‘जब्राट’ हा गावखेड्यातील सुंदर प्रेमकथा असलेला मराठी चित्रपट काल, दि. २० फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात दाखल झाला. यानिमित्ताने चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रगती कोलगे आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेल्या संवादाचा हा संपादित अंश...
‘जब्राट’ चित्रपटात नेमके प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे?
अनुष्का : आम्ही सुरुवातीला एक ‘म्युझिकल’ चित्रपट करण्याचा विचार केला होता. त्या संकल्पनेत अनेक कलाकारांची गरज होती आणि त्यानुसार कलाकार मिळाले. तसेच चित्रपटात प्रेमकथेचे वेगवेगळे ‘अँगल’ तयार झाले. अशाप्रकारे विविध प्रेमाच्या धाग्यांना एकत्र गुंफत ‘जब्राट’ ही प्रेमकथा साकार झाली.
यापूर्वी मालिकांमध्ये अभिनयाचा अनुभव गाठीशी असला तरी, अभिनेत्री म्हणून हा तुझा पहिलाच चित्रपट होता. तेव्हा एकंदरीतच अनुभव कसा होता?
अनुष्का : हा चित्रपट करत असताना मी कोणतीही मालिका करत नव्हते. नुकतीच माझी आधीची मालिका संपली होती आणि आता चित्रपट प्रदर्शित होत असताना, नवी मालिका सुरू झाली आहे. हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत खास आणि सुंदर असाच होता. हा चित्रपट म्हणजे एक परिपूर्ण ‘पॅकेज’ आहे. महाविद्यालयातील तरुणांना तो नक्कीच भावेल; पण ज्यांचे महाविद्यालयातील दिवस मागे पडले आहेत, त्यांनाही पुन्हा त्या आठवणीत घेऊन जाईल. उत्तम गाणी, रोमँटिक गाणी, रॅप साँग, सुंदर नृत्य, विविध स्वभावांचे कलाकार आणि रंगतदार व्यक्तिरेखा, यामुळे प्रत्येक वयोगटाला काही ना काही या चित्रपटात आपलेसे वाटेल. तसेच ज्येष्ठ कलाकारांचाही सहभाग असल्यामुळे सर्व पिढ्यांसाठी हा चित्रपट खास ठरणार आहे.
या चित्रपटात प्रेम, विनोद आणि अगदी लावणीसुद्धा आहे. त्यासाठी खर्याखुर्या लावणी कलाकारांना आपण चित्रपटात स्थान दिरले आहे. त्याविषयी काय सांगाल?
हा चित्रपट म्हणजे प्रेम, संगीत, मस्ती, नृत्य, राडा आणि लोकसंगीत या सगळ्यांचं एक ‘जब्राट’ ‘कॉम्बिनेशन’ आहे. तसेच या चित्रपटात आम्ही एक सामाजिक विषयही हाताळला आहे. कथा महाविद्यालयातील कॅम्पसवर आधारित आहे आणि त्यासंदर्भात लावणी कशी येते, हे तुम्हाला चित्रपटात पाहायलाच मजा येईल. खरं तर मी भूमिका निवडताना खूपच चोख असते. प्रत्येक कलाकार त्या पात्राला पूर्ण न्याय देणारा असावा, ही माझी अट असते. लावणीसाठीही मला केवळ नृत्य करणारी कलाकार नको होती, तर अभिनयातही सक्षम असलेली व्यक्ती हवी होती. हिंदवी पाटील ही केवळ नृत्यासाठी चित्रपटात आलेली नाही. तिची स्वतंत्र आणि ठसठशीत व्यक्तिरेखा आहे. सुरेखा कुडची ताई तर अनुभवी कलाकार आहेतच. त्यांच्या मूळ नृत्यकलेचा आणि क्षेत्रातील अनुभवाचा चित्रपटाला नक्कीच मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे या दोघींच्या उपस्थितीमुळे कथेला अधिक खोली आणि वास्तवता लाभली आहे.