मणिपूरचे महाभारत

    22-Feb-2026
Total Views |

चुराचांदपूरमधून सुरू झालेल्या हिंसाचाराला  २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव घडवून आणायची नामी संधी म्हणून बघितले गेले. चर्चने जाणीवपूर्वक या हिंसाचाराला धार्मिक स्वरूप दिले. डाव्या प्रसारमाध्यमांनी हीच प्रचाराची मोहीम आक्रमकपणे देशात राबविली. तत्कालीन मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना ‘खलनायक’ ठरवून, त्यांची राक्षसी प्रतिमा चर्च आणी कुकी अतिरेकी गटांनी तयार केली. शेवटी बिरेन सिंग यांना राजीनामा द्यावा लागला. या घटनाक्रमाची थोडक्यात; परंतु मुद्देसूद माहिती ’चुराचांदपूर पर्व-मणिपूरचे महाभारत’ या पुस्तकात देण्यात आली आहे.

हे पुस्तक मणिपूर हिंसाचाराला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या सुमारास प्रसिद्ध होत आहे. त्यातही योगायोग म्हणजे हा लेख लिहीत असतानाच, मणिपूरमध्ये पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. हिंसाचाराच्या कालखंडानंतर भाजपचे सरकार सत्तेवर येण्याने, देशविरोधी शक्तींचा डाव धुळीस मिळाला आहे. असे असले, तरी मणिपूरमधील हिंसाचार ही अभूतपूर्व घटनाच म्हणायला हवी. कारण, केवळ तीन-चार दिवसांतच ६० हजारांच्या वर नागरिक निर्वासित होणे आणि २५० निरपराध नागरिकांचा बळी जाणे, हे पूर्वी कधीच घडले नव्हते.

खरे म्हणजे दि. ३ मे २०२३ या दिवसाकडे ‘डायरेट अ‍ॅक्शन डे अगेंस्ट मैतेई हिंदू बाय कुकी टेररिस्ट’ असेच पाहायला हवे. कारण, याच दिवशी कुकी अतिरेक्यांनी ‘ट्रायबल सॉलिडॅरिटी मार्च’ला मैतेईच्या विरोधात हिंसाचार सुरू केला. ’कुकी नॅशनल आर्मी’ ‘केएनए’ आणि ’झोमी रिव्हॉलुशनरी आर्मी’ ‘झेडआरए’ने चुराचांदपूरच्या तुईबोंग येथून हिंसाचाराला प्रारंभ केला. त्यानंतर हजारो मैतेई नागरिक मुलाबाळांसह नेसत्या वस्त्रानीशी इम्फाळच्या दिशेने पळत सुटले. ‘आसाम रायफल’च्या वाहनामधून त्यांना इम्फाळ खोर्‍यातील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

कुकी अतिरेक्यांनी ‘कुकी लॅण्ड’च्या मागणीसाठी हिंसाचार सुरू केल्याचे वरवर दिसत असले; तरी त्यामागे अनेक देशविरोधी शक्ती होत्या. मैतेई विरुद्धच्या हिंसाचाराची प्रतिक्रिया इम्फाळ खोर्‍यात उमटली. ‘अरामबाई तेंगगोल’ या मैतेई संघटनेने परिसरातील कुकी वस्त्यांवर हल्ले चढवले, चर्चची तोडफोड केली. याचाच फायदा चर्चने उठवत कुकी-मैतेई वांशिक हिंसाचाराला, आदिवासी ख्रिश्चन विरुद्ध मैतेई हिंदूंनी केलेला हिंसाचाराचे स्वरूप दिले. जगभरातील ‘चर्च लॉबी’ आणि देशातील विरोधी पक्ष भाजपची कोंडी करण्यासाठी एकवटले. हा हिंसाचार दक्षिण मणिपूरमधील सर्व जिल्ह्यांत पसरल्याने, हा दहशतवादी हल्ला नसून भारतविरोधी ‘प्रॉक्सी वॉर’ असल्याची जाणीव केंद्र सरकारला झाली. चर्च, अमेरिका, ड्रगमाफिया यांनी कुकी अतिरेयांचा उपयोग करून, भारताविरुद्ध छेडलेले अघोषित युद्ध आहे हे लक्षात येताच, हे युद्ध संयमानेच हाताळण्याची रणनीती आखण्यात आली. परंतु, त्याची किंमत केंद्र सरकारला चुकवावीच लागली. केंद्र सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरले असते, देश अस्थिर झाला असता. यातला दुःखद भाग असा की, ड्रग्जविरोधी मोहीम चालवणारे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा कुकी अतिरेयांनी राजकीय बळी घेतला. तसेच ‘जिओ पॉलिटिक्स’च्या रणनीतीत अमेरिकेचा पराभव करून केंद्र सरकारने बाजीही मारली.

केवळ ६८ पाने असलेल्या या छोटेखानी पुस्तकात, गेल्या दोन वर्षांतील घटनांचा मुद्देसूद आढावा घेण्यात आला आहे. शेख हसीना यांच्या गौप्यस्फोटाचे मणिपूर कनेक्शन, मणिपूर साम्राज्यवादी देशांची युद्धभूमी, नार्को टेररिझम, झालेंगम ख्रिस्त देश तयार करण्याचे कारस्थान, हिंसाचारात चर्चचा छुपा हात, ‘होली वॉर’चे राजकीय परिणाम, चर्चच्या भाजपविरोधामागच्या कारणांचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. सात नकाशांचा पुस्तकात समावेश असल्याने विषय समजून घेणे सोपे जाते. मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आली असली, तरी परिस्थिती सामान्य होईल असे नाही. उलट, राजकीय सुडापोटी पुन्हा हिंसाचार कुकी दहशतवादी घडवून आणतील, अशी शक्यता वाटते. एकूणच, मणिपूरची सध्याची भीषण परिस्थिती समजून घेण्यासाठी हे एक उपयुक्त पुस्तक आहे.

- पुरुषोत्तम रानडे