
चेन्नमा यांना ‘वीर राणी’ ही उपाधी आहे. ही उपाधी दिल्याने ‘वीर राणी’ या उपाधीचाच खरं तर सन्मान द्विगुणित झाला. ‘माझे कित्तूर प्राण गेला, तरी सोडणार नाही’ म्हणत इंग्रजांशी अखंड शौर्याने संघर्ष करणारी राणी चेन्नमा. दि. २१ फेब्रुवारी १८२९ रोजी राणी चेन्नमा यांना वीरगती प्राप्त झाली. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची ही संघर्षगाथा...
'माझे कित्तूर मी इंग्रजांना देणार नाही; प्राण गेले तरी मी ते सोडणार नाही,” राणी चेन्नमा गर्जली! मातृभूमीप्रती तिची असलेली निष्ठा आणि नीतिस्वातंत्र्य यावर असलेली श्रद्धा, तसेच अन्यायाविरोधातला तिचा संघर्ष हा शब्दातीत असाच.
दि. २३ ऑक्टोबर १७७८ रोजी बेळगाव येथील काकटी गावात जन्मलेल्या राणी चेन्नमा. लहानपणापासूनच अत्यंत धाडसी. त्यांना त्यांचे वडील धुळाप्पा देसाई गौड्रारू यांनी घोडेस्वारी करणे, तलवार चालवणे, भालाफेक याचे शिक्षण दिले.
वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी राणी चेन्नमा यांचा विवाह देसाई कुटुंबातील राजा मल्लसराज यांच्याशी झाला. राणी चेन्नमाची कारकीर्द अशा काळातली आहे की, जेव्हा एक स्त्री म्हणून तिच्या वाट्याला वैयक्तिक संघर्षही होता आणि राजकीय संघर्षही. काही वर्षांतच राजा मल्लसराज यांचा खून कपटाने, विश्वासघातकीपणाने करण्यात आला. एक आई म्हणून राणी चेन्नमाने मुलाकडे पाहून हे दुःखही मनात बंदिस्त केले. मात्र, त्या मुलाचाही मृत्यू झाला. तो काळ असा की, भारतात पाय रोवण्यासाठी इंग्रजांनी क्रूरतेचा कळस पार केला होता. भारतीयांनी परकीय इंग्रजी सत्तेबद्दल ‘ब्र’ शब्द उच्चारणे तर सोडाच, तसा विचारही करता कामा नये; यासाठी इंग्रजांनी कडेकोट तयारी सुरू केली होती. व्यापाराच्या निमित्ताने आलेले कपटी इंग्रज देशाचे जुलमी सत्ताधारी बनले, हे भारतीयांना कळेपर्यंत उशीर झाला होता.
मात्र, "स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठी लढू,” असे म्हणत राणी चेन्नमांने इंग्रजांशी लढा दिला.
इंग्रजाचा डोळा राणी चेन्नमाच्या कित्तूर राज्यावर होताच. पती वारले, पुत्रही वारला. या दुःखद स्थितीतही दुःख बाजूला सारत वीर राणी चेन्नमाने राज्याचे हित साधायचे ठरवले. तत्कालीन रूढीनुसार ती राज्याच्या गादीवर थेट कारभार करू शकत नव्हती. कित्तूरच्या प्रजेचे धार्मिक, सामाजिक आणि सर्वप्रकारचे रक्षण-विकास करायचा; तर राज्यशकट कित्तूरच्या राजसत्तेकडेच हवा. कित्तूरवर जर थेट इंग्रज शासन आले, तर जनतेला इंग्रजांच्या गुलामीपासून वाचवणे अशक्य होते. त्यामुळे राणी चेन्नमाने राजगादीला वारस असावा म्हणून त्यांनी शिवलिंगप्पा नावाचा पुत्र दत्तक घेतला. त्याला राज्याचा उत्तराधिकारी बनवले. त्यावेळी कित्तूरचे राज्य हे धारवाड जिल्ह्यात येत होते. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉर्ड डलहौसी याने ‘दत्तक विधान’ नाकारले. त्याने शिवलिंगप्पा याची राज्याचा वारसदार म्हणून हकालपट्टी करण्याचा आदेश दिला. त्यावेळी सेंट जॉन थाच्रेय हा धारवाडचा ‘गव्हर्नर’ होता, तर चॅप्लिन हा ‘कमिशनर’ होता.
