
राज्य सरकारकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी दिला जाणारा ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला. राज्याच्या कानाकोपर्यातून साहित्य-संस्कृतीचा जागर करणार्या लेखकांची नावं या यादीमध्ये झळकली व त्यांच्या लिखाणाचा उचित सन्मान झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. प्रख्यात लेखिका सानिया यांच्यापासून ते मेजर मोहिनी-गर्गे कुलकर्णी, अभिजित जोग, भानू काळे अशा ज्ञानवंतांचा या पुरस्कारार्थींच्या यादीमध्ये समावेश. तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी झटणार्या मयूर बागुल यांना प्रौढ वाङ्मय विभागांतर्गत शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लिखाणासाठी त्यांच्या ‘सर्जक’ या लेखसंग्रहाला ‘वसंतराव नाईक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर दुसर्या बाजूला प्रथम प्रकाशन विभागात कवितेसाठी दिला जाणारा ‘बहिणाबाई चौधरी’ पुरस्कार सचिन शिंदे यांना त्यांच्या ‘पातीवरल्या बाया’ या काव्यसंग्रहासाठी जाहीर करण्यात आला. मयूर बागुल आणि सचिन शिंदे यांच्या साहित्यात युवा जाणिवांचा प्रतिध्वनी अधिक लुभावणारा आहे, त्याचबरोबर पुढच्या पिढीला दिशा देणारासुद्धा. त्यानिमित्ताने त्या दोघांशी केलेली ही खास बातचीत...
‘सर्जक’ या पुस्तकाच्या अंतरंगात नेमकं वाचकांना काय वाचायला मिळतं?
माझ्या पुस्तकांमध्ये मी शेती आणि शेतीविषयक प्रश्नांचा धांडोळा घेतला आहे. त्याचबरोबर शेतीच्या अनुषंगाने असलेले कायदे, शासनाचे धोरण इथपासून ते हवामान बदल, त्याचे परिणाम आदींचा ऊहापोह केला आहे. आपल्या समाजामध्ये दोन नवनिर्मितीचे घटक आहेत, एक म्हणजे शेतकरी आणि दुसरी म्हणजे स्त्री. त्यामुळे ‘माता’ आणि ‘माती’ या दोन गोष्टी माझ्या लिखाणातील केंद्रबिंदू आहेत.
शेतकर्यांच्या प्रश्नांवर लेखणीतून व्यक्त होण्याचा निर्णय आपण कधी घेतलात?
साधारण २०२१ पासून माझ्या लिखाणाला सुरुवात झाली. शेतकर्यांच्या आत्महत्या, त्यामागची कारणं यासंदर्भात माझा अभ्यास सुरू होता. शासनाचे यासंदर्भातील अहवाल ज्यावेळेला वाचले, त्यावेळेला ही समस्या किती जटिल आहे, याची माहिती होत गेली. आपल्या मातीसाठी म्हणून आपली काही एक भूमिका असायला हवी, तशा पद्धतीचं साहित्य पुढे यायला हवं म्हणून मी लिखाण करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, कामानिमित्त अमर हबीब यांच्याशी माझा संपर्क झाला. श्रीकांत उमरीकर यांच्याकडून मी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांचं सगळं साहित्य मागवून घेतलं आणि वाचलं. त्यामुळे मला माझ्या लिखाणासाठी दिशा सापडली. प्रबोधनाच्या भूमिकेतून माझं साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं, यासाठी मी लिखाण करत गेलो.
आपले पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर वाचकांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया, एकूणच प्रतिसाद याविषयी काय सांगाल?
