मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांचा समावेश ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला. एकप्रकारे महाराजांचा वारसा संपूर्ण जगाने मान्य केला. देशभरामध्ये यानंतर उत्साहाची आणि जल्लोषाची लाट पसरली. मात्र, शिवछत्रपतींच्या या जिवंत वारशाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी येणार्या काळात शिवप्रेमींनी काय करणे अपेक्षित आहे? या नामांकनापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता? या आणि अशा अनेक प्रश्नांवर राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी आजच्या शिवजयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेला हा विशेष संवाद.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळवण्याचा नेमका प्रवास कसा होता?
- मुळात ‘युनेस्को’ ही संस्था नामांकन देते म्हणजे काय, हे आपण आधी समजून घेतले पाहिजे. अगदी साध्या शब्दांत सांगायचे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘जगात भारी’ वास्तू कुठली, हे ठरवणारी संस्था म्हणजे ‘युनेस्को’. जगभरातील एक हजार, २०० स्मारके ‘जागतिक वारसा’ म्हणून या माध्यमातून घोषित झालेली आहेत. त्यांचे स्वतःचे असे एक वैश्विक अद्वितीय मूल्य आहे आणि जे प्रस्थापित झाले आहे; त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश होणे, ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. ‘युनेस्को’च्या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. त्याअंतर्गत काही निकष लावण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, सदर वारसास्थळ म्हणजे मानवी प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना असायला हवा किंवा तत्कालीन स्थापत्याचे ते एक अद्वितीय उदाहरण असायला हवे किंवा ज्या निकषामध्ये आपल्या मागणीची पूर्तता झाली होती, ते म्हणजे विशिष्ट काळातील स्थापत्यरचना आणि त्यांचे वैश्विक मूल्य याच्याशी निगडित होता. जवळपास २०१८-१९च्या दरम्यान आपण एक प्राथमिक प्रस्ताव तयार केला, जो दिल्लीत पाठवला गेला आणि त्यानंतर तो पुढे ‘युनेस्को’मध्ये पाठवण्यात आला. यानंतर जो विस्तृत प्रस्ताव देण्यात आला, त्यामध्ये किल्ल्यांची माहिती, कारणमीमांसा या गोष्टी आपल्याला द्यावा लागतात. यामध्ये शासकीय आणि कायदेशीर व्यवस्था काय असणार आहे, याबद्दल माहिती द्यावी लागते. महाराजांचे किल्ले हे इतर साम्राज्यातील किल्ल्यांपेक्षा कसे वेगळे आहेत आणि त्याचे अद्वितीय मूल्य काय, हे तपशीलवार मांडावे लागले आणि त्यातूनच हे नामांकन आपण मिळवले.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पुरातत्त्व विभागाची भूमिका नेमकी काय होती?
- राज्यातील राज्यसंरक्षित स्मारकांची देखभाल करण्याचे काम पुरातत्त्व विभाग करतो. आता ही संरक्षित स्मारके कोणती, हे आपण सातत्याने वाढवत असतो. त्याची यादी अद्ययावत करत असतो. त्याच्यासाठी आवश्यक असणार्या ज्या शासकीय प्रक्रिया असतात, त्या आपल्या विभागाकडून पूर्ण केल्या जातात. प्रत्यक्षात त्या स्मारकाचा ताबा घेणे किंवा खासगी संस्थेसोबत करार करणे आणि संवर्धन प्रक्रिया पूर्ण करणे हे आपल्या विभागाचे प्रमुख काम असते. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन-संवर्धन करणे हे पुरातत्त्व विभागाचे काम आहे.
प्रत्येक गड-किल्ल्याची एक वहनक्षमता (carrying capacity) असते. आताच्या घडीला पर्यटकांचा ओढा वाढला आहे. आपले किल्ले याबाबतीत कितपत सक्षम आहेत, आपल्याला काय वाटते?
- आपण यानिमित्ताने कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे. याबद्दल अगदी प्रामाणिकपणे म्हणेन की, अद्याप आपण संवर्धनाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्यापही पोहोचू शकलेलो नाही. आता आपण आदर्श अवस्थेमध्ये नसलो, तरी तिच्या पूर्ततेसाठी आपण काय करणार आहोत, यासंदर्भात आपण ‘युनेस्को’ला माहिती दिलेली आहे. त्यामुळे शासन-प्रशासन म्हणून आपले गांभीर्य यानिमित्ताने कळले. आपण जो वहनक्षमतेच्या संदर्भात प्रश्न विचारला, त्यासाठी ‘साईट मॅनेजमेंट प्लान’मध्ये आपण तरतूद केलेली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक किल्ल्यासंदर्भात तपशीलवार नियोजन आखण्यात आलेले आहे.
गड-किल्ल्यांच्या विकासाबरोबरच या किल्ल्यांच्या अवतीभोवती जी गावखेडी वसलेली आहेत, त्यांचेही किल्ल्यांसोबत एक परस्परपूरक असे नाते जुळलेले असते. तेव्हा त्यांच्या विकासासाठी येणार्या काळात काय योजना आहेत?
- संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम आपण किल्ल्यांच्या पंचक्रोशीतील माणूस ठेवला आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून गाईड्सचे प्रशिक्षण आपण करणार आहोत. या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, न्याहारी केंद्रे उभी राहावी, (मी मुद्दाम ‘हॉटेल’ हा शब्द वापरत नाही) आपल्या किल्ल्यावर आपल्यासाठी भाकर घेऊन येणार्या आजी यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यामुळे सर्वसमावेशक विकासातूनच आपण महाराजांच्या किल्ल्यांचे संवर्धन करणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना नामांकन मिळाले, त्याचबरोबर कोकणातील कातळशिल्पांबद्दलदेखील आपण काही विचार केला आहे का?
- निश्चितच, आपण वास्तविक महाराजांच्या गड-किल्ल्यांबरोबर कोकणातील कातळशिल्पांचादेखील प्रस्ताव सादर केला होता. पंतप्रधान कार्यालयाला जे पाच प्रस्ताव सादर झाले, त्यात महाराष्ट्राचे दोन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यामुळे आपल्या या प्रस्तावाने दिल्लीत धडक दिलेली आहे. एका देशाला, एका वर्षात एकच प्रस्ताव पाठवता येतो आणि महाराष्ट्राची सायकल आताच पूर्ण झाली आहे. आपल्यापुढे देशातील अनेक वेगवेगळी ठिकाणे आता या मानांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे येणार्या काळात हे नामांकन आपल्याला मिळेल, याची मला खात्री आहे. आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आ. ॅड. आशिष शेलार यांनी यासाठी ‘कातळशिल्पे डेस्क’चा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे येणार्या काळात आपण यासाठी पूर्णपणे तयार असू.
मागच्या काही काळापासून किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण (गड जिहाद) हा एक कळीचा मुद्दा राहिला आहे. पुरातत्त्व विभागाकडून हे रोखण्यासाठी काही पावले उचलली गेली आहेत का?
- अतिक्रमणांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. यासंदर्भात राज्य आणि केंद्राचा कायदा जर आपण बघितला, तर आपल्याला असे लक्षात येईल की, ज्यावेळी ती वास्तू संरक्षित होते, त्यावेळेस जी परिस्थिती होती, ती यथास्थित राखणे हे शासनाचे काम आहे. सध्याचे आपले शासन अतिक्रमणांच्या विरोधात गंभीर आहे. मागच्या काही काळामध्ये शासनाकडून असे दोन ‘जीआर’ काढण्यात आले, ज्याअंतर्गत गडकोट अतिक्रमणमुक्त करण्याचा विचार केला गेला होता. तशाप्रकारचे कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्यांनासुद्धा देण्यात आले होते. मध्यंतरी सिंहगड आणि विशाळगडावरील अतिक्रमण आपण हटवले. त्यासंदर्भात काहींनी न्यायालयातसुद्धा धाव घेतली. त्यामुळे सन्मानीय न्यायालयाच्या निर्णयाचे पूर्ण पालन करूनच आपण आपले किल्ले अतिक्रमणमुक्त करणार आहोत. त्याचबरोबर राज्यातील सर्व संरक्षित स्मारकेसुद्धा अतिक्रमणमुक्त आपण करणार आहोत.
महाराजांच्या गड-किल्ल्यांना नामांकन तर मिळाले, आता यापुढे हे टिकवून ठेवण्यासाठी सामान्य माणसाची भूमिका काय असायला हवी?
- आपल्या गड-किल्ल्यांचा वारसा जपण्याची सर्वात मोठी जबाबदारी आता आपली आहे. गडावर प्लास्टिकचा कचरा कुणीही करू नये. जे काही पदार्थ आपण वर नेणार आहोत, ते खाली घेऊन यावे. गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी आपली आहे, हे विसरता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे, बर्याचदा गडावरील तोफेचे गोळे, नाणी, नक्षीकाम, काही अवशेष आठवण म्हणून आपण घरी घेऊन जातो. तसे न करता, हा ऐवज पुरातत्त्व विभागाकडे सोपवावा. आपल्या वारसास्थळांच्या संवर्धनासाठी आपण तत्पर असले पाहिजे.