या दोघांनीही राणी चेन्नमा यांना राज्य खालसा करण्याची सूचना केली आणि तसे न केल्यास युद्धास तयार राहण्यास सांगितले.
परकीय आक्रांत राणीचे राज्य हिरावून घेण्यास टपले. इंग्रजांनी कित्तूरवर आक्रमण करण्याचे ठरवले. राणी चेन्नमाने तत्काळ त्यांची राजधानी डोंगर भागात हलवली. राणीने राज्य वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. इंग्रजांना वाटले की, देशभरातली भलीभली संस्थाने कपटाने किंवा युद्धाने जिंकलो; तर कित्तूरही जिंकू शकू. कित्तूरमध्ये तर पती आणि मुलाच्या मृत्यूच्या दुःखात असलेली युवा राणी आहे. तिला काय सहज हरवू. हा विचार करून इंग्रजांनी अचानक कित्तूरवर हल्ला चढवला. त्यांनी कित्तूरचा खजिना लुटण्याचा प्रयत्न केला. कित्तूरच्या खजिन्यात त्यावेळी मौल्यवान दागदागिने आणि दीड कोट रुपये इतका खजिना होता. इंग्रजांच्या ‘मद्रास नेटिव्ह हॉर्स आर्टिलरी’च्या तिसर्या तुकडीत २० हजारांपेक्षा अधिक सैनिक होते. त्यात सुमारे ४०० पेक्षा अधिक सैनिक हे बंदुकधारी होते. त्यांनी हल्ला केला. मात्र, राणी चेन्नमाही आपल्या सैन्यासोबत या इंग्रज सैन्यावर तुटून पडली.
राणी चेन्नमाच्या सैन्याचे बळ इंग्रजांच्या तुलनेत कमी होते. मात्र, राणी चेन्नमा यांनी आपल्या सैनिकांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. आपली राणी महिला असूनही इंग्रजांशी शौर्याने लढते, हे पाहून त्यांनाही स्फुरण चढले. राणीचे सैन्य प्राणपणाने इंग्रजांशी लढले. राणी चेन्नमा यांचे सैन्य आपल्याशी अशाप्रकारे धैर्याने मुकाबला करेल, अशी अपेक्षा इंग्रजांना देखील नव्हती. या युद्धात इंग्रज सैन्याचा पराभव झाला. युद्धात सेंट जॉन हा गव्हर्नर मारला गेला. इंग्रजांच्या काही अधिकार्यांना राणी चेन्नमा यांच्या सैनिकांनी बंदी बनवले. युद्धबंदी करण्याच्या अटीवरच या अधिकार्यांची सुटका करण्यात आली. एक संस्कृत सुभाषित आहे-
शौर्यं पराक्रमो धैर्यं प्राज्ञता समता भृतिः|
त्यागौदार्यं च धृतिश्चैव गुणा: शूरा: प्रकीर्तिता:॥
या सुभाषिताचा अर्थ आहे, शूरवीर व्यक्तीमध्ये शौर्य (वीरता), पराक्रम, धैर्य, बुद्धिमत्ता, समता, त्याग आणि उदारता हे गुण प्रकर्षाने दिसतात. शौर्याचा वारसा जगणारी वीर राणी चेन्नमा हे सुभाषित खर्या अर्थाने जगली.
इंग्रजासोबत युद्ध जिंकल्यानंतर, बंदी बनवलेल्या इंग्रजांच्या अधिकार्यांची तिने सुटका केली. कारण, दया, मानवता आणि नीतिमत्ता तिच्या अंतर्मनाची शक्ती होती. पण, नीतिमत्ता आणि शाश्वत मानवी मूल्यांना चिरडून टाकत इंग्रजांनी कपटाने भारतावर राज्य करण्यास सुरुवात केलीच होती. त्यामुळे राणी चेन्नमाने इंग्रजांच्या अधिकार्यांना सोडून देण्यासाठी युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारूनही लबाड इंग्रज स्वस्थ बसले नाहीत.
वीर राणीला समोरून पराजित करता येत नाही, तिचे शौर्यतेज आणि प्रजेची तिच्या वरची असलेली निष्ठा, यामुळे आपण कित्तूर जिंकू शकत नाही, याची खात्री इंग्रजांना झाली. पण, राणीचा पराक्रम आणि राणीची हिंमत ही देशभरातील संस्थानिकांची प्रेरणा बनेल आणि कटकारस्थान करून काबीज केलेली भारतावरची सत्ता गमवावी लागेल, याचीसुद्धा खात्री इंग्रजांना होती. इंग्रजांनी राणी चेन्नमाला दिलेले वचन तोडले. राणी चेन्नमाला हरवण्यासाठी त्यांनी त्यांचा तोच तो फोडाफोडीचा खेळ सुरू केला. राणी चेन्नमाच्या या कित्तूरमधील दोघा विश्वासघातक्यांना आपल्याकडे वळवले. या विश्वासघातक्यांनी कित्तूरच्या चोरवाटा इंग्रजांना सांगितल्या.
