‘लव्ह जिहाद’ला सुरुंग लावणारा गुजरातचा कायदेबदल

    22-Feb-2026   
Total Views |

‘सलीम-सुरेश’वाला खेळ आता चालणार नाही, असे म्हणत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी विवाह नोंदणी कायद्यात बदल, संशोधन केले आहे. त्यानुसार, विवाह नोंदणी करताना नियोजित वधुवरांनी घोषित करायचे आहे की, त्यांच्या होणार्‍या विवाहाची माहिती त्यांच्या पालकांना आहे अथवा नाही. तसेच वधुवरांना त्यांच्या पालकांची पूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. असे अनेक स्वागतार्ह बदल या कायद्यात आहेत. या संशोधित कायद्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या खेळाला सुरुंग लागणार आहे. यासंदर्भातला आढावा घेणारा हा लेख...

बुरखा नाही, मात्र मुस्लीम महिला ज्याप्रमाणे डोके झाकतात, तशी वेशभूषा केलेल्या पुणे ग्रामीणमधील भिगवणच्या त्या मुलीचा व्हिडिओ समोर आला. ती म्हणते, "माझे आणि याचे (तिच्या सोबत असलेल्या मुस्लीम पुरुषाचे) नऊ वर्षांपासून प्रेम होते. मी स्वेच्छेने त्याच्याबरोबर आले. माझ्यावर याने कसलीच जबरदस्ती केली नाही.” दुसरीकडे या मुलीच्या आईचा आकांत सुरू आहे. ती रडते, तडफडते, अपार वेदनेने म्हणते, "माझी मुलगी मला परत करा, तिच्यावर १२ वर्षांपासून अत्याचार होतोय, त्या दबावामुळे ती असे म्हणत आहे. आज माझी गेली, उद्या तुमची जाईल.”

भिगवणच्या घटनेत त्या मातेचे आक्रंदन हदय पिळवटून टाकते. मुलगी आईला अव्हेरते, सरळसरळ त्या पुरुषाचे समर्थन करत म्हणते की, तिची आई खोटे बोलते, तिचे अपहरण झालेच नाही. तरीदेखील आईचा जीव मुलीसाठी तुट तुट तुटतो. तिने परत यावे, त्या पुरुषासोबत अजिबात जाऊ नये, असे तिला मनापासून वाटते. गायीसमोर तिचे वासरू कसायाने न्यावे आणि गायीने हंबरडा फोडावा, तशी अवस्था याच नव्हे; तर अशा घटनांमध्ये प्रत्येक आईबाबांची असते.

या घटनेवरून मुंबईची एक सत्यघटना आठवते. साधारण दोन वर्षांपूर्वी मुंबईतली एक महिला भेटली. ती विधवा होती. एक मुलगी पदरात होती. आई आणि मुलगी दोघीच. सात वर्षांपूर्वी तिची मुलगी ११ वर्षांची होती. या महिलेला जाणवले की, बाजूच्या वस्तीतला एक मुस्लीम पुरुष सारखा त्यांच्या घराभोवती रेंगाळू लागला. आईने त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. पोलिसात तक्रारही केली. पोलिसांनी त्याचा चांगला समाचार घेतला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने त्या मुलीला गाठले आणि म्हणाला, "तुझ्यासाठी मी मार खाल्ला. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.” त्यानंतर काही दिवसांनी तो पुरुष तिच्या घरात घुसला, त्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतले. त्याचे व्हिडिओही काढले. मुलीने आरडाओरडा केला, तर लोकांनी त्याला मारले. मग हा पुन्हा तिला सांगू लागला, "तुझ्यासाठी मी मार खाल्ला. माझ्यासोबत इतक्या मुली असताना मला तूच पाहिजेस वगैरे वगैरे.” त्याने त्या मुलीच्या मनात भरवले की, तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. ‘मैं तुम्हारे लिए जान दे भी सकता हू, ले भी सकता हू’ असे डायलॉग सिनेमात त्या मुलीने पाहिले होते.

मग काय त्या बालिकेला आपण हिरोईन आहोत, असे वाटू लागले. बापाविना असलेल्या त्या गरीब लहान मुलीचा त्याच्यावर विश्वास बसला. एकेदिवशी संधी साधून त्याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. हे जे घडले, ते वाईट होते, हे त्या मुलीला वाटलेच. तिने त्याच्याशी संपर्क तोडला; पण त्याने त्या मुलीला सांगितले, "आपल्यात जे झाले, ते माझ्या मोबाईलमध्ये आहे. तू मला सोडू शकत नाहीस.” हे असेच अनेक वर्षे झाले. त्या मुलीला सुटका हवी होती; पण सुटका नव्हती. आई दिवसभर मोलमजुरी करायची, रात्री थकून घरी यायची. ‘मुलगी शिकून पांग फेडेल आपले कष्ट दूर होतील’ असे ती म्हणायची. तिचे म्हणणे ऐकून  मुलीची तिला काही सांगायची हिंमतच व्हायची नाही.

अखेरीस तो दिवस उजाडला. तिचा १८वा वाढदिवस होता. तो घरी आला. मुलीला म्हणाला, "चल नाहीतर तुझे व्हिडिओ जगजाहीर करेन.” तिच्या आईने त्या पुरुषाला अडवले, तर त्याने कुत्सित हसत त्याचा मोबाईल त्या आईच्या हाती दिला. त्या मोबाईलवर तिच्या मुलीचा त्याच्या सोबतच्या लैंगिक संबंधाचा व्हिडिओ सुरू होता. महिलेवर आकाश कोसळले. तिला काही समजायच्या आतच मुलीचा हात धरून तो तिला घेऊनही गेला. जरा वेळाने सावरल्यावर ती त्याच्या घरी गेली, तर मुलीचे म्हणणे "तू कशाला आलीस? इथून बाहेर येऊन माझे हाल आणखी खराब होतील. आता हेच माझे नशीब.” आईने पोलिसात तक्रार केली, तर पोलिसांचे म्हणणे, "मुलगी सज्ञान आहे. तिची काहीही तक्रार नाही. तू का रडारड करतेस. उगीच हिंदू-मुस्लीम वाद उकरू नकोस.” मग ती आई पोलिसांकडे गेलीच नाही. मात्र, त्या मुलीला भेटण्याचे प्रयत्न करत राहिली; पण मुलीचे नखही तिला दिसले नाही. एक-दोन वर्षे गेल्यानंतरही त्या आईचे म्हणणे होते की, "ती जे जगते आहे, ते दबावामुळे, त्याला घाबरून. तिचे व्हिडिओ त्याच्याकडे आहेत म्हणून.” तर भिगवणच्या घटनेतील आईला पाहूनही या महिलेची आठवण आली.

या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये सध्या विवाहासंदर्भात कायद्यात जे प्रस्तावित संशोधन आहे, त्याचे महत्त्व मोठे आहे. त्यानुसार, कायदेशीर विवाह करणार्‍यांना दोघांनाही त्यांचे सर्व ‘केवायसी’ असलेली कागदपत्रे तर द्यायची आहेतच. शिवाय, त्यांनी घोषणापत्र द्यायचे आहे की, या दोघांनी त्यांच्या पालकांना या विवाहाबद्दल माहिती दिली आहे की नाही. त्याचबरोबर  नियोजित वधुवरांनी त्यांच्या पालकांची संपूर्ण माहिती द्यायची आहे. मग दहा दिवसांत प्रशासन चौकशी-तपास करून त्यांच्या पालकांना सूचना देणार की, त्यांचे पाल्यं विवाह करणार आहेत. पुढे हे सगळे सोपस्कार झाल्यानंतर ३० दिवसांनी या वधुवरांना लग्नाचे प्रमाणपत्र मिळणार. तसेच लग्नाच्या वेळेस साक्षीदार म्हणून असलेल्या प्रत्येकाची संपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे. या कायद्याबाबत गुजरात सरकार सध्या सूचना मागवत आहे.
अर्थात, यावर नेहमीच्या त्याच लोकांनी विलाप सुरू केला आहे की, जर नियोजित वधुवर सज्ञान असतील, तर त्यांना विवाह करण्यासाठी कोणाच्या संमतीची मुळी गरजच काय? त्यांना वाटले, केले त्यांनी लग्न. पण, ‘जब मिया बीबी राजी, तो क्या करेगा काजी’ ही म्हण मुस्लिमांमध्येच शोभते. तिकडे विवाह हा ‘करार’ आहे आणि अर्थातच ‘लव्ह जिहाद’मध्ये तर तिला कसे राजी केले जाते, हे सगळ्यांना माहिती आहे.

दुसरीकडे भारतीय संस्कृतीमधल्या १६ संस्कारांमध्ये विवाह म्हणजे केवळ एका पुरुषाचा एका स्त्रीशी सर्वतोपरी संबंध नाही, तर दोन कुळांचा, दोन कुटुंबांचा आत्मीय संबंध आहे. ज्या देशात ८० टक्के हिंदू आहेत, त्या देशात हिंदू संस्कृतीनुसार मुला-मुलींच्या विवाहाबद्दल आईबाबांना माहिती असणे आणि आपल्या पाल्याने कुणाशी विवाह केल्यावर आपल्या कुळाचे आणि प्रत्यक्ष पाल्याला सुख-समाधान मिळेल, हे आईबाबांनी समजून घेणे, धार्मिक आणि सांस्कृतिकरीत्या योग्यच आहे. याला ऐतिहासिक आधार आहे.

दुसरे असे की, ‘लव्ह जिहाद’च्या अनुषंगाने मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत वाट बघितली जाते आणि मग लगेच कायदेशीर विवाह केला जातो. त्याआधी अर्थातच, मुलीचे धर्मांतरण केले जाते. यातील बहुसंख्य घटनांमध्ये पालकांना माहितीही नसते की, १८वा वाढदिवस झाला की, मुलगी गुपचूप कोर्टात विवाह करणार आहे. इथे मुलगी आईबापाकडून शिक्षण घेणे, सर्व सवलती घेत राहते, तिचे पैसे-दागिने आणि इतर सुविधा त्या पुरुषाला देत राहते. दागिने काय झाले? पैसे काय झाले? असे पालकांनी विचारल्यावर म्हणते, "हरवले, विसरले, मैत्रिणीला दिले, खर्च झाले.” ती आईबाबांकडे राहत असल्याने त्याला तिची कोणतीच जबाबदारी घेण्याचे कारण नसते. मात्र, तो ‘शोहर’ म्हणून तिचे लैंगिक शोषण करत राहतो. कोणताही खर्च न करता त्याच्या सगळ्या गरजा त्या मुलीकडून तो पुरेपूर भागवत असतो. अनेक घटनांमध्ये असेही आढळलेे आहे की, तो पुरुष या मुलीला ‘ब्लॅकमेल’ करतो किंवा नशेचे व्यसन लावतो आणि तिला वेश्याव्यवसाय किंवा ड्रग्जविक्रीच्या धंद्यात लोटतो. तिच्या पैशावर ऐष करतो. याअनुषंगाने गुजरातमधील या कायद्यातील बदलाने आईबाबांना वेळीच कळणार आहे की, आपला मुलगा-मुलगी नक्की काय करणार आहेत? विवाहाच्या नावाने त्यांचे भले होणार की, आणखी काय होणार. पालकांना त्यांच्या पाल्याच्या नियोजित जोडीदाराची माहिती काढण्याची संधी मिळणार आहे. यामुळे पाल्याचा जोडीदार संशयास्पद पार्श्वभूमीचा किंवा पाल्यासाठी धोकादायक असेल, तर पालकांना मुलीला समजावण्यासाठी वेळ मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ‘लव्ह जिहाद’ आणि त्यातून धर्मांतरण करणार्‍या घटनेत एक गोष्ट प्रामुख्याने आढळते की, मुलीच्या अशा विवाहाच्या वेळेस साक्षीदार असणारे लोक हे अनेकदा तेच-तेच असतात. मुलींचे ऐनकेन प्रकारे धर्मांतरण करण्याचा त्यांचा धंदाच असतो. गुजरातमधील प्रस्तावित संशोधनाने या असल्या धंदेवाईक नराधमांचे बुरखे फाटणार आहेत.