माझं लेखन अनेकांना आपलंसं वाटलं, याचा मला आनंद आहे. अनेकांना असं वाटलं की, त्यांच्या मनातील समस्या मी कागदावर उतरवल्या आहेत. आता उदाहरणार्थ, विदर्भामध्ये ‘खारपानपट्टा’ आहे. त्याअनुषंगाने केंद्राची आणि राज्य सरकारची अनेक धोरणं आहेत. जसं की, ‘अटल भूजल योजना’ ज्याची शेतकर्यांना मदत होते. मात्र, या योजनांची अंमलबजावणी होत नाही. लोकांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या समस्यांचे आकलन असणारी मंडळी, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे या गोष्टी मी पुस्तकातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या तांत्रिक समस्या शहरी भागातील लोकांना जाणवत नाहीत. मात्र, याची झळ ग्रामीण भागातील लोकांना जाणवते. त्यामुळे आपण त्यांच्या भाषेत साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, हा माझा हेतू होता आणि तो या पुस्तकामुळे पूर्ण झाला, असं मला वाटतं. उपेंद्र धोंडे, अमर हबीब अशा अनेकांची मला या लिखाणात मदत झाली.
शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करणारं साहित्य मराठीमध्ये किती लिहिलं जातं? आपला याबाबतचा अनुभव काय?
आपल्याकडे शेतकर्यांच्या दुःखावर-वेदनेवर अनेकांनी लिखाण केलं आहे. मात्र, या अडचणी सोडवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, यावर फारसं भाष्य केलं गेलेलं नाही. काळाच्या ओघात शेतकर्यांसमोरच्या अडचणी वाढत गेल्या आहेत. शेतीवर कर नाही म्हणून अनेक बड्या-बड्या कंपन्यांनी शेती-व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांची भरभराट झाली असली, तरी शेतकरी मात्र कर्जाच्या कचाट्यात अजूनही अडकलेला आहे. ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे, त्यांची परिस्थिती फारशी बरी नाही, असं आपल्याला दिसून येईल. निकषांमध्ये न बसणारी माणसं कर्जमाफीची सवलत घेतात आणि सरकारला फसवतात, हे चित्र बदलायला हवं. त्यासाठी धोरणात्मक पातळीवर बदल होणे आवश्यक आहे.
आपल्या देशाचे युवक हेच आपलं भविष्य आहे, त्यांनी शेतकर्यांच्या भावविश्वाकडे कसं बघितलं पाहिजे?
आजचं जग हे स्पर्धेच्या युगातील जग आहे, जिथे सातत्याने गोष्टी बदलत आहेत. आपल्याकडे जी ‘स्टार्टअप’ संस्कृती आहे, त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. काही ‘स्टार्टअप’ तथा आपल्या ग्रामीण भागातील कृषी प्रक्रिया केंद्रं यांचा जर आपण संयोग घडवून आणला, तर निश्चितच शेतीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडेल आणि हे युवकांच्या माध्यमातून सशक्तपणे घडू शकतं. पारंपरिक शेतीच्या बंधनामध्ये अडकून न राहता, शेती-व्यवसायामध्ये तंत्रज्ञान विकसित करून जास्तीत-जास्त लोकांचा सहभाग यामध्ये घडवून आणला, तर खर्या अर्थाने शेतीला चांगले दिवस येतील. शेतीच्या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं. मात्र, युवकांनी हा परिवर्तनाचा विडा उचलला, तर महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा जो संदेश दिला होता, तो सार्थकी ठरेल.
सामाजिक चळवळीतून परिवर्तन घडल्याचं आपण पाहिलेलं आहे. मात्र, साहित्यातून तसं परिवर्तन घडेल का?
निश्चितच, साहित्यातून परिवर्तन घडतं यावर माझा विश्वास आहे आणि याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ज्या साहित्याची निर्मिती केली, त्यातून समाजामध्ये परिवर्तन घडले, लोकांना त्यांच्या जगण्याची दिशा मिळाली. नंतरच्या काळात ‘दलित पँथर’च्या चळवळीतील नामदेव ढसाळ यांनी आपल्या लेखणीतून चळवळीला दिशा दिली. अण्णाभाऊ साठे यांची साहित्यसंपदा समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणारी होती. शेतकर्यांचे नेते शरद जोशी यांनी शेतीचे प्रश्न लोकांसमोर मांडले. त्यामुळे साहित्यातून परिवर्तन घडतं, यात शंकाच नाही.