबाणीच्या काळात संघ स्वयंसेवक कशा पद्धतीने वेश बदलून राष्ट्रहिताचे कार्य करत होते, याचीही प्रचिती काही ठिकाणी येईल. प्रसंगांबाबत म्हणाल, तर गोवामुक्ती आंदोलन, दीव-दमण मुक्ती मोहीम, भारत-चीनच्या सीमेवरील स्वयंसेवकांचा पराक्रम, असे अनेक प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. संघटनशक्ती तेव्हा का महत्त्वाची होती आणि ती आजही का महत्त्वाची आहे, हा संदेश वेळोवेळी दिल्याचे चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवते.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख करून देणारे अनेक चित्रपट यापूर्वीही प्रदर्शित झाले. मात्र, संघाशी परिचित असणार्‍यांनी बौद्धिकातून ज्या गोष्टी ऐकल्या, त्याच विविध गोष्टी स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ते केवळ संघाची, डॉटरांची, गुरुजींची आणि त्यांचे संघउभारणीतील योगदानाची माहिती देणारे चित्रपट होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, ‘शतक’ हा एक प्रामाणिक आणि महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे, जो आपल्या विषयाला आदरपूर्वक मांडतो. तो केवळ संघाचा इतिहासच सांगत नाही, तर तो अनुभवायला लावतो. महात्मा गांधी संघाबाबत काय विचार करायचे? माजी पंतप्रधान पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधी संघाला इतका विरोध का करायचे? संघाचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान होते का? या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे हा १ तास ५२ मिनिटांचा ‘शतक’ चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.
‘ये अल्प विराम हैं, पूर्ण विराम नहीं’, ‘संघ शक्ती युगे युगे’ हे वाय चित्रपटाच्या शेवटी दाखवले असल्याने, येत्या काळात संघाचा पुढील प्रवास पण नव्या चित्रपटाद्वारे येणार का? असा प्रश्न निश्चितच उद्भवू शकतो. आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे समारोप जेव्हा संघाच्या प्रार्थनेने होतो, तेव्हा समोर बसलेला प्रेक्षक आपसूकच आपल्या जागेवर उभा राहतो आणि प्रार्थना संपल्यावर चित्रपटगृहातून नव्या विचारांसह मार्गस्थ होतो.

दिग्दर्शक : आशिष मल्ल

निर्माते : वीर कपूर

संकल्पना : अनिल अग्रवाल

लेखक : नितीन सावंत, रोहित गहलोट, उत्सव दान

गीतकार : कुमार

संगीत : सनी इंदर, सुशांत-शंकर, अनुज गर्ग, विवेक कर  

गायक : सुखविंदर सिंह, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, मधुश्री, शान, विजय प्रकाश शर्मा

रेटिंग : ४ स्टार


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक