लोकोत्तर संगीत सम्राज्ञी

    01-Feb-2026   
Total Views |
Dr. Smt. Rajam
 
शास्त्रीय संगीत हे भारतीय संस्कृती-जीवनाचे एक अविभाज्य अंग. स्वातंत्र्याची पहाट अनुभवताना, भारतातील शास्त्रीय संगीताचा अवकाशदेखील विस्तारला. याच काळात गंगेच्या काठी संगीताची ‘स्वरगंगा’ वाहत होती. ‘एकल व्हायोलिनवादक’ म्हणून नावारूपाला आलेल्या डॉ. श्रीमती राजम यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये संगीत क्षेत्रामध्ये एक वेगळीच वाट निर्माण केली. २०२६ सालचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार त्यांना जाहीर झाला. यापूर्वी १९८४ साली त्यांना ‘पद्मश्री’ व २००४ साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख...
 
संगीत म्हणजे विश्वाला आत्मा प्रदान करणारी गोष्ट आहे,’ प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता प्लॅटो याचे हे उद्गार ऐकताच, संगीताच्या अवकाशाची आपल्याला प्रचिती येते. आपल्या जीवनामध्ये आपण कळत-नकळत सूर, ताल, लय या सगळ्यांच्या सान्निध्यात वावरत असतो. आपल्या सभोवतालीच संगीताची एक सृष्टी जन्माला येते. मात्र, या सार्‍या अवकाशाची रचना जो करतो, तो खरा संगीतकार. आवाजाचा सारा पसारा एका बाजूला आणि त्यातून स्वरांची सिद्धी वेचणारा कलावंत दुसर्‍या बाजूला. स्वरांची ही सृष्टी ज्यांनी जन्माला घातली, अशा लोकांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे विचारवैभव समृद्ध केले. याच फळीतील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे डॉ. श्रीमती राजम.
 
वयाच्या तिसर्‍या वर्षापासून शास्त्रीय संगीताशी त्यांची नाळ जोडली गेली. अवघ्या १५व्या वर्षी हिंदुस्तानी व्हायोलिनवादक म्हणून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले आणि नंतर मागे वळून पाहिले नाही. ‘व्हायोलिन’ हे रूढार्थाने पाश्चिमात्य वाद्य म्हणून ओळखले जाते. काहींच्या मते, मध्य आशियातील प्रांतामध्ये या वाद्याचा जन्म झाला. या व्हायोलिनने किशोरवयातच डॉ. श्रीमती राजम यांची बोटे धरली आणि या दोहोंच्या संगमातून एक आगळावेगळा आविष्कार जन्माला आला.
 
डॉ. राजम यांचे वडील विद्वान दिवंगत श्री. ए. नारायण अय्यर एक उत्कृष्ट संगीत शिक्षक तर होतेच. मात्र, त्याचबरोबर एक संवेदनशील पिता आणि दूरदृष्टी असलेले विद्वानसुद्धा होते. डॉ. राजम यांचा जन्म चेन्नईचा. मात्र, त्यांच्या संगीताचा प्रवास पूर्णत्वास गेला तो गंगेच्या काठावर. डॉ. राजम यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी वीणा आणि कंठसंगीताच्या तंत्रावर आधारित ‘गायकी अंग’साठी एक विशेष व्हायोलिन तंत्र शोधून काढले. ‘ग्वालियर’ घराण्याच्या विष्णू दिगंबर पळुस्कर यांचे शिष्य असलेल्या पंडित ओमकारनाथ ठाकूर यांच्याकडे त्यांना संगीत-शिक्षणाची दिशा सापडली. त्यांनी आपल्या वादनातून पाश्चात्त्य वाद्याला हिंदुस्तानी गायनशैलीसाठी अनुकूल बनवले. त्यांनी व्हायोलिनवर ‘गायकी अंग’, विशेषतः ‘ख्याल गायकी अंग’ इतक्या कुशलतेने सादर केले की, बहुतेक संगीतकार, विशेषतः व्हायोलिनवादक त्याचे परिणाम पाहून थक्क झाले. व्हायोलिन तंत्रातील त्यांचे योगदान हे दिवंगत पन्नालाल घोष यांनी बासरीसाठी, दिवंगत बुंदू खान यांनी सारंगीसाठी आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी शहनाईसाठी केलेल्या कार्याइतकेच महत्त्वाचे मानले जाते.
 
या कार्याबद्दल माहिती देताना डॉ. राजम दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना म्हणाल्या की, "ही शैली विकसित होण्यासाठी सुरुवातीला दहा ते १५ वर्षांचा कालावधी जावा लागला. पंडित ओमकारनाथ ठाकूर यांची गायकी अत्यंत भावपूर्ण होती. त्यांच्या गायकीमध्ये ‘भाव’ या घटकाला विशेष स्थान होते.” ही संवेदनशीलता, त्यातील भावनांचे वेगवेगळे अनुबंध या सार्‍या गोष्टींधून त्यांच्यातील कलाकार सतत घडत गेला. ‘कर्नाटकी’ गायकीतील महत्त्वपूर्ण नाव म्हणजे मुसिरी सुब्रमण्यम अय्यर. संवेदनशीलतेचा विचार हा अय्यर यांच्या मुशीत घडला, असे त्या आवर्जून नमूद करतात. त्यांच्या या सार्‍या प्रवासात त्यांनी त्यांच्या शिक्षणाची वाट सोडली नाही. ”गायनासोबतच पदवी तथा पदव्युत्तर शिक्षणाचा त्यांचा प्रवास सुरूच राहिला. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मी हे करू शकले,” असे त्या नमूद करतात.
 
डॉ. राजम आणि वाराणसीचे एक विशेष घट्ट नाते. गुरूकडे शिक्षणासाठी म्हणून त्यांनी आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण वर्षे तिथे व्यतित केली. याबद्दल सांगताना त्या म्हणतात की, "एक प्रकारे हे माझे भाग्य आहे की, मला इथे येऊन शिकण्याची संधी मिळाली. बाबा विश्वनाथांच्या पावन भूमीसोबत एक वेगळे नाते तयार झाले. याच नगरीतील उस्ताद बिस्मिल्ला खान यांची शहनाई तर विश्वभरात परिचयाची झाली.” डॉ. राजम, त्यांच्या वात्सल्य भावाबद्दल, तल्लीनतेबद्दल भरभरून सांगतात, "जुगलबंदीच्या वेळी त्यांची शहनाई कुठे संपायची आणि व्हायोलिन कधी सुरू व्हायचे, हे एका पातळीनंतर लक्षातच यायचे नाही, इतके ते संगीत एकमेकांसोबत समरस होऊन जात असे.” इतक्या दशकांचा कालावधी लोटला असला, तरीसुद्धा आजही त्यांचा रियाज थांबलेला नाही. त्यांच्या संगीताविषयी भाष्य करताना एके ठिकाणी मा. न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी म्हटले की, "राजम हा दिव्य संगीत आणि जीवनातील वास्तव यांच्यातील दुवा आहे. कोणती तरी मोठी शक्ती त्यांना प्रेरणा देत आहे आणि त्या व त्यांचे संगीत, त्या बदल्यात आम्हाला प्रेरणा देतात. राजम यांचे व्हायोलिन ऐकताना ब्रह्मानंदाच्या प्रदेशात एक पाऊल पुढे टाकल्यासारखे वाटते.”
 
डॉ. राजम यांची कार्यकुशलता अफाट आणि अचाट आहे. पूर्वीच्या काळी ‘गुरुकुल’ पद्धतीचे शिक्षण अस्तित्वात होते. आता मात्र अशा पद्धतीची शिक्षणपद्धती नाही. मात्र, आजच्या विद्यार्थ्यांना जर त्या प्रकारच्या पद्धतीचा अनुभव घ्यायाचा असेल, तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, असा विचार त्यांनी केला व ‘स्वरसाधना तपोवन’ अशी आगळीवेगळी संकल्पना त्यांनी बंगळुरूजवळ राबविली. काळाच्या पटावर अनुभवाचे संचित घेऊन चालणार्‍या डॉ. श्रीमती राजम आता पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. विद्येच्या महासागरात अशा एखाद्या होकायंत्राची गरज कायम असते, जो आपल्याला योग्य ती दिशा दाखवेल. तरुणांना मोलाचे मार्गदर्शन करताना त्या म्हणतात की, "आजच्या काळात अभ्यासाला, ज्ञानाला महत्त्व आहेच. मात्र, त्याचबरोबर मुलांमध्ये कलागुण विकसित होणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कलागुणांच्या साह्याने माणसाच्या जीवनाचा विकास होतो. माणसाच्या जीवनाला यामुळे दिशा मिळते. त्यामुळे एखादी तरी कला, एखादे तरी वाद्य याच्याशी मुलांचा संबंध आला पाहिजे. या सार्‍याचा उद्देश हाच आहे की, मुलांमध्ये विधायक कार्य करण्याची शक्ती उत्पन्न व्हावी, विनाशकारी गोष्टींच्या वाट्याला त्यांनी जाऊ नये. वयाच्या या टप्प्यावरदेखील पुढच्या पिढीला मार्गदर्शन करताना ही विभूती खर्‍या अर्थाने ‘लोकोत्तर’ आहे, याचीच आपल्याला प्रचिती येते.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.