मूक प्रहरींची रणगाथा...

    22-Feb-2026
Total Views |

‘हिम योद्धा’ पथकाचे वैशिष्ट्य : २०२६च्या संचलनात ‘हिम योद्धा’ हे नाव विशेष चर्चेत आले. हे नाव केवळ प्राण्यांसाठीच नसून, निसर्गाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जसे की, उणे तापमानात तंत्रज्ञान आणि प्राण्यांच्या साहाय्याने लढणार्‍य तुकडीलाच दिले गेले आहे. यात प्रथमच ‘चित्ता’ हेलिकॉप्टर्स आणि हे प्राण्यांचे पथक यांच्यातील समन्वय दर्शवण्यात आला.
 
स्वदेशी जातींचा जागतिक सन्मान
 
मुधोळ हाऊंड्स : सीमा गस्त आणि बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये यांचा वापर होतो. त्यांना स्फोटकांचा शोध, मागोवा घेणे आणि हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. हे कुत्रे भारताच्या विविध हवामानाशी जुळवून घेत असल्याने, त्यामुळे परदेशी जातींवरील अवलंबित्व कमी होते. यांची ‘व्हिज्युअल फील्ड’ दृष्टी क्षमता २७० अंशांपर्यंत असते, ज्यामुळे ते रात्रीच्या अंधारातही हालचाल टिपू शकतात. कर्नाटकच्या या शिकारी कुत्र्यांनी जर्मन शेफर्ड आणि लॅब्राडोरसारख्या परदेशी जातींना मागे टाकले आहे. मुधोळ प्रमाणेच, लष्कर आता उत्तर प्रदेशातील रामपूर हाऊंड्स या स्वदेशी जातीलादेखील, प्रशिक्षणात सामील करून घेण्याचा विचार करत आहे. कर्नाटक राज्यातील हे कुत्रे वेग, सहनशक्ती आणि शोध घेण्याच्या क्षमतेत उत्कृष्ट आहेत.
 
‘प्रोजेक्ट झोया’ - ड्रोन शिकारी : लष्कराने शिकारी पक्ष्यांच्या प्रशिक्षणासाठी एक विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये गरुडांच्या डोक्यावर ‘हेड-माऊंटेड कॅमेरे’ बसवले जातात. हे पक्षी सीमेपलीकडून येणार्‍या छोट्या ड्रोन्सना हवेतच अडवतात. या पक्ष्यांना अशाप्रकारे प्रशिक्षित केले जाते की, ड्रोनच्या पंख्यांमुळे त्यांच्या नख्यांना दुखापत होऊ नये. प्रशिक्षित गरुड आणि घारींचा वापर शांतपणे पाळत ठेवण्यासाठी आणि ड्रोनविरोधी कारवायांसाठी केला जातो. हे पक्षी लहान ‘यूएव्ही’च्या पंख्यांना (प्रोपेलर) लक्ष्य करतात. प्रशिक्षित हे पक्षी तांत्रिक उपकरणांना पूरक ठरतात आणि सीमावर्ती भागात स्वस्त दरात हवाई गुप्त माहितीही देतात.
 
बॅट्रियन उंटांचे ‘डबल ड्युटी’ महत्त्व
 
पूर्व लडाखमध्ये ‘बॅट्रियन’ उंटांची गस्त : गलवान खोरे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) जिथे वाळू आणि दगडयुक्त कठीण रस्ते आहेत, तिथे दोन वशिंड असलेले उंट तैनात केलेले आहेत. हे उंट एकावेळी २५० किलो वजन घेऊन डोंगर चढू शकतात. शत्रूला चाहूल लागू नये म्हणून, हे उंट शांतपणे हालचाल करतात. लडाखमधील नुब्रा व्हॅलीमध्ये आढळणारे हे उंट केवळ वजन उचलण्यासाठीच नाहीत, तर त्यांच्या अंगावर असलेल्या दाट लोकरीचा फायदा सैनिकांना होतो. कडाक्याच्या थंडीत हे उंट ‘थर्मल शील्ड’ म्हणूनही काम करतात. तसेच ते सलग तीन-चार दिवस पाण्याशिवायही राहू शकतात, जे दुर्गम भागात अत्यंत महत्त्वाचे ठरते. उंची आणि अंतराच्या बाबतीत ते खेचरांपेक्षाही वरचढ ठरतात. दुर्गम चौयांवर तैनात असलेल्या सैनिकांना पाणी पोहोचवण्यासाठी, या प्राण्यांचा वापर होतो. हे प्राणी इतके निष्णात असतात की, अनेकदा ते कोणत्याही मानवी मार्गदर्शकाशिवाय (हॅण्डलर) प्रशिक्षित मार्गावरून तळापर्यंत परत येऊ शकतात.
 
सियाचीनमधील जीवनवाहिनी, झांस्करी पोनी आणि खेचरे : ही खेचरे सियाचीन ग्लेशियरवर १८ हजार ते २० हजार फूट उंचीवर रसद पोहोचवतात. जिथे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे उडू शकत नाही, अशा ठिकाणी हे प्राणी बर्फाळ दर्‍यांतून सैनिकांना अन्न, दारुगोळा आणि औषधे सुलभरित्या पोहोचवतात.
 
‘रिमाऊंट अ‍ॅण्ड व्हेटर्नरी कॉर्प्स’ आढावा
 
मेरठ येथील त्यांचे केंद्र, आशियातील सर्वात मोठ्या लष्करी प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. येथे केवळ कुत्र्यांनाच नाही, तर त्यांच्या हॅण्डलर्सना (सैनिक) प्राण्यांची मानसिकता समजून घेण्याचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते. ‘आरव्हीसी’ विभाग अशा अतिउंच, वाळवंटी आणि दुर्गम भागांसाठी प्राणी पैदास, संगोपन आणि प्रशिक्षण देतो. हा स्वावलंबी दृष्टिकोन स्वदेशी जातींना प्राधान्य देऊन ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळकटी देतो. या प्राण्यांना एखाद्या कमांडोप्रमाणे तयार केले जाते.
 
