महाराज सातत्याने आपल्याला विविध रूपांत भेटतात. कोणी त्यांच्यावर कविता रचतो, कोणी मूर्ती साकारतो, कोणी व्याख्यानांतून त्यांची विचारधारा उलगडतो, तर कोणी नाट्यरूपाने त्यांच्या जीवनाचा पट आपल्या समोर जिवंत करतो. प्रत्येकाचा भाव वेगळा, अभिव्यक्ती वेगळी; पण केंद्रस्थानी एकच तेजस्वी व्यक्तिमत्त्व ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही बालरंगभूमीवर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक भव्य बालमहानाट्य सादर करून, आमचेही भाव व्यक्त केले. महाराजांचं जगणं, त्यांचं बोलणं, चालणं, त्यांचं कर्तृत्व, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे विचार यांचा अभ्यास करत अनेक बालकलाकारांनी भूमिकेत स्वतःला झोकून दिलं. त्या नाटकाचा त्यांच्यावर झालेला परिणाम हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. मात्र, दि. ८ फेब्रुवारी रोजी पुण्यात ७५ लहान मुलांच्या सहभागातून झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगानंतर, प्रेक्षकांवरच्या परिणामाचा आढावा घेणे आवश्यक आहे.
या प्रयोगानंतर आम्हाला असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी प्रत्यक्ष भेटून डोळ्यांत पाणी आणत भावना व्यक्त केल्या, काहींनी व्हिडिओ संदेश पाठवले, अनेकांनी फोनवर संपर्क साधून कृतज्ञता व्यक्त केली, तर काहींनी विविध मार्गांनी त्यांच्या हृदयातील शब्द आमच्यापर्यंत पोहोचवले. नाटक सादर करताना कलाकारावर जसा परिणाम होतो, तसाच तो प्रेक्षकांवरही होत असल्याचे त्यादिवशी आम्हांला जाणवले. त्या दिवशी बालकांवर झालेला परिणाम उल्लेखनीय असाच.
एका पालकांनी सांगितलं, "माझं मूल घरी गेल्यावर तलवार घेऊन खेळत नव्हतं; ते ‘आई, आपण अन्यायाविरुद्ध उभं राहायला हवं’ असं म्हणत होतं.” एका छोट्या मुलीने तिच्या आईला विचारलं, "आई, जिजाऊंसारखी आई व्हायला खूप धैर्य लागत असेल ना?” काही मुलांनी दुसर्याच दिवशी किल्लेभेटीचाही आग्रह धरला, तर काहींनी इतिहासाची पुस्तकं मागितली काहींनी, ‘मी मोठा झाल्यावर देशकार्य करणार’ अशी भावनाही व्यक्त केली, हा सारा संस्कारांचा स्पर्श होता. नाटकातून रुजणारी मूल्ये ही अत्यंत वास्तविक असतात. शिवाजी महाराजांचं जीवन नाट्यस्वरूपात अनुभवताना, प्रेक्षक त्या काळात जगतात. त्या दिवशी प्रेक्षागृहातली शेकडो लहान हृदयं शिवगाथेने भारावून गेल्याचे आम्हांला जाणवले. अशा कलाकृतींमधून महाराजांचं स्मरण कृतीत, विचारांत आणि पुढच्या पिढीच्या मनोवृत्तीत झिरपत जातं. नाटक म्हणजे फक्त एक प्रयोग नसून, त्यातून एका पिढीच्या मना शिवसंस्कारांची बीजं रुजली जातात. याच बीजांतून उद्याचे सजग, धैर्यवान, स्वाभिमानी नागरिक घडणार असल्याचे काही प्रेक्षकांच्या उत्कट भावनातून जाणवले. प्रेक्षकांनी मनापासून दिलेल्या काही प्रतिक्रिया खाली नोंदवत आहे.
पवार : ‘राजे शिवबा’ कार्यक्रम शब्दात मांडणं कठीण आहे; तो सुंदर, भव्य आणि अंतःकरणाला स्पर्श करणारा होता. प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला. संगीत, वेशभूषा, पार्श्वसंगीत, सगळंच अतिशय सुरेख आणि दर्जेदार होतं. सर्व गाणी मनाला भावली; पण ‘गाएं हम तव आरती’ हे गीत अजूनही मनात रुंजी घालत आहे.
तृप्ती खरात : नाटक पाहताना एक क्षण या नाटकात बालकलाकार आहेत, याचाच विसर पडला. प्रत्येक पात्राचा काळजापर्यंत पोहोचणारा साजेसा आवाज आणि त्याला जोड देणारं साजेसं संगीत, मुद्देसूद नाटकाची मांडणी सगळंच विलोभनीय.
डॉ. अविनाश देवरे : घरातली लाडोबा बालके रंगमंचावर अतिशय जबाबदारीने वागत होती, मनापासून अभिनय करत होती. दिलेल्या भुमिकेमध्ये जीव ओतणारी लहानलहान मुलं बघून कधी आनंद होत होता, कधी टाळ्या वाजत होत्या. ‘ओव्हरऑल शो’चे एकाच शब्दात वर्णन करायचे तर समर्पण! या शुभारंभाच्या प्रयोगासाठी मेहनत घेणार्या प्रत्येकाचे अभिनंदन.
अक्षय पाठक : ‘राजे शिवबा’ हे बालनाटक म्हणजे एका तेजस्वी परंपरेचा परिचय आणि भविष्याच्या पिढीत स्वाभिमान जागवणारी ठिणगी आहे. अशी नाटकं फक्त रंगमंच उजळवत नाहीत, तर राष्ट्राचे भविष्यही प्रकाशमय करतात.
अशाप्रकारे नाटकाचा प्रभाव बालकलाकारांबरोबरच, प्रेक्षकांवरही होत असतो. नाटकाची तिसरी घंटा वाजली की रंगमंचावरची कथा सुरू होते आणि पडदा पडला की, प्रयोग संपतो. पण, खर्या अर्थाने नाटक तेव्हाच सुरू राहतं, जेव्हा ते प्रेक्षकांच्या मनात घर करतं. एखादा संवाद कानावर पडल्यावर, तो विचारात रूपांतरित होतो. एखादी भूमिका मनाला भिडते आणि नकळत आत्मपरीक्षणही सुरू होतं. काही प्रसंग डोळ्यांत पाणी आणतात, तर काही प्रसंग अंगावर शहारे आणतात. त्याक्षणी प्रेक्षक फक्त बघणारा राहत नाही; तो त्या कथेत सहभागीही होतो. विशेषतः जेव्हा नाटक ऐतिहासिक, सामाजिक किंवा मूल्याधारित विषयांवर आधारित असतं, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक असतो. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्त्वावर आधारित नाटक पाहताना, प्रेक्षकांच्या मनात स्वाभिमान, धैर्य, निष्ठा आणि कर्तव्यभाव जागृत होतो. प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित प्रयोग पाहताना आदर्श, संयम, कर्तव्यपालन यांची जाणीव अधिक तीव्र होते. अशावेळी नाटक संस्कार आणि प्रेरणेचं माध्यम बनतं.
बालकलाकारांसाठी रंगमंच म्हणजे आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि अभिव्यक्तीची शाळाच असते; पण प्रेक्षकांसाठीही तो अनुभव परिवर्तनकारी असतो. अनेक पालकांना आपल्या मुलांमधील सुप्त क्षमता दिसू लागते, काहींना स्वतःच्या आयुष्यातील मूल्यांची नव्याने जाणीव होते. काही तरुणांच्या मनात एखाद्या विचाराची ठिणगी पडते आणि ती पुढे जाऊन कृतीत रूपांतरितही होते. म्हणूनच, संवाद, चर्चा, आठवणी आणि कृतींमध्ये नाटक पुढे चालत राहाते. खरंतर नाटक म्हणजे एका संध्याकाळी सादर झालेला प्रयोग नसतो; तो असतो विचारांचा आणि भावनांचा एक दीर्घ प्रवास. हा प्रवास तोपर्यंत सुरू राहतो, जोपर्यंत प्रेक्षकांच्या मनात त्या नाटकाची ठिणगी तेवत राहते. प्रेक्षकांसाठी हे नाटक पडदा पडला की, संपत नाही. रंगमंचावरील घटना, प्रसंग, भावभावना आणि रसोत्पत्ती त्यांच्या मनपटावर खोल ठसा उमटवून जातात. म्हणूनच, प्रेक्षक ते नाटक हृदयाशी बांधून घरी घेऊन जातात, त्यावर विचार करतात, चर्चा करतात आणि नकळत आपल्या आयुष्याशी त्याची सांगड घालू लागतात.
नाट्यकला ही अत्यंत समृद्ध आणि सर्जनशील कला असून, ती केवळ दृश्य किंवा श्राव्य अनुभव नसून ती विचारांची, संवेदनांची आणि आत्मपरीक्षणाची कला आहे. एका प्रयोगातून असंख्य विचार जन्माला येतात. एखादा संवाद नवीन दृष्टिकोन देतो, एखादा प्रसंग अंतर्मुख करतो; तर एखादी भूमिका प्रेरणेची ठिणगी पेटवते. त्या विचार-प्रक्रियेतूनच नाटक किती प्रभावशाली होतं, याची जाणीव प्रेक्षकांना होते आणि तेव्हाच ती कलाकृती उत्तम असल्याची पावतीही त्यांच्या मनातून मिळते. नाटकाचं खरं यश टाळ्यांत नसतं ते असतं, त्या टाळ्यांनंतर सुरू होणार्या शांत विचारांत. जेव्हा प्रेक्षक घरी परतल्यावरही नाटकातील पात्रं, त्यांचे संघर्ष, त्यांची स्वप्नं आणि संदेश मनात रेंगाळत राहतात, तेव्हाच नाटक आपला उद्देश साध्य करतं.‘राजे शिवबा’चा पुढील प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पुन्हा एकदा विचार, प्रेरणा आणि भावनांचा हा प्रवास अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे.
जय भवानी! जय शिवाजी!
- रानी राधिका देशपांडे