मुंबई : हिंदुत्वाची विचारधारा पटत नाही म्हणुन केरळ मधील सीपीआय (एम) च्या कार्यकर्त्यांनी १९९४ मध्ये माझे दोन्ही पाय करवतीने कापून टाकले. एवढेच नाहीतर कापलेले पाय रस्त्यावर घासले जेणेकरून कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करता येऊ नये. त्यामुळे आज देशात कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस लोकशाहीच्या गप्पा करतात हे दुर्दैवच असल्याचे मत केरळमधील संघ स्वयंसेवक आणि राज्यसभा खासदार सदानंद मास्टर यांनी व्यक्त केले.
सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव चालू होता यावेळी सदानंद मास्टर बोलत होते. ते बोलत असताना सभागृहात भावनिक आणि गंभीर वातावरण होते. कारण त्यांनी सभागृहात बसून भाषण करताना त्यांचे कृत्रिम पाय त्यांच्या शेजारी असलेल्या टेबलावर ठेवले होते.
सीपीआय(एम) चा थेट उल्लेख करताना ते म्हणाले की, संसदेत लोकशाहीबद्दल गर्जना करणाऱ्यांनी ३१ वर्षांपूर्वी माझ्यावर हल्ला केला होता.
कम्युनिस्टांची वचनबद्धता ही लोकशाही मूल्यांपेक्षा राजकीय हिंसाचारात रुजलेली आहे. ते लोकशाही आणि मानवतेबद्दल ओरड करतात, परंतु राजकीय हिंसाचार लोकशाहीसाठी चांगला नसून अशा कृत्यांमुळे देशाच्या लोकशाही रचनेला हानी पोहोचते.
राष्ट्रपतींच्या भाषणातील नारी शक्ती वर भर देण्याच्या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधील महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीच्या ऐतिहासिक पदवीदान समारंभाला राष्ट्रीय विकासाचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे प्रतीक म्हणून नमूद केले. एकतेचे आवाहन करताना त्यांनी विरोधी सदस्यांना आवाहन केले की, आपण विरोधासाठी विरोध करू नये. राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर एकजूट भूमिका घेतली पाहीजे.
३१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ साली सदानंद मास्टर त्यांच्या काकांना भेटून कन्नूर जिल्ह्यातील मत्तानूर येथील घरी परतत होते. त्याचवेळी कम्युनिस्ट पक्षाच्या काही सदस्यांनी ते संघाचे कार्य करतात म्हणून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना खाली पाडून धारदार शस्त्रांनी त्यांचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापले. त्यांचे कापलेले पाय जमिनीवर घासले जेणेकरून ते पुन्हा जोडता येऊ नयेत.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.