मुंबई : (Kashi Vaishya Guru Revival) भारतवर्षातील समस्त वैश्य समाजाचे पावन वैश्य कुल गुरु मठ सुमारे ७०० वर्षांपासून गुरु परंपरेच्या माध्यमातून समाजाचे आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहे. काशी महापुण्य क्षेत्रात या दिव्य परंपरेचा प्रारंभ शृंगेरी शारदा पीठचे १२ वे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विद्यारण्य स्वामी यांच्या पवित्र कालखंडात झाला. मुगल आक्रमणांच्या काळात ही गुरु परंपरा काशीहून कर्नाटक राज्यातील गोकर्ण क्षेत्राजवळील हलदीपुर येथे स्थलांतरित झाली. तेथे सात गुरुजनांपर्यंत परंपरा अखंड सुरू राहिली; परंतु नंतर काही काळासाठी ती खंडित झाली. काशी येथे मुळ वैश्य कुल गुरु मठाचा प्रतिकात्मक पुनःनिर्माण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.(Kashi Vaishya Guru Revival)
पुनश्च, शृंगेरी शारदापीठ चे जगद्गुरु शंकराचार्य श्री भारतीतीर्थ महास्वामी यांच्या कृपाशीर्वादाने दि. १२ मार्च २००४ रोजी वैश्य गुरु परंपरेचा पुनरारंभ झाला. त्यांच्या पावन मार्गदर्शनाखाली पूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांच्या माध्यमातून वैश्य समाजास पुनः गुरु लाभले. वैश्य कुल गुरु मठ, काशी येथे ही परंपरा पुनः प्रतिष्ठित होत आहे. हा मठ केवळ धार्मिक स्थळ नसून देशभरातील सुमारे ३८० वैश्य समाज घटकांना एकत्र बांधणारे आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. काशीतील वैश्य कुल गुरु मठाचे पुनर्निर्माण हे केवळ वास्तू उभारणी नसून, संपूर्ण वैश्य समाजाच्या एकतेचा, आध्यात्मिक जागृतीचा आणि राष्ट्रीय समरसतेचा दिव्य प्रारंभ आहे.(Kashi Vaishya Guru Revival)
वैश्य समाजाच्या पुनरुत्थानासाठी काशीस्थित मठात वैदिक गुरुकुलाचा शुभारंभ करण्यात आला. सध्या ४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, येथे वैदिक शिक्षणाबरोबरच आधुनिक व व्यावहारिक शिक्षण दिले जाणार आहे. उद्दिष्ट असे की विद्यार्थी आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम होऊन भविष्यकाळात सेवा, नोकरी किंवा व्यवसाय क्षेत्रातही समर्थ बनावेत. मठ प्रशासनाने समाजातील पालकांना आपल्या मुलांना गुरुकुलाशी जोडण्याचे आवाहन केले आहे.(Kashi Vaishya Guru Revival)
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू व दिल्ली येथून वैश्य बांधवांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. माहेश्वरी, केशरवाणी, अग्रवाल, जायसवाल, रोनियार, साहू व मध्येशिया गुप्ता समाज प्रतिनिधींची विशेष उपस्थिती लाभली. अनेक गावांमधून आलेल्या बांधवांनी सेवा कार्यातही सहभाग घेतला. या प्रसंगी उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री व काशी क्षेत्रातील समाजसेवक रवींद्र जायसवाल यांनी परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामीजींचे दर्शन घेतले. त्यांनी काशीतील हा वैश्य कुल गुरु मठ संपूर्ण वैश्य समाजाचे प्रमुख आध्यात्मिक केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करून विकास कार्यात सक्रिय सहकार्याचे आश्वासन दिले.(Kashi Vaishya Guru Revival)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक