मुंबई : मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले. मात्र, निवडणूकीच्या निकालानंतर घडलेल्या विविध घडामोडींतून अवघ्या महिनाभरातच ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसते.
मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागांवरून उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. निवडणूकीदरम्यान, एकमेकांना पूरक भूमिका घेत एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणारे उद्धव ठाकरे सत्तावाटपाच्या क्षणी मात्र मागे हटले. मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांच्या वाटपात उबाठा गटाने सोयीस्करपणे मनसेला लांब ठेवले.
मुंबई महापालिका निवडणूक पार पडली. निकालही जाहीर झाले. मुंबई महापालिकेत भाजपच्या महापौर विराजमान झाल्या, विविध समित्यांचे अध्यक्षही नेमलेत. आता स्वीकृत नगरसेवक निवडीच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेत उबाठा गटाकडे सध्या ६५ नगरसेवक आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार, ते तीन स्वीकृत नगरसेवक देऊ शकतात. मात्र, उबाठा गटाच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवकपद मनसेला देण्यात यावे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. त्यामुळे एक स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळेल अशी चर्चा होती. परंतू, उबाठा गटाने ही मागणी डावलून आपल्याच पक्षातील तीन नावांवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय?
स्वीकृत नगरसेवक म्हणजे थेट जनतेतून न निवडले जाता, महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या सभागृहात राजकीय पक्षांच्या शिफारशीनुसार निवडले जाणारे सदस्य. सहसा शिक्षण, समाजसेवा किंवा प्रशासनातील तज्ज्ञ व्यक्तींना या पदावर नियुक्त केलं जातं, ज्यांना निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच सर्व प्रशासकीय अधिकार असतात. स्वीकृत नगरसेवकांना सर्वसाधारण सभेच्या बैठकीत चर्चा करण्याचा आणि सूचना मांडण्याचा अधिकार असतो, मात्र, त्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार नसतो.
खरेतर, ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीमुळे मुंबई महापालिका निवडणूक गाजली. परंतू, प्रत्यक्ष तिकीटवाटप किंवा प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील कुरबुरी लपून राहिलेल्या नाहीत. उबाठा गटाने जागावाटपात मनसेला दिलेला दुय्यम दर्जा असो किंवा मग उबाठाच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याचा आरोप असो, यामुळे या युतीतील हवा केव्हाच निघून गेली होती. शिवाय मुंबईकरांनी या युतीला फारसा प्रतिसादही दिला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतीच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे अजूनच चर्चांना उधाण आले.
उबाठा गट-मनसेत अंतर
स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी "कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, असे स्टेटस ठेवले. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती पाहता उबाठा गट आणि मनसेत अंतर पडले का? असा प्रश्न उपस्थित होतो. सुरुवातीला महापालिका निवडणूकीत उद्धव ठाकरेंनी मनसेला अर्ध्याही जागा सोडल्या नाहीत. आता मनसेने एक स्वीकृत नगरसेवक पद मागितल्यावर तीही मागणी नाकारली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षांमध्ये काही आलबेल नसल्याचे दिसते.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....