Jammu and Kashmir Kishtwar encounter : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार; सुरक्षादलांनी दहशतवाद्यांचा अड्डा उडवला

    22-Feb-2026   
Total Views |
Jammu and Kashmir Kishtwar encounter
 
किश्तवाड (जम्मू-काश्मीर) : ( Jammu and Kashmir Kishtwar encounter ) जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चतरू परिसरात रविवारी सकाळपासून सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात तीव्र चकमक झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी या कारवाईत ठार करण्यात आले आहेत. दहशतवादी ज्या ठिकाणी लपून बसले होते ते ठिकाण सुरक्षादलांनी स्फोट घडवून पूर्णपणे उद्ध्वस्त केले. परिसरात शोधमोहीम अद्याप सुरू असून अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
 
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चतरू भागात जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि Central Reserve Police Force (सीआरपीएफ) यांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. सुरक्षादलांनी परिसराची घेराबंदी केल्यानंतर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत तिन्ही दहशतवादी ठार झाले.
 
अड्डा स्फोटात उडवला
दहशतवादी ज्या ठिकाणी लपले होते त्या ठिकाणाचा अचूक मागोवा घेत सुरक्षादलांनी अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर (यूबीजीएल) चा वापर करून त्या ठिकाणाचा काही भाग स्फोटाने उडवून दिला. मोठे स्फोट ऐकू आल्याने परिसर दणाणून गेला. त्यानंतर संपूर्ण ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
ऑपरेशनमध्ये सहभागी K9 डॉग जखमी
या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याच्या २ पॅरा (एसएफ) युनिटचा K9 डॉग ‘टायसन’ यालाही गोळी लागली. दहशतवादी लपलेल्या धोकपर्यंत सर्वप्रथम पोहोचणाऱ्यांमध्ये टायसनचा समावेश होता. गोळी लागल्यानंतरही त्याने आपले कार्य सुरू ठेवले. त्याला तातडीने बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
 
‘ऑपरेशन किया’ अंतर्गत संयुक्त कारवाई
४ फेब्रुवारी रोजी भारतीय सैन्याच्या भारतीय सैन्याच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने (White Knight Corps) यांनी सामाजिक माध्यमांवर माहिती देताना सांगितले होते की, सीआयएफ डेल्टा, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. या कारवाईला ‘ऑपरेशन किया’ असे नाव देण्यात आले आहे. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता चकमक सुरू झाली होती. सुमारे एका तासाच्या गोळीबारात एक दहशतवादी जखमी झाला; मात्र तो आपल्या साथीदारासह गुहेत लपला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी अंधाराचा फायदा घेत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुन्हा गोळीबार झाला आणि जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. अतिरिक्त सुरक्षाबलांना पाचारण करून घेराबंदी अधिक कडक करण्यात आली.
 
४ फेब्रुवारीलाही कारवाई
यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजीही चतरू परिसरात सुरक्षादलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसेच उधमपूर जिल्ह्यातील गुहेत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना ग्रेनेड स्फोटाद्वारे ठार करण्यात आले होते.
 
‘ऑपरेशन त्राशी-१’ सुरूच
दरम्यान, किश्तवाड आणि उधमपूर जिल्ह्यांत ‘ऑपरेशन त्राशी-१’ ही व्यापक मोहीम सुरू आहे. १८ जानेवारीपासून चतरू बेल्टमधील मंडराल-सिंहपोरा जवळील सोनार गावाच्या जंगलात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत चार वेळा चकमकी घडल्या आहेत. १८ जानेवारी रोजी झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात आठ जवान जखमी झाले होते. त्यापैकी हवालदार गजेंद्र सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर २२, २४ आणि ३१ जानेवारी रोजी विविध भागांत पुन्हा गोळीबाराच्या घटना घडल्या.
 
मागील मोठी कारवाई
२३ जानेवारी रोजी कठुआ येथे सुरक्षादलांनी जैश-ए-मोहम्मदचा कमांडर उस्मान याला ठार केले होते. घटनास्थळावरून एम-४ रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. तसेच १६ डिसेंबर २०२५ रोजी उधमपूर जिल्ह्यातील मजालता परिसरात झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान शहीद झाला, तर विशेष कार्यदलाचे दोन जवान जखमी झाले होते.
 
सुरक्षादलांनी सीमावर्ती भागात सतर्कता वाढवली असून दहशतवादविरोधी मोहिमा अधिक तीव्र केल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.