असो. या असल्या प्रकरणात नेमकी मुलगी गैरमुस्लीम, शिक्षित आणि जिला चांगले भविष्य असू शकते, तीच असते, तर तो पुरुष अल्पशिक्षित, धर्मांध आणि लफंगाच असतो. (अपवाद असतील; पण मी पाहिलेले नाहीत!) त्या मुलीला शारीरिक संबंधांचे व्यसन लावणे आणि त्यात तिला पद्धतशीरपणे अडकवणे, हे एकच काम ती व्यक्ती इमानेइतबारे करत असते. त्याला न कसले वर्तमान, ना भविष्य. अशा व्यक्तीबरोबर कोणते आईबाप आपल्या मुलीचा विवाह करतील? पण, मुली पालकांच्या विरोधात का जातात? घाबरून की केवळ वासनेच्या आहारी जाऊन? की, त्यांना असे वाटते की, या पुरुषापेक्षा आपल्याला कुणीही जास्त जीव लावणार नाही म्हणून?

खरेतर या तिन्ही घटकांचा संमिश्र परिणाम त्या मुलीच्या मनावर करण्यात आलेला असतो. एक म्हण आहे, ‘बैल गेला आणि झोपा केला.’ त्यानुसार, या अशा घटनांमध्ये मुलगी-मुलगा स्वतःच्या मर्जीने स्वतःच खड्ड्यात पडत असताना आईबाप रडून त्यांना समजावू शकतात. पण, कायद्याने ते सज्ञान असल्यामुळे ते पाल्यांना थांबवू शकत नाहीत. वेळ निघून गेलेली असते. त्या नराधमाने साम, दाम, दंड, भेद वापरत मुलाला/मुलीला पटवून दिलेले असते की, ‘जगातला तुझा एकमेव तारणहार मीच आहे.’ मात्र, एकदा का मुलगा/मुलगी त्याच्या पूर्णतः  ताब्यात गेली की, त्यांचे परतीचे मार्ग संपलेले असतात. ते स्वतःच त्यांच्या पालकांच्या विरोधात जातात, त्यांच्याकडे पर्यायच नसतो. त्यामुळे पालक कायद्याने आणि सामाजिक रेट्याने त्यांच्यांपासून दूर जातात.

मग या मुला/मुलींसोबत काहीही बरे वाईट झाले, तरी त्यांची खबरबात घेणारे कोणीही नसते. अशाप्रकारे आईबाबांच्या संमतीविना मर्जीचे संबंध ठेवणार्‍यांचे विशेषतः मुलींचे पुढे काय होते, हा एक सर्वेक्षणाचा विषय. पण, गुजरातच्या नव्या बदलत्या कायद्यानुसार, त्या नियोजित वधुवरांच्या कायदेशीर पालकांची आणि त्यांच्या विवाहाचे साक्षीदार असलेल्यांची कायदेशीर कुंडली पोलिसांकडे असेल. त्यामुळे या नियोजित वधू किंवा वरासोबत भविष्यात काहीही कमी-जास्त झाले, तर त्याबदल्यात शोधकारवाई करणे सोपे जाईल. आपली ओळख पोलिसांकडे आणि मुलीच्या पालकांकडे आहे, याची जाणीव असल्याने मुलीसोबत कोणतेही गैरकृत्य करण्याला किमान काहीसा आळा बसणार आहे. गुजरातच्या कायद्यातील बदलामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. महाराष्ट्रातही ‘मेरा अब्दुल सब्दुल वैसा नही हैं’ म्हणत आईबाबांच्या विरोधात जाऊन पळून जाणार्‍यांची संख्या कमी नाही. त्यांचे पुढे काय होते, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे महाराष्ट्रातही अशाप्रकारे कायदा व्हावा, हीच सकल हिंदूंची इच्छा!


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.