शिमगा... शबय शबय होळीयेक शबय!

    19-Feb-2026
Total Views |
Shimga
 
माघ महिना संपून फाल्गुन लागला. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये सण येतातच. मात्र, भाद्रपद, माघ आणि फाल्गुन या महिन्यांची वाट कोकणवासीय अधिक पाहतात. भाद्रपद आणि माघात विघ्नहर्त्याची सेवा घडावी म्हणून, तर फल्गुनात शिमगा असल्याने चाकरमान्यांची पाऊले आपसूकच गावाकडे वळताना दिसतात. कोकणातील गणपतीप्रमाणेच शिमगा उत्सवही प्रसिद्ध. या शिमग्याचे स्वरूप, त्यातील शास्त्र, पद्धती, संस्कृती अशा अंगाने पुढील दोन लेखांमध्ये या ‌‘शिमगोत्सवा‌’चा मागोवा आपण घेणार आहोत. त्यांपैकी या उत्सवाचे स्वरूप, साजरा करण्याची पद्धती यांचा घेतलेला आढावा...
 
सिंधुदुर्गात जितक्या भक्तिभावाने गणेशचतुर्थी साजरी होते, आनंदाने वेगवेगळ्या गावच्या यात्रा आणि तितक्याच आनंदाने साजरा होणारा सण म्हणजे शिमगा! यालाच ‌‘शिगमा‌’ असेही म्हटले जाते. मालवणी भाषा जशी बारा कोसांवर बदलत जाते, त्याचप्रकारे शिगमा साजरा करण्यातही विविधता दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावाचा ‌‘हुडा‌’, सांगेली गावाचा ‌’गिरोबा‌’, दोडामार्ग तालुक्यातील ‌’साळातले गडे‌’ असे प्रसिद्ध उत्सव आहेत. काही ठिकाणी दोन, पाच दिवस, तर काही ठिकाणी सात, नऊ दिवसही शिमगा सण साजरा होतो.
 
शिमगा हा उत्सव प्रामुख्याने वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. निसर्गात नव्या पालवीचे आगमन, फुलांची रंगउधळण आणि वातावरणातील प्रसन्नता यांचा प्रभाव या सणावर दिसतो. ज्याप्रमाणे घरातील कचरा काढून घर स्वच्छ केलं जाते, तसेच मनातील घाण, मळाचा निचरा होण्याची ही एक प्रचलित परंपरा आहे. मनावरील ताण किंवा मनातील घाण मोठमोठ्याने ओरडून, बोंबाबोंब करून प्रसंगी शिव्या, म्हणजेच गाळ्या घालून सामान्य माणूस मनाचा समतोल साधतो. मनावरील ताण कमी करण्यासाठी नृत्य हाही तितकाच महत्त्वाचा भाग असल्याने, गायन आणि नृत्य अशा संगीत रूपातून दारोदारी जाऊन राधा खेळे होतात. संघटन साधत समूह नृत्य केले जाते, पण या सगळ्यालाच दैवी अधिष्ठान आहे. शिमगा उत्सवात होळी म्हणजे जिथे देवत्व असतं, त्या जागेस ‌‘मांड‌’ किंवा ‌‘चव्हाटा‌’ असाही शब्द प्रचलित आहे. इथे होळीच्या मांडावर नारळ, आंबा, सुपारी यांची सरळसोट फांदी उभी करुन, त्याची पूजा केली जाते. यात बारा पाचाचे मानकरी यांचा मान असतो. बारा बलुतेदार यांना त्या-त्या वेळी योग्य सन्मान देत, आपण आपल्या कामाने समाजात उचलत असलेला वाटा तितकाच महत्त्वपूर्ण असल्याचे दाखवून दिले जाते.
 
राधा खेळ्यात पुरुषाला राधा बनवून, त्याला साडी नेसवून स्त्री वेश धारण केला जातो. यात या राधेसोबत कान्हासुद्धा असतो. कोणत्याही भारतीय सणात ज्याप्रमाणे शास्त्रीय दृष्टी आहे, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीमधील श्रीराम आणि श्रीकृष्ण, गणपती, शंकर, देवीतत्त्व यांच्या भक्तीशिवाय एकही सण साजरा होत नाही.राधा, गोमू, कान्हासह एकेक गण, गट एकेका घरासमोर दारावर जाऊन, आपली कला सादर करतात. कुणी ढोल, झांज, तर कोणी चिपळी अशी उपलब्ध असतील ती वाद्ये वाजवत, अंगातील कलेचे सादरीकरण करतात. त्या बदल्यात घरातील व्यक्ती त्यांना मोबदला म्हणून, त्यांनी आणलेल्या आरतीत पैसे ठेवते.
“जा गो चेडवा तेनका बोलयजा...गण गवळण गौरी गण राया...”, “सीतेचे स्वयंवर मांडले 96 कुळचे राजे आले.. सकलीक देव आले, देव आले धनुष्य कोण उचलेल?”अशा प्रकारची गीते गायली जातात.
 
पूर्वी दोन-पाच रुपयांत काम व्हायचे, आता चलनवाढ झाल्याने ही रक्कमही वाढत गेली आहे. ज्याच्या त्याच्या आवडीने आणि हौसेप्रमाणे समोरच्या आरतीत पैसे ठेवले जातात.“आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना शबय शब्बय...” असे वाडीवाडीतून स्वर घुमत असतात; यालाच ‌‘शबय‌’ असेही म्हणतात. हा खेळ किंवा सोंग करणाऱ्या गटाला ‌‘रोंबाट‌’ म्हणतात.
 