इंग्रजांनी कित्तूरवर चौपट सैन्य घेऊन हल्ला केला. हल्ला झाल्याबरोबर राणीने सैन्याचे नेतृत्व करत युद्ध सुरू केले. चेन्नमा व तिचे सैनिक १२ दिवस शर्थीने लढले. पण, राणी चेन्नमाच्या दोन सैनिकांनी तोफांच्या दारुगोळ्यात माती व गाईचे शेण मिसळून तिचा विश्वासघात केला. या विश्वासघातामुळे प्राणपणाने लढूनही राणीला इंग्रजांसमोर हार पत्करावी लागली. सद्भावना आणि विश्वास या सद्गुणांची पुतळा असलेल्या राणीने स्वप्नात विचार केला नव्हता की, विश्वासघातही होऊ शकतो. हा पराजय राणीच्या नैतिकतेचा नव्हता, तर इंग्रजांच्या विश्वासघातकी वृत्तीचा तो विजय होता.
राणी चेन्नमाला इंग्रजांनी पकडून बेळहोंगलच्या कारागृहात ठेवले. राणी शरणागती पत्करून इंग्रजांची मांडलिक होऊ शकली असती. पण, अत्याचार करणार्या इंग्रजांपुढे झुकण्यापेक्षा कारावासात राहून अत्याचाराला विरोध करण्याचे राणीने ठरवले. त्यामुळेच की काय, राणी तुरुंगात असतानाही तिचे निष्ठावंत सैन्य १८२९ पर्यंत तिच्या अनुपस्थितीतही गनिमीकाव्याने युद्ध लढत होते. त्यांची जिद्द आणि प्रेरणा होती, वीर राणी चेन्नमा!
कैद झाल्यानंतर राणी चेन्नमाला आयुष्याची शेवटची पाच वर्षे बेळहोंगल किल्ल्यातील तुरुंगातच व्यतीत करावी लागली. तो काळ तिने पवित्र ग्रंथांचे वाचन आणि पूजाअर्चा करण्यात घालवला. त्या कारागृहातच दि. २१ फेब्रुवारी १८२९ रोजी राणी चेन्नमाचे निधन झाले. पण, राणी चेन्नमाच्या संघर्षस्मृती भारतभर अंतप्रवाह बनून जिवंत राहिल्या. तो संघर्ष १८५७च्या स्वातंत्र्य समरात पुन्हा जिवंत झाला. त्यामुळेच घाबरून इंग्रजांनी वीर राणी चेन्नमाबद्दल नोंद केली, ‘त्रासदायक महिला शासक!’ शत्रूला आपल्या शौर्याने, नीतिमत्तेने आणि दयामय उदारतेनेही धडकी भरवणार्या वीर राणी चेन्नमा यांच्या शौर्याला, प्रजाहित निष्ठेला नमन!
वीर राणी चेन्नमा यांच्या स्मृती...
कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्येही ‘पोवाडे’, ‘लावणी’ आणि ‘गिगी’ पदाच्या माध्यमातून राणी चेन्नमाची ‘वीरगाथा’ गायली जाते. ब्रिटिश सैन्याविरुद्धचा राणी चेन्नमाचा पहिला विजय अजूनही कित्तूरमध्ये ‘कित्तूर उत्सव’ या नावाने दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात साजरा होतो. भारतीय टपाल खात्याने १९७७ साली राणीचे चित्र असलेले एक टपाल तिकीटही छापले होते.
दि. ११ सप्टेंबर २००७ रोजी दल्लीतील भारतीय संसद संकुलात राणी चेन्नमाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. बंगळुरू आणि कित्तूर येथेही राणी चेन्नमाच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. ‘कित्तूर चेन्नमा’ नावाचा ऐतिहासिक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. बंगळुरू आणि कोल्हापूरला जोडणार्या एका लोकप्रिय भारतीय रेल्वेला ‘राणी चेन्नमा एक्सप्रेस’ हे नाव देण्यात आले आहे.