बल्गेरियाची ऊर्जा रणनीती

Total Views |

आज बल्गेरियाची ऊर्जा व्यवस्था आणि नवीकरणीय ऊर्जाक्षेत्र एका निर्णायक टप्प्यावर उभे आहे. युरोपियन संघ नवीन नियम, महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आणि औद्योगिक धोरणांच्या माध्यमातून ऊर्जा संक्रमणाचा वेग वाढवत असताना, बल्गेरियामध्ये नवीकरणीय ऊर्जास्रोतांची झपाट्याने वाढ, मर्यादित ग्रीड क्षमता आणि बाजार सुधारणा प्रक्रियेतील विलंब यामुळे देशांतर्गत प्रणालीवर ताण निर्माण झाला आहे.

२०२३ पासून अमलात आलेल्या सुधारित नवीकरणीय ऊर्जा निर्देशानुसार, २०३० पर्यंत युरोपियन संघाने किमान ४२.५ टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतांतून मिळवण्याचे लक्ष्य ठेवले असून, ४५ टक्के हे उच्च उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी परवानग्या जलद करणे, पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक आणि नवीकरणीय तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार आवश्यक ठरणार आहे. बल्गेरियाने स्वतःसाठी २०३० पर्यंत ३४.१ टक्के नवीकरणीय ऊर्जेचा वाटा गाठण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वीज, हीटिंग, कूलिंग आणि वाहतूक क्षेत्रात समन्वित व ठोस कृती करावी लागेल. विशेषतः वाहतूक क्षेत्रात दशकाच्या अखेरीस १४ टक्के ऊर्जा नवीकरणीय स्रोतांतून मिळवण्याचे सूचक उद्दिष्ट आहे.

जगभरातील देश आज ऊर्जा-सुरक्षा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दुहेरी आव्हानाला सामोरे जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर ऊर्जा ग्रीडची क्षमता वाढवणे, सीमापार ऊर्जा देवाणघेवाण सुलभ करणे आणि नवीकरणीय स्रोतांचा मोठ्या प्रमाणात समावेश करणे अत्यावश्यक ठरते. बल्गेरियाचा आंतरजोडणी विस्तार आराखडा या व्यापक जागतिक उद्दिष्टांशी सुसंगत आहे. यामुळे देशांतर्गत सौर आणि पवन प्रकल्पांना चालना मिळेलच; पण आग्नेय युरोपमध्ये अधिक एकात्मिक आणि स्थिर वीज बाजारपेठ निर्माण होण्यासही मदत होईल.
२०२४ मध्ये युरोपियन संघाने वीज बाजार सुधारणा अंतिम केल्या. दीर्घकालीन करार, स्थिर दर, जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि ग्राहक संरक्षण यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे स्वरूप अधिक दीर्घकालीन आणि टिकाऊ होणार आहे. त्याच वेळी ‘नेट-झिरो इंडस्ट्री अ‍ॅट’नुसार २०३० पर्यंत सौर पॅनेल, बॅटरी, विंड टर्बाईन आणि हायड्रोजन उपाययोजना यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानांपैकी ४० टक्के उत्पादन युरोपमध्येच करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे ऊर्जा प्रश्न हा औद्योगिक स्पर्धात्मकतेचा मुद्दा बनला आहे.

बल्गेरियाने वीज प्रणालीचे डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण यावर विशेष भर दिला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऊर्जा राखीव साठ्यांचे सामायिक व्यवस्थापन करता येते, ज्यामुळे अनियमित सौर व पवन ऊर्जेच्या वाढत्या प्रमाणातही ग्रीड स्थिर राहू शकते. नवीकरणीय ऊर्जेचे जागतिक प्रमाण वाढत असताना अशा तांत्रिक समन्वयाची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते. तथापि, सौर आणि पवनऊर्जेतील असंतुलन ही चिंतेची बाब आहे. अनेक देशांप्रमाणे बल्गेरियातही सौर प्रकल्प वेगाने वाढत असताना पवनऊर्जेला अपेक्षित प्राधान्य मिळत नाही. ऊर्जास्रोतांचे संतुलित मिश्रण राखणे, प्रणालीच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी अत्यावश्यक आहे. हवामानातील चढउतार, दिवस-रात्रीचे चक्र आणि हंगामी बदल लक्षात घेतल्यास विविध स्रोतांचा समन्वय अधिक टिकाऊ ठरतो.

ऊर्जा साठवण प्रकल्पांची अंमलबजावणी आणि ‘ईस्ट-वेस्ट एनर्जी कॉरिडोर’सारख्या संकल्पनांमुळे प्रादेशिक ऊर्जा व्यापाराला नवी चालना मिळू शकते. दहा गिगावॅट आंतरजोडणी क्षमता ही केवळ तांत्रिक वाढ नसून, ऊर्जासुरक्षिततेची भक्कम हमी आहे. भविष्यातील अनिश्चित भू-राजकीय परिस्थितीत मजबूत ऊर्जा जोडण्या जागतिक स्थैर्यास हातभार लावू शकतात. एकूणच, बल्गेरियाचा हा उपक्रम पायाभूत गुंतवणूक, डिजिटायझेशन, प्रादेशिक सहकार्य आणि ऊर्जा साठवण यांचा समन्वय साधत अधिक लवचीक, सक्षम आणि हवामानपूरक ऊर्जाव्यवस्थेकडे वाटचाल दर्शवतो. त्याचे यश केवळ राष्ट्रीय पातळीपुरते मर्यादित राहणार नाही. उलट, ते जागतिक ऊर्जा संक्रमणासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरू शकते.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.