सध्या उत्तर कोरियामध्ये किम जोंग उन यांच्या वारसदाराचा प्रश्न चर्चेला आला आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनुसार, किम त्यांची १३ वर्षांची मुलगी, किम जू आय हिला वारसदार म्हणून नेमण्याची शक्यता आहे, तर या पदासाठी किम यांची बहीण किम यो जोंग यादेखील शर्यतीत असल्याची चर्चा आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी सर्वप्रथम उत्तर कोरियाचे राजकारण समजून घ्यावे लागेल.
येथे राज्य म्हणजे पक्ष, पक्ष म्हणजे लष्कर आणि लष्कर म्हणजेच किम घराण्याची इच्छा अशी त्रिसूत्री व्यवस्था. सध्याचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आपल्या अल्पवयीन कन्येला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने पुढे आणण्यास सुरुवात केल्याने या बंद व्यवस्थेतील उत्तराधिकाराचा प्रश्न नव्याने चर्चेला आला. किम जू आय ही १३ वर्षांची किम जोंग उन यांची मुलगी क्षेपणास्त्र चाचण्या, लष्करी संचलने आणि राष्ट्रीय सोहळ्यांमध्ये वडिलांच्या शेजारी वारंवार दिसू लागली. उत्तर कोरियात ‘प्रतिमांचे राजकारण’ हे प्रत्यक्ष राजकारणाइतकेच प्रभावी असते. त्यामुळेच या उपस्थितीकडे वारसदारपदाच्या शर्यतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.
किम घराण्याच्या सत्तेचे गुढ त्यांच्या क्रांतिकारी वारशात आहे. या सत्तेचे संस्थापक किम इल सुंग यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिपूजेच्या चौकटीतच पुढील पिढ्यांनी सत्ता टिकवली. त्यानंतर किम जोंग इल आणि मग किम जोंग उन अशाप्रकारे सत्तेचा वारसा चालूच राहिला. प्रत्येक संक्रमणाच्या वेळी अनिश्चितता निर्माण झाली होती; परंतु सत्तेच्या केंद्रीकरणाने ती नियंत्रित करण्यात आली. किम जोंग उन यांनीही त्यांच्या काकाचा विरोध मोडून काढतच सत्तासूत्रे स्वीकारली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सर्व संभाव्य प्रतिस्पर्ध्यांचे उच्चाटन केले, लष्करातील बदल घडवले आणि अण्वस्त्र कार्यक्रमाला वेग देत राष्ट्रवादाची धार अधिकच तीव्र केली.
किम जोंग उन यांनी मुलीला वारसदार म्हणून पुढे करणे, हे तीन पातळ्यांवर महत्त्वाचे ठरते. एक म्हणजे, अंतर्गत राजकारण. यातूनच पक्ष, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणेला भावी सत्ताकेंद्राची जाणीव करून देणे, हा सुप्त उद्देश असू शकतो. दुसरे म्हणजे, समाजाचे मानसशास्त्र. व्यक्तिपूजक व्यवस्थेत वारसदाराचे नाव लवकर जाहीर केल्यास जनमानसात त्याचा स्वीकार अपरिहार्य वाटू लागतो. तिसरी पातळी म्हणजे, आंतरराष्ट्रीय संकेत. बाह्य जगाला स्थैर्याचा संदेश देणे, हादेखील त्यामागचा एक हेतू असल्याचे वाटते.
तथापि, या प्रक्रियेत दडलेली गुंतागुंतही दुर्लक्षित करता येणार नाही. किम जोंग उन यांची बहीण किम जो योंग या आजवर प्रभावी आणि सक्षम नेत्या म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांनी उत्तर कोरियाच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावली आहे. अनेक विश्लेषकांच्या मते, त्या वारसदाराच्या शर्यतीत पहिली शक्यता होत्या. अशा परिस्थितीत त्यांना वारसदार न जाहीर केल्याने एक वेगळेच द्वंद्व उभे ठाकण्याची भीती आहे.
त्याचबरोबर अल्पवयीन वारसदाराचा प्रश्नही आणखीच गुंतागुंतीचा आहे. किम जोंग उन यांची १३ वर्षांची मुलगी सत्तेच्या व्यावहारिक जबाबदार्या तत्काळ सांभाळू शकत नाही. त्यामुळे पुढील काही वर्षे किम जोंग उन यांचे नेतृत्व स्थिर राहणे आवश्यक आहे. जर अनपेक्षित सत्तांतर झाले, तर लष्कर आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका निर्णायक ठरेल. अशा वेळी लष्करावरचा किम जो योंग यांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घडामोडींचे परिणाम दूरगामी असू शकतात. उत्तर कोरिया अण्वस्त्रधारी राष्ट्र असल्याने त्याची धोरणे पूर्व आशियातील सुरक्षा व्यवस्थेवर थेट परिणाम करतात. चीन आणि रशिया यांचे सामरिक हित; तसेच अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्याशी असलेले तणाव या सर्वांचा विचार करता, सत्तासंघर्षाचा कोणताही संकेत जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण करू शकतो.
म्हणूनच, उत्तर कोरियातील सध्याची स्थिती ही केवळ घराणेशाहीचा प्रश्न नसून; ती व्यवस्थेच्या अस्तित्वाची कसोटी आहे. किम जोंग उन मुलीला पुढे आणून चौथ्या पिढीच्या सत्तेचा पाया घालण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, व्यक्तिपूजक आणि बंदिस्त व्यवस्थेत सत्ता ही प्रतिमांवर जितकी अवलंबून असते, तितकीच ती भीती, निष्ठा आणि नियंत्रण यांवरही आधारित असते. पुढील दशकात या तिन्ही घटकांचा समतोल कसा राखला जातो, यावर उत्तर कोरियाच्या राजकीय भविष्याचे चित्र अवलंबून राहील.
- कौस्तुभ वीरकर