हवामान जुळवणी : लडाखमध्ये नेण्यापूर्वी, या प्राण्यांना टप्प्याटप्प्याने उंचीवर नेले जाते. त्यांना कमी ऑक्सीजनमध्ये जगण्याची सवय लावली जाते. या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात. प्रशिक्षणादरम्यान, या प्राण्यांच्या बाजूला गोळीबार आणि बॉम्बस्फोटांचे आवाज काढले जातात. यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी किंवा चकमकीच्या वेळी हे प्राणी घाबरून पळून जात नाहीत किंवा गोंधळतही नाहीत.
 
गरुडांना ‘व्हिज्युअल रेकग्निशन’चेही प्रशिक्षण दिले जाते. त्यांना आकाशातील पक्षी आणि शत्रूचा ड्रोन यातील फरक ओळखण्यास शिकवले जाते. जेव्हा एखादा ड्रोन दिसतो, तेव्हा गरुड त्याच्या मागच्या बाजूने हल्ला करून त्याचे ‘प्रोपेलर’ (पंखा) निकामी करतो.
 
मुधोळ हाऊंड्सचे ‘आयईडी’ शोध प्रशिक्षण : या कुत्र्यांना लपवलेले स्फोटक (आयईडी) शोधण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. ते ताशी ५० किमी वेगाने धावू शकतात आणि सूक्ष्म वास घेऊन, जमिनीत गाडलेले सुरुंगही शोधून काढतात.

आहार आणि आरोग्य व्यवस्थापन: अतिउंच भागात या प्राण्यांची काळजी घेणे, हे एक मोठे आव्हानच असते. त्यांना विशेष हाय-कॅलरी आहार दिला जातो, जेणेकरून त्यांची ऊर्जा टिकून राहील.लष्करी पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या फुफ्फुसांच्या आणि पायांच्या आरोग्याची नियमित तपासणी करतात. कारण, ‘हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडिमा’ हा आजार प्राण्यांनाही होऊ शकतो.
 
झांस्करी पोनी आणि खेचरे : अनेक झांस्करी पोनी आणि कुत्र्यांना, त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी लष्करी पदकांनी (कमेंडेशन कार्ड) सन्मानित करण्यात आले आहे. काही गाजलेल्या वीर प्राण्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे :
 
खेचर क्रमांक ६२४ : या खेचराने १९९९च्या कारगिल युद्धादरम्यान अत्यंत दुर्गम भागात, शत्रूचा गोळीबार सुरू असतानाही रसद पोहोचवण्याचे काम केले होते. या खेचराला त्याच्या अतुलनीय सेवेसाठी लष्करी सन्मान देण्यात आला होता.
  
खेचर ‘होप’ : २०१६ मध्ये एका विशेष ऑपरेशनदरम्यान बर्फाळ दरीत अडकलेल्या सैनिकांचे अन्न आणि दारुगोळा पोहोचवण्यासाठी, या खेचराने स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगिरी केली होती. या कार्याची दखल लष्करी प्रमुखांनीही घेतली होती.
 
लष्करी कुत्रे : कुत्र्यांच्या कामगिरीची नोंद लष्कराने अत्यंत अभिमानाने ठेवली आहे. त्याची काही प्रसिद्ध उदाहरणे पुढीलप्रमाणे :
 
अ‍ॅसल : २०२२ मध्ये काश्मीरमधील ऑपरेशनदरम्यान ‘अ‍ॅसल’ने एका दहशतवाद्याचा शोध लावला होता. दुर्दैवाने या मोहिमेत त्याला वीरमरण आले. त्याला मरणोत्तर ‘मेंशन-इन-डिस्पॅचेस’ या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
झूम : ऑक्टोबर २०२२ मध्ये दक्षिण काश्मीरमधील एका मोहिमेत ‘झूम’ने दोन गोळ्या लागलेल्या असतानाही, दहशतवाद्यांवर हल्ला चढवला आणि त्यांना जखमी केले. त्याच्या या धैर्यासाठी त्याला आर्मी कमांडरचे ‘कमेंडेशन कार्ड’ देऊन गौरवण्यात आले.
 
विडा : या श्वानाने उत्तर कमांडमध्ये अनेक स्फोटके आणि भू-सुरुंग शोधून काढले होते. २०२०च्या स्वातंत्र्यदिनी ‘विडा’ला लष्करप्रमुखांच्या ‘कमेंडेशन कार्ड’ने सन्मानित करण्यात आले होते.
 
डच : एका बॉम्बशोधक पथकाचा भाग असलेल्या ‘डच’ला, अनेक ‘आयईडी’ शोधल्याबद्दल दोनवेळा सन्मानित करण्यात आले होते.
 
लष्करीसेवा पूर्ण केल्यानंतर या प्राण्यांना सन्मानाने ‘रिटायर’ केले जाते आणि त्यांच्या देखभालीची सोयही केली जाते. भारतीय लष्कराने आपल्या या ‘मुया’ जवानांचा आदर राखण्यासाठी, मेरठमध्ये एक प्राण्यांचे युद्ध स्मारक उभारले आहे. अशाप्रकारचे हे देशातील पहिले स्मारक आहे, जिथे या वीर प्राण्यांची नावे कोरलेली आहेत.
 
 
- नि. ब्रि हेमंत महाजन