होळीचा उत्सव म्हणजे एक गाव एक होळी, तीसुद्धा सुरमाडाची उंच मोठी, ती तोडणे हे एक कौशल्याचे काम असते. तोडून पाडताना ती मोडता काम नये, हा नियम. जराही भंग पावल्यास तो माड चालत नाही, मग मोर्चा वाजत-गाजत दुसऱ्या माडाकडे वळतो, असे माड अगोदरच हेरून ठेवलेले असतात. गावात इतर लहान लहान होळ्या असतातच, उदा. ‌‘राखणे होळी‌’ ही खास गुरांच्या राखणंदारांची, आंब्याच्या झाडाची होळी (गवळदेवकडे असते), स्थलपरत्वे वाडीवाडीत असतात, पण त्या सर्व गौण. महत्त्वाच्या मुख्य होळीकडे संपूर्ण गाव लोटतो. पौर्णिमेला होळी पुरल्यावर, दुसऱ्या दिवशीपासून गावात निशाण फिरते. निशाण म्हणजे ग्रामदेवतेच्या पालखीबरोबर असणारे अब्दागिर व गावच्या देवळातील ढोलताशा पथक. या मिरवणुकीबरोबर गावातील बराच लवाजमा असतो; कारण ‌‘शबय!‌’ एका घरी पूर्ण होळीत त्यांच्या कुवतीप्रमाणे ५०० ते हजार रुपये चिल्लर लागते.
या दिवसात निशाण गावातल्या ठरावीक घरी वस्तीला असते, रोज मंदिरात आणले जात नाही. रत्नागिरी भागात पालखी फिरते, तशी सिंधुदुर्गात फिरत नाही. प्रतीकात्मक रूपात देव नेले जातात.
 
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रोज रात्री प्रत्येक घरी तिन्हीसांजेला ढोल वाजवून केली जाणारी ‌‘नौबत‌’. आजही या दिवसात संध्याकाळ झाली की, लहान मुले नौबतीची वाट पाहात असतात. ज्यांना आजारपण, विकलांग, तसेच वृद्धापकाळ या कारणांमुळे मंदिरात जाणे शक्य होत नाही, त्यांच्या दारात प्रत्यक्ष देव भेटीला येत असतो. आपल्या घरी देवळातील ढोल वाजवला जातो, याचे सर्वांनाच कौतुक असते. त्या रूपाने देव आपल्या घरी येतात, ही त्यामागील भावना असते. नौबतीचा मोबदला म्हणून, शेवटच्या दिवशी पूर्वी धान्य (भात) देत असत, आता लोक यथाशक्ती पैसे देतात.
 
शिशिर ऋतूच्या अंताला झाडांची जुनी पाने गळून पडतात. याच वेळेत फांद्या छाटणे, वृक्ष खोडातून तोडणे, झाडाला फुटवे किंवा पालवी येण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. म्हणून होळी पौर्णिमेदरम्यान ही तोड केली जाते. एक महिना ते वाळवून वैशाखात जाळले जाते. शेती कामाच्या दृष्टीनेही क्रिया हितावह ठरते. मान्सून वेळेवर येणे, हेही त्यामागील शास्त्र असल्याचे अधोरेखित होते. अशा प्रकारे एकूणच वनदेवतेची पूजा केली जाते.
 
सातव्या किंवा नवव्या म्हणजे, शेवटच्या दिवशी चव्हाट्यावर किंवा मांडावर विशिष्ट ठिकाणी जागोजागी असलेली ही रोंबाट एकत्र येतात. धूळवड किंवा धूलिवंदन होऊन चव्हाट्यावर जिथं होळी उभी केलेली असते, तिथं दररोज पूजा, नैवेद्य असतो. घरोघरी रस शिरवाळे, आंबोळी उसळ, वडे सागोती, मटण असे खाण्यात वैविध्यपूर्ण पदार्थ केलेले असतात.
 
नैवेद्यात असलेला बकरा, कोंबडी वाटून त्या त्या मानकरी लोकांना, त्यांचे त्यांचे वाटे दिले जातात. रंग खेळताना पाण्याचा वापर न करता, सुके रंग गुलाल, हळद-कुंकू यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. होळीकडे कोणाचे नवस बोलणे आणि फेडणे असे वार्षिक कार्यक्रम संपन्न होत असतात. सर्वांनी हात जोडून “होय महाराजा... होय महाराजा...” असे गाऱ्हाणे घातले जाते. यात माफी मागितली जाते आणि नियोजित कामे देवाला सांगितली जाऊन, त्यासाठी आशीर्वादही घेतला जातो.
 
पंचपरिवर्तनात अपेक्षित असलेले समरसता, आणि पर्यावरण जतनही या सणादरम्यान केले जाते. ही आपली संस्कृती अतिशय कल्पकतेने आणि विचारपूर्वक लक्षात घेऊनच, समाज संघटनाचे काम घडवत जाते. शेवटच्या दिवशी होळीवर धूळ उडवून सांगता केली जाते. ‌‘हळदवणी‌’ म्हणजे, हळदीचे पाणी घरोघरी तीर्थ म्हणून फिरवली जाते. सगळे काही मंगल घडावे, यासाठी प्रार्थना होते.
 
- ॲड. अंजली मुतालिक
9420306408