पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर
21-Feb-2026
Total Views |
मुंबई : (Rajeshree Shirwadkar) मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राजेश्री शिरवाडकर यांनी मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासह पटसंख्या वाढविण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. विरोधकांनी उमेदवार न देता सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.
शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर राजेश्री शिरवाडकर यांनी विरोधकांचे आभार मानत, “कोणीही उमेदवार दिला नाही, त्याबद्दल धन्यवाद. पुढील काळातही असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे,” असे सांगितले. मुंबई महापालिकेतील शाळांचा दर्जा उंचावणे ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. “अनेक शाळा सुधारायच्या आहेत. मराठी शाळांची पटसंख्या कशी वाढेल यासाठी ठोस उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धात्मक युग लक्षात घेऊन महापालिका शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. “महापालिकेतील विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. मराठी शाळा वाढविणे आणि त्यांचा दर्जा उंचावणे हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे,” असे शिरवाडकर यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना भेटायला येताना पुष्पगुच्छ न आणता वह्या आणाव्यात, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला उपयोगी पडतील, असे आवाहनही त्यांनी केले.