
डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने तब्बल एक दशक सत्तेची चव चाखली. पण, त्यानंतर त्यांच्या वाटेला सत्ताकाळातील गैरकृत्याची अर्थात, कर्माची फळे आलीत; ती इतकी विषारी आहेत की, आता अस्तित्वासाठी धडपडण्याची वेळ या पक्षावर ओढवली आहे. पक्षातील काही ज्येष्ठ निष्ठावंतांनी हीच बाब उघडपणे बोलून दाखवली. पण, साहजिकच काँग्रेस नेतृत्वाला ती रुचलेली नाही. असा हा पक्ष आज देशात केवळ आणि केवळ ‘आ बैल मुझे मार’चा आनंद घेत आहे. खुद्द काँग्रेसचे राजपुत्र राहुल गांधी संसदेबाहेर काय किंवा संसदेत काय बोलून बसतील, याचा नेम नसतो. मग ते सावरणे गल्लीतील कार्यकर्त्यांपासून ते दिल्लीतील उरल्यासुरल्या निष्ठावंत आणि प्रवक्त्यांना अवघड होऊन बसते. मोदी सरकार केवळ थापाडे आहे, जुमलेबाज आहे आणि लोकांची दिशाभूल करीत आहे, असे समाजमाध्यमांतून लोकांच्या मनात घृणा निर्माण करण्याचा उद्योग करण्याशिवाय या लोकांना कोणतेच काम नाही. बरं, हे सगळे कमी की काय म्हणून, अधूनमधून त्यांच्याच पक्षातील आणि मित्रपक्षातील लोकदेखील या पक्षावर आणि त्याच्या नेतृत्वावर तोंडसुख घेऊन मोकळे होतात.
एकेकाळी पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या गळ्यातील ताईत असलेले आणि पक्षाच्या उच्चपदस्थांच्या रांगेत बसणार्या मणिशंकर अय्यर या नेत्याची अलीकडील व्हायरल झालेली खदखद ही गुलाम नबी आझाद, प्रणव मुखर्जी आदींच्या खदखदीतील साम्य दर्शविणारी अशीच. त्यामुळे देशात विरोधी पक्ष म्हणून मोठेपणा मिरवणार्या या पक्षाची अशी लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. मणिशंकर अय्यर यांनी तर थेट शीर्षस्थ नेतृत्वावरच प्रहार केले आहेत. मला अडगळीत टाकल्याची त्यांची भावना ही पक्षातून अनेक हिरे-मोती, मणि-माणके आता गळत चालल्याचे संकेत देणारी आहे. आगामी आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील माजी प्रदेशाध्यक्ष भूपेश बोरा यांनीही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षात निष्ठावंतांना, त्यांच्या शब्दांना किंमत राहिलेली नाही. नेतृत्व आपल्याच धुंदीत मस्त, कार्यकर्ते सुस्त आहेत. परिणामी, काँग्रेसने मणिही गमावले आणि मोतीही!
मोती...
एकेकाळी शालेय पाठ्यपुस्तकात प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘मोती’ नावाचा एक धडा होता. हा धडा अतिशय लोकप्रिय ठरला. त्यातील महत्त्वाची थीम होती, प्रामाणिकपणा. ‘मोती’ हे नाव होते एका पाळीव श्वानाचे. घरात आई-वडील संस्कारांचे धडे देत असताना, इमानदार प्राणी म्हणून कुत्र्याचे उदाहरण द्यायचे आणि मोती हे त्याचे प्रतीक होते. हे सर्व येथे नमूद करण्याचे कारण की, या कुत्र्याची दुसरी बाजूदेखील अधोरेखित करण्याचा जागतिक पातळीवर सार्वजनिक प्रकार नुकताच घडला. कुत्रा हा कितीही इमानदार प्राणी असला, तरी त्याची पायरी ही उंबरठ्यापर्यंत आणि तो उंबरठ्याच्या आत आला की, ‘हाड’ नावाचा एक जिव्हारी लागणारा शब्द उच्चारला जायचा. आजचा काळ हा आधुनिक तंत्रयुगाचा. आता तर ‘एआय’चे युग. संगणक, महासंगणक, नंतर यातील वेगवेगळ्या क्रांती आणि त्याचे प्रगतीवर होणारे सकारात्मक दूरगामी परिणाम आदींचा आपण सर्वजण अनुभव घेतच आहोत. मात्र, हे तंत्रज्ञान इतके वेगाने पसरत आहे की, आता त्याचा प्रवास हाताचे बोट ते बुद्धी इतक्या कमी अंतराचा झाला आहे. त्यामुळे माणसाला खेळविणार्या या तंत्रज्ञानाने आता अनेक प्रकारे मर्यादा ओलांडून प्रवास सुरू ठेवला आहे.
सध्या ‘एआय इम्पॅट समिट’ सुरू आहे आणि त्यात अशाच एका बेईमान किंवा ‘हाड’ शब्द वापरायला भाग पाडणार्या तंत्रज्ञान परिपूर्ण कुत्र्याची चर्चा गाजत आहे. रोबोटिक कुत्र्याने ही ‘समिट’ गाजवली. पाळत ठेवणे आणि देखरेख ठेवण्याची शैली अवगत असणारा हा ‘रोबोटिक कुत्रा’ किंवा आपल्या काळातील ‘मोती’ त्याचे मूळ कार्य करण्याऐवजी चालता झाला. एकूणच, मतितार्थ एवढाच की, आधुनिक काळातील ‘मोती’ने इमानदारीने वागावे, हाच संदेश संबंधितांना भारताने दिला आहे. उगा नवा काळ आहे म्हणून ‘जुने जाऊ द्या मरणालागूनि’सारखे कृत्य चालणार नाही, यातून दिलेला गर्भित इशारा आहे. तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल, तर तो मानवी कल्याणासाठीच व्हायला हवा, हे कोणीही नाकबूल करू नये. लबाडीने आपले तंत्रज्ञान थोपविण्याची तर्हा नक्कीच दुषणावहच. इतक्या चांगल्या विषयावरील या ‘समिट’मधून तरुणाईला नव्या ज्ञानाचे आकलन व्हावे आणि ते आत्मसात करता यावे, हा यातून घ्यायचा बोध.
- अतुल तांदळीकर